

Bank of Baroda Scam: लखनऊमध्ये बँक ऑफ बडोदाच्या एका शाखेत कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. अनेक खातेदारांच्या खात्यातून लाखो रुपये अचानक गायब झाल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. या प्रकरणानंतर बँकेत ग्राहकांची गर्दी वाढू लागली असून, संतप्त खातेदारांनी थेट पोलिस ठाण्याचा रस्ता धरला.
हा प्रकार पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शकुंतला मिश्रा विद्यापीठ परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडल्याचे सांगितले जात आहे. ग्राहकांचा आरोप आहे की, शाखा व्यवस्थापकाने काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्यांच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढली. खात्याची चौकशी करण्यासाठी बँकेत गेलेल्या ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, उलट कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी याच बँकेत संशयास्पद परिस्थितीत आग लागल्याची घटना घडली होती. त्या घटनेची तक्रार शाखा व्यवस्थापकांनीच दिली होती. मात्र, आता ग्राहकांकडून ही आग महत्त्वाचे कागदपत्रे नष्ट करण्यासाठी मुद्दाम घडवून आणली असावी, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
ग्राहकांच्या तक्रारीनंतर पारा पोलीस ठाण्यात शाखा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस तपास सुरू असून, बँकेचे आर्थिक व्यवहार, कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरातील खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ग्राहक आपापल्या खात्यांची तातडीने तपासणी करण्यासाठी बँकेत जात आहेत.
बँक प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसल्याने ग्राहकांचा रोष अधिकच वाढताना दिसत आहे. हा प्रकार केवळ एका शाखेपुरता मर्यादित आहे की यामागे मोठे आर्थिक जाळे आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, या घटनेमुळे बँकांतील अंतर्गत नियंत्रण व्यवस्था, पारदर्शकता आणि ग्राहकांच्या पैशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.