Cisco Layoffs | ‘सिस्को सिस्टम्स’चा ४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ, यामागील कारण काय? | पुढारी

Cisco Layoffs | 'सिस्को सिस्टम्स'चा ४ हजार कर्मचाऱ्यांना नारळ, यामागील कारण काय?

पुढारी ऑनलाईन : नेटवर्किंग इक्विपमेंट बनवणारी सर्वात मोठी कंपनी सिस्को सिस्टम्सची कॉर्पोरेट टेक क्षेत्रातील मंदीमुळे हजारो नोकऱ्या कमी करण्याची योजना आहे. पुनर्रचना योजनेमुळे सिस्कोच्या सुमारे ५ टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल, असे कंपनीने बुधवारी स्पष्ट केले. सिस्को सिस्टम्सकडे गेल्यावर्षी जवळपास ८५ हजार कर्मचारी होते. यातील सुमारे ४ हजार नोकऱ्या कमी केल्या जाणार आहेत. कंपनीच्या पुनर्रचनेसाठी सुमारे ५०० दशलक्ष डॉलर खर्च येईल, असे सिस्कोने म्हटले आहे. (Cisco Layoffs)

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिस्कोने महसूल अंदाज ५३.८-५५ अब्ज डॉलरवरून ५१.५-५२.५ अब्ज डॉलरपर्यंत कमी केला आहे. दरम्यान, सॅन जोस, कॅलिफोर्निया येथील ही कंपनी खर्च मर्यादित ठेवत आहे. त्यांनी वृद्धीला चालना देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेजिन्सवर लक्ष केंद्रीत केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स यांनी कॉन्फरन्समध्ये विश्लेषकांना सांगितले की, ग्राहक अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल चिंतित आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडून ऑर्डरला विलंब होत आहे आणि त्यांना किती उपकरणांची आवश्यकता असू शकते यावर पुनर्विचार केला जातो. दरम्यान, या कमकुवत परिस्थितीमुळे काल अमेरिकेतील बाजारात सिस्कोचे शेअर्स ६.७ टक्क्यांनी घसरले.

नोव्हेंबर २०२२ मध्ये Cisco ने अर्निंग कॉलदरम्यान पुनर्रचनेचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी त्यांच्या सुमारे ५ टक्के कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला होता.

रॉयटर्सने याआधी दिलेल्या वृत्तानुसार, सिस्को येत्या काही दिवसांत नोकरकपात करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेतील सर्वात मोठ्या या नेटवर्किंग कंपनीने नोकरकपातीची टांगती तलवार लटकवल्याने हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊन ते बेरोजगार होण्याचा भीती आहे.

Layoffs.fyi च्या माहितीनुसार, २०२४ मध्ये १४४ टेक कंपन्यांनी ३४,५६० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. २०२३ मध्ये जगभरात २ लाख ६२ हजार नोकरकपात झाली होती.

टेलिकॉम मेकर्स नोकिया आणि एरिक्सनसह टेक कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी केल्या होत्या. Amazon, Alphabet आणि Microsoft सारख्या अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी अलीकडील काही दिवसांत नोकरकपात केली होती. आता सिस्कोने नोकरकपातीची योजना जाहीर केली आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. (Cisco Layoffs)

हे ही वाचा :

 

Back to top button