टाटा भारतात करणार आयफोन निर्मिती! ‘विस्ट्रॉन कॉर्प’शी करणार करार | पुढारी

टाटा भारतात करणार आयफोन निर्मिती! 'विस्ट्रॉन कॉर्प'शी करणार करार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टाटा समूह लवकरच भारत आणि इतर जागतिक बाजारपेठेसाठी आयफोन निर्मिती करणारी पहिली भारतीय कंपनी बनू शकते. कर्नाटकातील तैवानस्थित विस्ट्रॉन कॉर्पचा कारखाना ताब्‍यात घेण्‍यासाठी टाटा काही महिन्यांपासून चर्चा करत आहेत, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे. (iPhones and Tata )

ब्‍लूमबर्गने म्‍हटले आहे की, तैवानस्थित विस्ट्रॉन कॉर्प आणि टाटा समूह हे करारासाठी सज्‍ज आहेत. यासंदर्भात ऑगस्‍ट २०२३ पर्यंत औपचारिक घोषणा होण्‍याची शक्‍यत आहे. सध्‍या विस्‍ट्रॉन कॉर्प ही कंपनी कर्नाटकमध्‍ये आयफोन १४ची निर्मिती करते. आता करार अंतिम झाल्यानंतर टाटा समूहाच्या देखरेखीखाली आयफोनची निर्मिती होणार आहे.

‘ब्‍लूमबर्ग’ने आपल्‍या अहवालात नमूद केले आहे की, कर्नाटकातील विस्ट्रॉनच्या कारखान्याची किंमत $600 दशलक्ष (रु. 4000 कोटींहून अधिक) आहे. येथे १० हजारपेक्षा अधिक कामगार काम करतात. कंपनीने यंदाच्‍या आर्थिक वर्षात $1.8 अब्ज किमतीचे आयफोन निर्मितीचे अॅपलबरोबर करार केला आहे. मार्च 2024 पर्यंतच्या आर्थिक वर्षात हा करार आहे. यामध्‍ये पुढील वर्षापर्यंत कारखान्याचे कर्मचारी संख्या तिप्पट करण्याचाही प्रस्‍ताव आहे. टाटा समूहाने हा करार कायम ठेवण्‍याचे मान्‍य केले असल्‍याचे ‘ब्‍लूमबर्ग’ने म्‍हटले आहे.
विस्ट्रॉन व्यतिरिक्त, Apple ला iPhone 13, iPhone 12 आणि iPhone SE सह निवडक iPhone मॉडेल्स मिळतात, जे भारतात Foxconn टेक्नॉलॉजी ग्रुप आणि Pegatron Corp सारख्या तैवानच्या पुरवठादारांद्वारे भारतात एकत्र केले जातात.

टाटाचा भारतातील विस्ट्रॉन कारखाना ताब्यात घेण्याचा करार देखील महत्त्वपूर्ण असेल कारण अनेक टेक कंपन्या त्यांच्या प्रीमियम उपकरणांच्या असेंब्लीसाठी चीनच्या पर्यायांचा विचार करत आहेत. भारतात कारखाने सुरू करण्यासाठी इतर स्मार्टफोन कंपन्‍यांना आकर्षित करण्यातही भारत यशस्वी झाला आहे.

सॅमसंगने उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जगातील सर्वात मोठा मोबाईल कारखाना सुरु केला आहे. Xiaomi आणि Vivo सह अनेक चायनीज ब्रँड्स त्यांची डिव्‍हाइसेस देशात निर्मिती करतात. येथे निर्मिती झालेले फोन इतरत्रही निर्यात होतात.

मागील महिन्‍यात ‘आयएएनएस’ला इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने माहिती दिली होती की, या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात देशातील स्मार्टफोन निर्यातीत १२८ टक्के लक्षणीय वाढ झाली आहे. मे महिन्यात, देशाने १२,००० कोटी रुपयांचे फोन निर्यात केले आहेत. यामध्‍ये आयफोनची निर्यात १० हजार कोटी रुपयांची होती.

हे ही वाचा :

Back to top button