

Gold Price Crash During War: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होत असताना, सोन्याच्या किमती मात्र घसरत आहेत. साधारणपणे युद्ध, तणाव किंवा अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार ‘सेफ हेवन’ म्हणून सोन्याकडे वळतात. पण यावेळी चित्र उलटं दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत तब्बल १८ टक्क्यांची घसरण झाली असून, प्रति १० ग्रॅम दरात सुमारे २९ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती ११० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत सोन्याचे दर वाढण्याची अपेक्षा होती, मात्र उलट ते ५ टक्क्यांहून अधिक घसरून २०२६ मधील नीचांकी पातळीवर आले आहेत. गुंतवणूकदारांसाठी गेल्या ४० वर्षांतील हा सर्वात वाईट आठवडा असल्याचं बाजार विश्लेषक सांगत आहेत.
या अनपेक्षित घसरणीमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची वाढती ताकद. जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे न जाता डॉलरमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
याशिवाय, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी करण्याऐवजी स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानेही सोन्यावर दबाव आहे. वाढलेले ‘बाँड यिल्ड्स’ गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक वाटत असल्याने ते सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत.
या घसरणीचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ‘प्रॉफिट बुकिंग’. २०२५ मध्ये सोन्यात तब्बल ७० टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी सोन्याची विक्री सुरू केली. कोणत्याही गुंतवणुकीत मोठी तेजी आल्यानंतर त्यात घसरण (correction) होणं स्वाभाविक मानलं जातं.
संकटाच्या काळात ‘कॅश इज किंग’ ही म्हण पुन्हा खरी ठरताना दिसत आहे. अनेक गुंतवणूकदार सध्या आपलं सोने विकून रोख रक्कम साठवत आहेत. विशेषतः दुबईमध्ये राहणारे भारतीय मोठ्या प्रमाणात सोनं विकत असल्याचं समोर आलं आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक गरजांसाठी ते सोन्याचं रुपांतर रोखीत करत आहेत.
एकूणच, युद्ध असूनही सोन्याच्या किमती घसरण्यामागे अनेक आर्थिक आणि बाजारातील घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे ‘सेफ हेवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची चमक सध्या कमी झाली असली तरी, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे. मात्र, बाजारातील अस्थिरता लक्षात घेता गुंतवणुकीचे निर्णय सावधपणे घेणं अधिक महत्त्वाचं आहे.