

Byju Raveendran Jail: एकेकाळी भारतातील स्टार्टअप जगतातील मोठं नाव असलेल्या Byju’s चे संस्थापक बायजू रवींद्रन यांना सिंगापूरमधील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याप्रकरणी त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच त्यांना 70,500 डॉलरचा दंड भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बायजू रवींद्रन यांनी न्यायालयाचे अनेक आदेश पाळले नाहीत. त्यामुळे सिंगापूर न्यायालयाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. कोर्टाने त्यांना Beeaar Investco Pte या कंपनीतील त्यांच्या कायदेशीर मालकीचे पुरावे सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. या कंपनीकडे संबंधित संस्थेतील शेअर्स असल्याचे सांगितले जाते.
Byju’s अनेक देशांमध्ये गुंतवणूकदारांसोबत कायदेशीर वादात अडकली आहे. सध्या कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या (QIA) उपकंपनीने सिंगापूरमध्ये त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे, Byju’s मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जात आहे. त्यामुळे कंपनीवर आधीपासूनच आर्थिक आणि व्यवस्थापनासंबंधी प्रश्न उपस्थित होत होते.
गेल्या वर्षी अमेरिकेतील डेलावेअर न्यायालयानेही बायजू रवींद्रन यांना मोठा धक्का दिला होता. न्यायालयाने त्यांना 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर केली नाहीत आणि चौकशीदरम्यान टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांच्यावर 533 दशलक्ष डॉलर आणि अतिरिक्त 540.6 दशलक्ष डॉलरची जबाबदारी टाकण्यात आली होती.
एकेकाळी भारताच्या स्टार्टअप यशोगाथेचं पोस्टर बॉय मानले जाणारे बायजू रवींद्रन यांची कहाणी आता पूर्णपणे बदलली आहे. 2019 मध्ये Byju’s ने 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक व्हॅल्युएशनसह ‘युनिकॉर्न’ दर्जा मिळवला होता. 2022 पर्यंत कंपनीचं मूल्यांकन तब्बल 22 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं होतं. मात्र, त्यानंतर कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत गेली आणि व्हॅल्युएशन जवळपास शून्यावर आल्याचं सांगितलं जात आहे.
एका मुलाखतीत बायजू रवींद्रन यांनी स्वतः मान्य केलं होतं की, 2021 मध्ये घेतलेलं 1.2 अब्ज डॉलरचं कर्ज हा कंपनीचा चुकीचा निर्णय होता. त्यांनी WhiteHat Jr. च्या अधिग्रहणाबाबतही भाष्य करताना सांगितलं की, भारतीय शिक्षकांना जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी संधी कंपनीने गमावली.
एकेकाळी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारी कंपनी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या Byju’s साठी सध्या संकटांचा काळ सुरू असून, संस्थापकांवरील ही कारवाई कंपनीच्या प्रतिमेसाठी आणखी मोठा धक्का मानली जात आहे.