Closing Bell : शेअर बाजाराने रचला नवा इतिहास, सर्वकालीन नवीन उच्चांकावर | पुढारी

Closing Bell : शेअर बाजाराने रचला नवा इतिहास, सर्वकालीन नवीन उच्चांकावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्‍मक संकेतांचे सकारात्‍मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसले. शेअर बाजाराने आज (दि. ३ ) विक्रमी प्रारंभासह इतिहास रचत ६५ हजार अंकांचा टप्‍पा ओलांडला. सेन्सेक्स ४८६.४९ अंकांनी वाढून ६५२०५ असा नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टी १३३ अंकांनी वधारत १९३२२ वर बंद झाला. शेअर बाजारातील ही ऐतिहासिक उच्‍चांकाची कामगिरीने गुंतवणूकदार सुखावला आहे.

शेअर बाजार आजचे व्‍यवहार सुरु होताच सेन्‍सेक्‍स आणि निफ्‍टी उच्चांकी पातळीवर उघडले. सुरुवातीच्या व्यापारादरम्यान सेन्सेक्सने ६५,००० चा टप्पा ओलांडून ६५,०४१ हा सर्वकालीन उच्चांक गाठला. आपली विक्रमी वाटचाल सुरु ठेवत निफ्टी 50 ने 19,300 चा टप्पा ओलांडून 19,318 चा ताज्या सार्वकालिक उच्चांक गाठला तर बँक निफ्टीने ४५,००० चा टप्पा ओलांडून नवीन उच्चांक गाठला.  आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात ऑटो समभाग, एचडीएफसी आणि आरआयएलच्‍या समभागांनी मुसंडी मारल्‍याचे चित्र होते.

कोणत्‍या शेअर्संनी अनुभवली तेजी?

एचडीएफसी, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्सनी तेजी अनुभवली. तर मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि ॲक्सिस बँकच्‍या शेअर्सनी घसरण अनुभवली.

स्पाइसजेटच्‍या शेअर्समध्‍ये २ टक्‍क्‍यांहून अधिक वाढ

देशांतर्गत विमान कंपनी स्पाइसजेटने सिटी युनियन बँकेकडून 100 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. एअरलाइनने 3 जुलै रोजी एक्सचेंजला कळवले की, त्यांनी 30 जून 2023 रोजी 25 कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता भरला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button