

Google Pay credit card
नवी दिल्ली : Google ने अखेर आपले पहिले ग्लोबल क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. विशेष म्हणजे, हे कार्ड सर्वात आधी भारतात सादर करण्यात आले आहे. Google ने भारतात 'Flex by Google Pay' या नावाने नवीन डिजिटल क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. हे कार्ड वापरण्यास UPI सारखे सोपे आहे, परंतु यात क्रेडिट कार्डच्या सुविधा मिळतात.
आता QR कोड स्कॅन करून किंवा ऑनलाइन पेमेंट करताना वापरकर्ते फिजिकल कार्डशिवाय 'क्रेडिट' द्वारे पेमेंट करू शकतील. अॅक्सिस बँकेच्या सहकार्याने आणलेले हे नवीन फीचर केवळ त्वरित पेमेंटची सुविधाच देत नाही, तर प्रत्येक पेमेंटवर रिवॉर्ड्स देखील देते.
झपाट्याने वाढणारी UPI पेमेंट सिस्टीम लक्षात घेऊन कंपनीने हे कार्ड UPI शी लिंक करण्याची सुविधाही दिली आहे. म्हणजेच, ग्राहक हे कार्ड आपल्या UPI अकाउंटला जोडून दुकानांमध्ये आणि व्यापाऱ्यांना सहजपणे पेमेंट करू शकतील. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या RuPay नेटवर्कवर चालणारे हे कार्ड वापरकर्ते UPI शी जोडू शकतात.
Google Pay च्या या क्रेडिट कार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे इन्स्टंट कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स. सहसा बाजारात उपलब्ध असलेली क्रेडिट कार्ड्स महिन्याच्या शेवटी कॅशबॅक देतात, परंतु Google ने ही प्रक्रिया बदलून प्रत्येक व्यवहारावर त्वरित रिवॉर्ड देण्याची सुविधा दिली आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही मिळालेले रिवॉर्ड पॉइंट्स पुढच्याच खरेदीत लगेच वापरू शकता.
Google चे सिनियर डायरेक्टर शरथ बुलूसु यांनी सांगितले की, ग्राहकांना रिवॉर्ड रिडीम करताना जास्त त्रास होऊ नये, यासाठी कंपनीने या फीचरवर खास काम केले आहे. याआधी Paytm ने २०१९ मध्ये सिटी बँक आणि २०२१ मध्ये HDFC बँकेसोबत आपले को-ब्रँडेड कार्ड लाँच केले होते, ज्यामध्ये नंतर SBI चाही समावेश झाला. याशिवाय Cred आणि super money सारखे अॅप्स देखील UPI शी संबंधित क्रेडिट कार्ड ऑफर करत आहेत.
फ्लेक्स क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे असा गुगलचा दावा आहे. ते मिळविण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची किंवा कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. अर्जापासून ते मंजुरीपर्यंत, सर्व काही काही मिनिटांत ऑनलाइन केले जाते. एकदा तुमचे क्रेडिट कार्ड मंजूर झाले की, तुम्ही तुमची क्रेडिट मर्यादा ताबडतोब वापरण्यास सुरुवात करू शकाल.