Stock Market Closing | सेन्सेक्सची ६० हजाराला गवसणी, 'या' शेअर्सची दमदार कामगिरी, जाणून घ्या आजच्या ट्रेडिंग सत्रात काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing | सेन्सेक्सची ६० हजाराला गवसणी, 'या' शेअर्सची दमदार कामगिरी, जाणून घ्या आजच्या ट्रेडिंग सत्रात काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : कार्पोरेट कंपन्या आणि काही खासगी बँकांच्या तिमाही कमाईत सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक चिंता कमी झाली आहे. परिणामी आज सोमवारी (दि. २४) सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून ५९,८०० वर होता. तर निफ्टी ३५ अंकांच्या वाढीसह १७,६६० वर होता. त्यानंतर बाजारात काही वेळ सुस्ती राहिल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत व्यवहार केला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे ४०० हून अधिक अंकांनी वाढून ६० हजारांवर पोहोचला होता. त्यानंतर सेन्सेक्स ४०१ अंकांच्या वाढीसह ६०,०५६ वर बंद झाला. तर निफ्टी ११९ अंकांनी वाढून १७,७४३ वर स्थिरावला.
(Stock Market Closing)

‘हे’ ठरले टॉप गेनर्स

आजच्या ट्रेडिंग सत्रात फार्मा स्टॉक्सवर दबाव राहिला. तर IT स्टॉक्समध्ये तेजी राहिली. रिलायन्स, ICICI Bank बँकेचे शेअर्स आज वाढले. तर अदानी ग्रीन एनर्जी, येस बँक, अदानी ट्रान्समिशन हे शेअर्स आज ३ टक्क्यांहून अधिक घसरले. सेन्सेक्सवर विप्रो (२.७२ टक्के वाढ), आयसीआयसीआय बँक (२.३७ टक्के वाढ), ॲक्सिस बँक (२.३४ टक्के वाढ), टायटन (२.१४ टक्के वाढ), एचडीएफसी (०.९६ टक्के वाढ), अल्ट्राटेक सिमेंट (१.२० टक्के वाढ), एचडीएफसी बँक (०.९१ टक्के वाढ), एनटीपीसी (.८८ टक्के वाढ), टेक महिंद्रा (०.७७ टक्के वाढ), टाटा मोटर्स (०.७४ टक्के वाढ), रिलायन्स (०.४७ टक्के वाढ) हे शेअर्स ‍वधारले. तर सन फार्मा, मारुती, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले होते.

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सचा शेअर ८ टक्क्यांने वाढला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एचडीएफसी बँक अथ‍ा एचडीएफसी लिमिटेडला एचडीएफसी लाइफ आणि एचडीएफसी ईआरजीओ मधील शेअरहोल्डिंग ५० टक्क्यांहून अधिक वाढवण्याची परवानगी दिल्यानंतर बीएसईवरील सोमवारच्या व्यवहारात एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सचा शेअर ८ टक्के वाढून ५५४.६ रुपयांवर पोहोचला.

आयटीमध्ये विप्रो आघाडीवर

विप्रोचा शेअर सुमारे २ टक्के वाढून ३७७ रुपयांवर वर पोहोचला. २७ एप्रिल रोजी शेअर बायबॅक प्रस्तावावर विचार करेल आणि मार्च तिमाही रिपोर्ट कार्ड जारी करेल, असे कंपनीने जाहीर केल्यानंतर त्यांचे शेअर्स वधारले.

इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये चढ-उतार

इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये आज सुमारे १ टक्के वाढ झाली. भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील या बँकेच्या शेअरमध्ये आज चढ-उतार दिसून आला. मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत इंडसइंड बँकेचा निव्वळ नफा ५० टक्के वाढून २,०४० कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत त्यांचा नफा १,३६१ कोटी रुपये होता. सुरुवातीला तेजीत असलेला हा शेअर बाजार बंद होताना खाली आलेला दिसला.

IndusInd Bank सोबतच Bank of Maharashtra, Persistent Systems आणि अन्य काही कंपन्या आज त्यांचे तिमाही उलाढालीचे निकाल जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार दिसून आला.

येस बँकेचा शेअर गडगडला

येस बँकेचा शेअर BSE वर सोमवारच्या इंट्राडे ट्रेडमध्ये ४.५ टक्के घसरून १५.४८ रुपयांवर आला. कारण बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक ४५ टक्के घट नोंदवली. ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेने २०२.४३ कोटींचा नफा मिळवला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने ३६७ कोटींचा नफा नोंदवला होता. अपेक्षेपेक्षा बँकेने कमी नफा मिळवल्याने शेअरवर परिणाम झाला. (Stock Market Closing)

आशियाई बाजार कमजोर

आज आशियाई बाजारांतही आज कमजोरी दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांह वगळता आशियातील बहुतांश निर्देशांक घसरले होते. निक्केई २२५ किरकोळ वाढून २८,५९३ वर पोहोचला. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.८२ टक्के घसरून २,५२३ वर आला. चीनचा शांघाय कंपोझिट ०.७८ टक्के ०.७८ टक्के घसरून ३,२७५ वर बंद झाला. आशियातील घसरणीचा मागोवा घेत युरोपियन शेअर्सही खाली आले होते.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

दरम्यान, व्याजदरवाढीच्या चिंतेने कच्च्या तेलाचे दर १ टक्क्याहून अधिक घसरले आहेत. ब्रेंट क्रूड दरात १.११ टक्के घट होऊन दर प्रति बॅरेल ८०.७५ डॉलरवर आला आहे. तर सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २ पैशांनी घसरून ८२.०८ वर आला.

 हे ही वाचा :

Back to top button