

लंडन : जगातील सर्वात महागडी स्मार्टफोन मेकर कंपनी म्हणजे 'अॅपल'. 'अॅपल'चे आयफोन जगभर विविध कारणांमुळे चर्चेत असतात. या फोनची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि किंमतही चर्चेचा विषय असते. आयफोनची लोकप्रियताही मोठी असल्याचे दिसून येत होते. आता एका सर्व्हेमधून दिसून आले आहे की गेल्या अकरा वर्षांमध्ये प्रथमच आयफोनची लोकप्रियता घटली आहे. ही लोकप्रियता 'आयफोन 14' बाबतची आहे.
गेली काही वर्षे 'अॅपल' तेच तेच डिझाईन असलेले आयफोन लाँच करीत आहे. त्यामुळे त्यामध्ये नावीन्य नसल्याची अनेक ग्राहकांची भावना झाली. त्याचा परिणाम असा झाला की गेल्या अकरा वर्षांमध्ये प्रथमच आयफोनची लोकप्रियताही घसरली. गेल्या दशकभरात 'आयफोन 14' ला तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही. आयफोनच्या इतिहासात 'आयफोन 5' वर अखेरची टीका झाली होती. त्यानंतर 'आयफोन14' ला सर्वात कमी 5 स्टार रेटिंग मिळालेले आहेत.
हा सर्व्हे 'परफेक्टरेक' नावाच्या कंपनीने केला आहे. त्यांनी 6,69,000 हून अधिक यूजर्सनी दिलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला. 'आयफोन14' लोकांमध्ये पूर्वीच्या आयफोनप्रमाणे लोकप्रिय झालेला नाही असे या सर्व्हेमधून दिसून आले. 'आयफोन 5' च्या लोकप्रियतेत थोडीशी घट झाल्याचेही दिसून आले. याशिवाय 'आयफोन 6' ते 'आयफोन 13' पर्यंतचे सर्व फोनचे रेटिंग वाढले आहे. 'आयफोन-13' ला 80 टक्क्यांपर्यंत 5 स्टार रेटिंग मिळाले तर 'आयफोन14' हा 72 टक्क्यांवर घसरला आहे. ही घसरण फक्त 'आयफोन14' च्या बेस मॉडेलमध्येच नाही तर 'आयफोन 14 प्रो' आणि 'प्रो मॅक्स' मध्येही दिसून आली.