MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सवर भारताचे वेटेज नव्या उच्चांकावर; ‘या’ स्टॉक्सना होणार फायदा | पुढारी

MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सवर भारताचे वेटेज नव्या उच्चांकावर; 'या' स्टॉक्सना होणार फायदा

पुढारी ऑनलाईन : इंडेक्स प्रोव्हायडर एमएससीआय (MSCI) ने त्यांच्या फेब्रुवारीच्या आढाव्यानंतर ग्लोबल स्टँडर्ड (इमर्जिंग मार्केट्स) इंडेक्समध्ये भारताचे वेटेज १८.२ टक्क्यांच्या ऐतिहासिक उच्चांकापर्यंत वाढवले आहे. २९ फेब्रुवारी रोजी बाजार बंद झाल्यानंतर हे बदल लागू होतील. नोव्हेंबर २०२० पासून या इंडेक्समध्ये भारताचे वेटेज जवळपास दुप्पट झाले आहे. सध्या ते १७.९ टक्के आहे, असे Reuters दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. MSCI ने फेब्रुवारीच्या आढाव्यात ५ भारतीय स्टॉक्सचा त्याच्या ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये समावेश केला आहे. याउलट, त्यांनी ६६ चिनी स्टॉक हटवले आहेत. चीनचे वेटेज २५.४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. जे एका वर्षापूर्वी २६.६ टक्के होते.

२०२० मध्ये भारताची प्रमाणित परदेशी मालकी मर्यादा (FOL), देशांतर्गत इक्विटीमध्ये सततची तेजी आणि विशेषत: चीन सारख्या उदयोन्मुख बाजारांची तुलनेने खालावलेली कामगिरी यामुळे ग्लोबल स्टँडर्ड (इमर्जिंग मार्केट्स) इंडेक्समध्ये भारताचे स्थान मजबूत झाले असल्याचे नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चने एका नोटमध्ये म्हटले आहे.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा ओघ आणि स्थिर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या सहभागामुळे २०२४ च्या सुरुवातीलाच भारताची एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये २० टक्क्यांचा टप्पा पार करण्याची क्षमता आहे, असे नुवामाने पुढे म्हटले आहे.

सरकारी मालकीची पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा लार्ज-कॅप इंडेक्समध्ये समावेश करण्यात आला आहे. तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स आणि NMDC यांना मिड-कॅप निर्देशांकात समाविष्ट करण्यात आले आहे. GMR एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरला स्मॉल-कॅपमधून मिड-कॅप इंडेक्समध्ये नेले आहे.

नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या मते, फेब्रुवारीच्या आढाव्यानंतर भारतातील स्टँडर्ड आणि स्मॉल-कॅप इंडेक्समध्ये १.२ अब्ज डॉलर्सची परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक (FPI) येऊ शकते.

हे ही वाचा :

Back to top button