Stock Market Closing | सेन्सेक्स ३४६ अंकांनी वाढून ५७,९६० वर बंद, PSU बँकिंग स्टॉक्स वधारले, जाणून घ्या सविस्तर | पुढारी

Stock Market Closing | सेन्सेक्स ३४६ अंकांनी वाढून ५७,९६० वर बंद, PSU बँकिंग स्टॉक्स वधारले, जाणून घ्या सविस्तर

Stock Market Closing : आशियाई बाजारातील तेजीचा मागोवा घेत तसेच बँकिंग, फायनान्सियल आणि ऑटो स्टॉक्सच्या आघाडीच्या जोरावर आज बुधवारी (दि.२९) भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांहून अधिक वाढून ५७,८०० वर गेला. तर निफ्टी १७ हजारांवर व्यवहार करत होता. पण आज मजबुतीसह खुल्या झालेल्या बाजारात वरच्या स्तरावर विक्री दिसून आली. दुपारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांत चढ-उतार दिसून आला. त्यानंतर सेन्सेक्स ३४६ अंकांच्या वाढीसह ५७,९६० वर बंद झाला. तर निफ्टी १२९ अंकांनी वाढून १७,०८० वर स्थिरावला. बँकिंग, ऑटो, मेटल स्टॉक्समध्ये तेजी होती. तर ऑईल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्सवर दबाव राहिला. ऑटो निर्देशांक सुमारे १ टक्क्याने वाढला. अदानींच्या काही शेअर्समध्ये तेजी राहिली.

हे होते टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

दुपारच्या सत्रात सेन्सेक्सवर एचसीएल टेक (१.६६ टक्के वाढ), अल्ट्राटेक सिमेंट (१.५५ टक्के वाढ), एम अँड एम (१,२३ टक्के वाढ), बजाज फायनान्स (१.१५ टक्के वाढ) हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर एशियन पेंट्स (-०.३६ टक्के), टाटा स्टील (-०.५९ टक्के), पॉवर ग्रिड (-०.६३ टक्के), भारती एअरटेल (-१.०६ टक्के), रिलायन्स (-१.१५ टक्के) हे शेअर्स टॉप लूजर होते. निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेस (६.५८ टक्के वाढ), अदानी पोर्ट्स (५.११ टक्के वाढ), आयशर मोटर्स (१.७२ टक्के वाढ), एचसीएल टेक (१.६० टक्के वाढ) हे टॉप गेनर्स होते. तर बीपीसीएल (-०.६६ टक्के), हिंदाल्को (-०.६७ टक्के), यूपीएल (-१.०८ टक्के), भारती एअरटेल (-१.१० टक्के), रिलायन्स (-१.२० टक्के) हे टॉप लूजर्स होते. इंडसइंड बँक, एसबीआय आणि ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले. दरम्यान, वेदांता कंपनीने प्रति शेअर २०.५० रुपये पाचवा अंतरिम लाभांश जाहीर केल्यानंतर त्यांचे शेअर्स किरकोळ वाढले.

PSU बँकिंग स्टॉक्स वधारले

सकाळच्या सत्रात PSU बँकिंग स्टॉक्स आज ४ टक्क्यांपर्यंत वाढले. या स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. यात बँक महाराष्ट्र (३.६८ टक्के वाढ), युको बँक (३.१० टक्के वाढ), इंडियन ओव्हरसीज बँक (३.०८ टक्के वाढ), बँक ऑफ इंडिया (३ टक्के वाढ), युनियन बँक ऑफ इंडिया (२.८४ टक्के वाढ), आयडीबीआय बँक (२.५४ टक्के वाढ), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (१.९९ टक्के वाढ), पंजाब नॅशनल बँक (१.५६ टक्के वाढ), कॅनरा बँक (१.१३ टक्के वाढ), बँक ऑफ बडोदा (०.९० टक्के वाढ) या शेअर्सचा समावेश होता.

ऑटोमध्ये UNO Minda, टीव्हीएस मोटर, आयशर मोटर, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, टाटा मोटर्स, अशोक लेलँड हे शेअर्स वाढले होते.

अदानींच्या काही शेअर्समध्ये तेजी परतली

दरम्यान, कालच्या घसरणीनंतर आज अदानी समूहाच्या शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार दिसून आला. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर ६.५८ टक्के वाढला. अदानींच्या काही शेअर्समध्ये आज खरेदी दिसून आली. अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी पोर्ट्स हे शेअर निफ्टीवर सर्वाधिक तेजीत होते.

आशियाई बाजारही वधारले

आशियाई बाजारात बुधवारी तेजी होती. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक २.३ टक्के वाढला. चीनमधील शांघाय कंपोझिट ०.१६ टक्के खाली आला. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १.३३ टक्के वाढून २७,८८३ वर बंद झाला. टॉपिक्स १.४६ टक्के आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.३७ टक्के वाढून बंद झाला. (Stock Market Closing)

हे ही वाचा :

Back to top button