पुढारी ऑनलाईन: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी कौन्सिलने कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय आज मागे घेतला आहे. जीएसटी कौन्सिलने यापूर्वी कपड्यांवरील जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 7 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक राज्ये आणि वस्त्रोद्योग संघटना हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत होते.
जीएसटी मंडळ 1 जानेवारी, 2022 पासून, कापड उत्पादनांवर जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के एवढी वाढ केली जाईल, असे निश्चित केले होते, पण राज्य सरकार आणि कापड उद्योग जीएसटी दर वाढीच्या विरोधात होते. त्यामुळे जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यावर चर्चा होऊन जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.
अनेक राज्यांनी 1 जानेवारी 2022 पासून कापड आणि पादत्राणांवर जीएसटी 5 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास विरोध केला आहे. हा प्रस्तावित नवीन दर पुढे ढकलण्याची मागणी राज्यांकडून केंद्राकडे करण्यात येत होती. GST कौन्सिलची बैठक शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होत आहे . या बैठकीत वाढलेले जीएसटीचे दर मागे घेण्याबाबत निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमवेत अर्थसंकल्पपूर्व बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ते कापड उत्पादनांवरील जीएसटी दर पाच टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या बाजूने नाहीत. गुजरातने केलेल्या या मागणीला पश्चिम बंगाल, दिल्ली, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांनीही पाठिंबा दिला आहे.