

Unclaimed Bank Accounts RBI Money Claim:
तुमचं एखादं जुनं बँक खाते आहे का जे तुम्ही अनेक वर्षांपासून वापरलेलं नाही? किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या खात्यातली रक्कम तशीच अडकून राहिली आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता काळजी करण्याची गरज नाही कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या समस्येवर अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. फक्त तीन स्टेपमध्ये तुम्ही तुमचे अडकलेले पैसे परत मिळवू शकता.
RBIच्या माहितीनुसार, देशभरात कोट्यवधी रुपये निष्क्रिय खात्यांमध्ये आणि जुन्या ठेवींमध्ये अडकले आहेत. दोन वर्षांहून अधिक काळ एखाद्या खात्यात व्यवहार न झाल्यास ते निष्क्रिय (Inactive) मानले जाते.
आणि जर दहा वर्षे उलटली, तर त्या खात्यातील रक्कम बँक RBI च्या Depositor Education and Awareness (DEA) Fund मध्ये वर्ग करते. पण ही रक्कम कायमची बँकेची होत नाही. ही तुमचीच रक्कम असते, जी तुम्ही किंवा तुमचे कायदेशीर वारस कधीही परत मिळवू शकता.
पहिली स्टेप — RBI च्या वेबसाइटवर जा
https://www.rbi.org.in/Scripts/DepositorEducation.aspx
येथे तुमचं किंवा कुटुंबातील सदस्याचं नाव टाका. तुम्हाला दिसेल की कोणत्या बँकेत किती रक्कम अडकलेली आहे.
दुसरी स्टेप — विशेष शिबिरात जावा
ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनक्लेम्ड ठेवींसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. तिथे प्रत्यक्ष जाऊन तुम्ही मदत घेऊ शकता.
तिसरी स्टेप— जवळच्या बँकेत क्लेम करा
तुम्हाला मूळ बँकेत जाण्याची गरज नाही. कोणत्याही जवळच्या बँक शाखेत जाऊन क्लेम फॉर्म भरा.
KYC पुरावा: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा NREGA कार्ड.
वारस असल्यास: खातेदाराच्या मृत्यू प्रमाणपत्रासह कायदेशीर कागदपत्रं.
यानंतर बँक तुमची कागदपत्रं पडताळून पाहते आणि RBI च्या DEA फंडातून रक्कम तुमच्या खात्यात जमा करते. या प्रक्रियेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही आणि ती प्रक्रिया अगदी जलद होते.
जुनं अकाउंट बंद झालं असलं तरी पैसे कायमचे बुडत नाहीत.
तुम्ही केव्हाही क्लेम करू शकता. वेळेची मर्यादा नाही.
RBI ची ही योजना नागरिकांना आपले हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.