अदानी एंटरप्रायझेसने मागे घेतला २० हजार कोटींचा FPO, गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार, गौतम अदानी काय म्हणाले पाहा? | पुढारी

अदानी एंटरप्रायझेसने मागे घेतला २० हजार कोटींचा FPO, गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार, गौतम अदानी काय म्हणाले पाहा?

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळत आहेत. याचा मोठा फटका अदानी समूहाला बसला आहे. आता अदानी एंटरप्रायझेसने त्यांचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी या एफपीओमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करणार असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हा एफपीओ का मागे घेतला यावर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी खुलासा केला आहे. FPO मागे घेण्याच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण बाजारातील अस्थिरता लक्षात घेता FPO पुढे कायम ठेवणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही असे कंपनीच्या बोर्डाचे मत असल्याचे गौतम अदानी यांनी म्हटले आहे.

”माझ्यासाठी माझ्या गुंतवणूकदारांचे हित सर्वोपरि आहे आहे आणि इतर सर्व काही दुय्यम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना संभाव्य तोट्यापासून वाचवण्यासाठी आम्ही FPO मागे घेतला. या निर्णयाचा आमच्या सध्याच्या व्यवहारांवर आणि भविष्यातील योजनांवर परिणाम होणार नाही. आम्ही वेळेवर अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करू”, असे अदानी यांनी नमूद केले आहे.

बाजारात सध्या अस्थिरता आहे. बाजार स्थिर झाल्यावर आम्ही आमच्या भांडवली बाजार धोरणाचा आढावा घेऊ. आम्ही ईएसजीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि आम्ही आमच्या प्रत्येक व्यवसायातून योग्य मार्गाने महसूल निर्माण करत राहू. आमचा ताळेबंद (balance sheet) मजबूत आहे. आमची EBIDTA पातळी आणि पैशाचा ओघ खूप मजबूत आहे, असा दावा अदानींनी केला आहे.
अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ नुकताच जारी करण्यात आला होता. त्यात पैसे गुंतवण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत संधी देण्यात आली होती. दरम्यान, अदानींचे शेअर्स घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी अदानी समूहाने त्यांचा हा एफपीओ मागे घेतला.

अदानी समूह (Adani Group) गेल्या अनेक वर्षापासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉड करत असल्याचा दावा अमेरिकेतील शॉर्ट- सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने त्यांच्या अहवालातून केला होता. या अहवालानंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला होता आणि अदानींचे सर्व शेअर्स धडाधड कोसळले. या अहवालामुळे अदानी समुहाचे मुल्यांकन ४८ अब्ज डॉलरने कमी झाले. आता अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालावर ४१३ पानी निवेदनातून उत्तर दिले आहे. आम्ही सर्व कायद्यांचे पालन केले आहे. आम्ही जे काही व्यवहार केले आहेत ते भारतीय कायदे आणि अकाउंटिंग स्टॅडर्ड्सला धरुन आहेत, असा दावा अदानी समूहाने केला आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल २५ जानेवारी रोजी समोर आला होता. त्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. याशिवाय अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत १८ टक्क्यांची घट झाली. यामुळे जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांची चौथ्या स्थानावरून ११ व्या स्थानावर घसरण झाली. हिंडेनबर्ग रिसर्चचा अदानींविरोधात अहवाल १०६ पानांचा होता. हिंडेनबर्गने केलेल्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपांना अदानी समूहाने रविवारी ४१३ पानांतून उत्तर दिले होते.

हिंडेनबर्गचा अहवाल हा भारत आणि त्याच्या स्वतंत्र संस्थांवर हल्ला असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. ‘हा केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला हल्ला नसून भारत आणि त्यांच्या संस्थांची गुणवत्ता, प्रामाणिकता तसेच स्वातंत्र्यासोबत महत्वाकांक्षा आणि त्याच्या विकासावर केलेला नियोजित हल्ला आहे.’ असे नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button