

आजही अनेक भारतीयांना गुंतवणूक म्हणजे मोठा आणि कठीण निर्णय वाटतो. मोठी रक्कम हातात असेल, ठराविक पगार असेल किंवा “योग्य वेळ” मिळेल तेव्हाच गुंतवणूक करायची—अशी मानसिकता असल्यामुळे अनेक जण गुंतवणूक सतत पुढे ढकलतात. पण आता दररोज फक्त १० रुपये बाजूला ठेवूनही गुंतवणूक सुरू करता येते.
डेली एसआयपी (Daily SIP) या संकल्पनेमुळे गुंतवणूक महिन्याच्या शेवटी उरलेल्या पैशांवर अवलंबून राहत नाही. अगदी छोट्या रकमेत, पण रोज गुंतवणूक करता येते. भारतात मोठा वर्ग स्वयंरोजगारावर अवलंबून आहे—दुकानदार, व्यापारी, लघुउद्योग चालक, डिलिव्हरी पार्टनर, गिग वर्कर्स—ज्यांचे उत्पन्न रोजचे किंवा आठवड्याचे असते. अशा लोकांसाठी मोठी रक्कम किंवा मासिक एसआयपीचा ताण न घेता डेली एसआयपी अधिक सोयीची आहे.
PhonePe Wealth चे गुंतवणूक उत्पादन प्रमुख निलेश डी. नाईक सांगतात की, डेली एसआयपीमुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन उत्पन्नातून अगदी कमी रक्कम गुंतवता येते. अनियमित उत्पन्न असलेल्या लोकांसाठीही गुंतवणूक सोपी होते. डिजिटल पेमेंट्सच्या वाढीमुळे ही संकल्पना अधिक सोपी झाली आहे. यूपीआयमुळे, विशेषतः लहान शहरांमध्ये, व्यवहारांची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. यूपीआय ऑटोपेच्या मदतीने दररोजची छोटी गुंतवणूकही सुरक्षित आणि ऑटोपे करता येते. त्याचबरोबर स्मार्टफोनचा वाढता वापर, यूट्यूब आणि स्थानिक भाषेतील आर्थिक माहितीमुळे शेअर बाजाराबाबतची भीतीही कमी होत आहे.
दररोज १० रुपयांची गुंतवणूक ही केवळ पैशांपुरती मर्यादित नसून मानसिक बदल घडवणारी आहे. इतकी छोटी रक्कम गुंतवताना खिशावर फारसा ताण येत नाही. नुकसान होईल, ही भीतीही कमी राहते. त्यामुळे गुंतवणूक हा मोठा निर्णय न वाटता दैनंदिन सवय बनते. निलेश नाईक यांच्या मते, रोज १० रुपये गुंतवल्याने नव्या गुंतवणूकदारांचा मानसिक त्रास कमी होतो आणि बाजारातील चढ-उतारही कमी धोकादायक वाटू लागतात.
लहान शहरांतील आणि पहिल्यांदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी डेली एसआयपी हा चांगला पर्याय आहे. आत्मविश्वास वाढल्यानंतर अनेक जण हळूहळू जास्त रक्कम किंवा मासिक एसआयपीकडे वळताना दिसतात. तज्ज्ञ सांगतात की, अशी गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने पाहणे महत्त्वाचे आहे. डेली एसआयपीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे लवचिकता. ही गुंतवणूक कधीही थांबवता, बदलता किंवा पुन्हा सुरू करता येते. कोणताही दंड नसल्याने लोक न घाबरता गुंतवणूक सुरू करतात. एकूणच, डेली एसआयपीमुळे भारतातील गुंतवणूक पद्धत बदलत आहे.