

December 31 Financial Deadline: डिसेंबर महिना संपत आला आहे आणि नव्या वर्षाच्या आधी काही महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. आज 19 डिसेंबर असून, वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जर ही कामे वेळेत केली नाहीत, तर दंड, अतिरिक्त व्याज आणि अनावश्यक अडचणी वाढू शकतात.
जर तुम्ही आर्थिक वर्ष 2024-25चे आयकर विवरणपत्र (Income Tax Return) दाखल केले नसेल, तर 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर तुम्हाला ITR दाखल करता येणार नाही. मात्र, उशिरा रिटर्न भरल्यास लेट फी भरावी लागते. वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास 1,000 रुपये आणि 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 5,000 रुपये लेट फी आकारली जाते.
31 डिसेंबरपर्यंत ITR दाखल न केल्यास त्याचे अनेक तोटे आहेत. सर्वात आधी, तुम्हाला मिळणारा टॅक्स रिफंड अडकू शकतो किंवा मिळणारच नाही. शिवाय, कर कायद्यानुसार दंडासोबत व्याजही भरावे लागू शकते, ज्यामुळे तुमचा करभार वाढतो.
वेळेत ITR न भरल्याचा परिणाम भविष्यात कर्ज (Loan), क्रेडिट कार्ड, क्रेडिट स्कोअर आणि अगदी व्हिसा अर्जावरही होऊ शकतो. याशिवाय, आयकर विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता देखील वाढते.
जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 किंवा त्याआधी आधार कार्ड काढले असेल आणि अजूनही ते पॅन कार्डशी लिंक केले नसेल, तर 31 डिसेंबर 2025 पूर्वी हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय (Inactive) होऊ शकते. असे झाल्यास बँकिंग, गुंतवणूक आणि कराशी संबंधित अनेक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.
पॅन आणि आधार लिंक करणे अतिशय सोपे आहे. तुम्ही आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जाऊन पॅन नंबर, आधार नंबर आणि मोबाईलवर आलेल्या OTPच्या मदतीने हे काम पूर्ण करू शकता. दंडाची रक्कम ऑनलाइन भरता येते. एसएमएसद्वारेही पॅन-आधार लिंक करता येते.