Air India Flights: एअर इंडियाचा मोठा निर्णय; अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स केल्या बंद, कोणते मार्ग प्रभावित होणार?

Air India International Flights: जेट इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे एअर इंडियाने जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Air India International Flights
Air India International FlightsPudhari
Published on
Updated on

Air India International Flights: जेट इंधनाच्या वाढत्या किंमतींचा फटका आता विमान प्रवाशांनाही बसू लागला आहे. एअर इंडियाने जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील फ्लाइट सेवा तात्पुरत्या बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही परदेश प्रवासाचे नियोजन करत असाल किंवा आधीच तिकीट बुक केले असेल, तर तुमच्या फ्लाइट स्टेटसबाबत एकदा खात्री करून घ्या.

माहितीनुसार, एअर इंडियाने आपल्या दिल्ली हबवरून चालणाऱ्या काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर थेट परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. शिकागो, नेवार्क, सिंगापूर आणि शांघाय या महत्त्वाच्या शहरांसाठी काही काळ फ्लाइट्स पूर्णपणे बंद राहणार आहेत. याशिवाय सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस आणि टोरोंटोसारख्या मार्गांवरील उड्डाणांची संख्या कमी केली जाणार आहे. एकूणच कंपनीने दररोजच्या सुमारे १०० आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात केल्याची माहिती समोर आली आहे.

Air India International Flights
War Impact: काळ मोठा कठीण! युद्धामुळे जगभरातील देशांनी काय पावलं उचलली?

या निर्णयामागचं मुख्य कारण म्हणजे जेट इंधनाच्या किंमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ. सध्या जागतिक स्तरावर जेट इंधनाची सरासरी किंमत प्रति बॅरल १६२.८९ डॉलरवर पोहोचली. फेब्रुवारीच्या अखेरीस हीच किंमत सुमारे ९९ डॉलर होती. म्हणजे काही महिन्यांतच इंधनाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा हिस्सा जवळपास ४० टक्क्यांपर्यंत असतो. त्यामुळे किंमतीतील थोडीशी वाढही कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम करते.

विशेष म्हणजे, एअर इंडियासमोर इतर विमान कंपन्यांपेक्षा अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या उड्डाणांना लांब मार्गाने जावे लागत आहे. त्यामुळे इंधनाचा वापर वाढत आहे आणि क्रूचा खर्चही वाढत आहे. काही उत्तर अमेरिकन मार्गांवरील विमानांना आता व्हिएन्ना किंवा स्टॉकहोम येथे थांबा घ्यावा लागत असल्याने खर्चात आणखी वाढ झाली आहे.

दरम्यान, एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन यांनी नुकतेच कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, वाढत्या इंधन खर्चामुळे आणि हवाई मार्गांवरील निर्बंधांमुळे काही आंतरराष्ट्रीय मार्ग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहिलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात आणखी उड्डाणांमध्ये कपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Air India International Flights
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान कोसळलं; गोजुबावी परिसरात अपघात, वैमानिक बचावला|Video

दिल्लीमध्ये जेट इंधनाच्या किंमती मार्चच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी इशारा दिला आहे की, इंधनाच्या दरात आणखी वाढ झाली तर अनेक मार्गांवरील उड्डाणे आर्थिकदृष्ट्या परवडणारी राहणार नाहीत. परिणामी प्रवाशांना फ्लाइट्स रद्द होणे, वेळापत्रक बदलणे किंवा महाग तिकिटांचा सामना करावा लागू शकतो.

एकंदरीत, वाढत्या इंधन दरांचा थेट परिणाम आता विमान सेवांवर दिसू लागला असून, परदेश प्रवास करणाऱ्यांसाठी येणारे काही महिने आव्हानात्मक ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news