अदानी-‘हिंडेनबर्ग’ अर्थयुद्ध भडकणार! | पुढारी

अदानी-‘हिंडेनबर्ग’ अर्थयुद्ध भडकणार!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने केवळ स्वार्थापोटी अदानी समूहालाच नव्हे, तर एकुणात भारत देशाला जाणीवपूर्वक टार्गेट केलेले आहे, अशी भूमिका अदानी समूहाने सोमवारी घेतली असून, ‘हिंडेनबर्ग’च्या आरोपांना 413 पानांचे उत्तर दिले. दुसरीकडे, ‘हिंडेनबर्ग’वर कायदेशीर कारवाईचे पर्याय अदानी समूह तपासत असताना, ‘हिंडेनबर्ग’ने अदानी समूहावरील आरोपांवर आपण ठाम असून, कुठल्याही कारवाईचा सामना करण्यास तयार आहोत, असे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अहवालातून अदानी समूहावर ठेवण्यात आलेल्या ठपक्यांचा अत्यंत विपरीत परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. ‘हिंडेनबर्ग’ने आपल्या 106 पानांच्या अहवालात अदानी समूहाच्या कारभाराबाबत एकूण 88 सवाल उपस्थित केले होते. या प्रश्नांनी उठलेल्या वावटळीने अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जागतिक श्रीमंतांच्या यादीतूनही खाली आले.

अदानी समूहाने कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केलेला आहे. तो लपविण्यासाठी त्यावर राष्ट्रवादाचे पांघरूण टाकणे उपयोगाचे नाही. आकाशच फाटलेले आहे, त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार आहात, असा प्रतिप्रश्न ‘हिंडेनबर्ग’ने अदानींच्या उत्तरावर सोमवारी उपस्थित केला.

भारत एक जिवंत लोकशाही तसेच उज्ज्वल भवितव्य असलेली उदयोन्मुख महाशक्ती आहे, यावर आमचाही विश्वास आहे; पण अदानी समूहामुळे या महाशक्तीच्या भवितव्यात बिघाड येऊ शकतो, यावरही आमचा तितकाच विश्वास आहे. तिरंग्याच्या आवरणाखाली दडून देशाला पद्धतशीरपणे लुटण्याचा उद्योग अदानी समूहाने चालविलेला आहे, असेही ‘हिंडेनबर्ग’ने म्हटले आहे.

शुक्रवारी बाजारात आलेला अदानी एंटरप्रायझेसचा 20 हजार कोटींचा एफपीओ मंगळवारी बंद होणार आहे. मंगळवारपर्यंत त्याला प्रतिसाद कसा मिळतो, त्यावर समूहाच्या विश्वासार्हतेची सारी मदार आहे. अल्प प्रतिसाद मिळाला, तर समूहाच्या शेअरवर बाजाराचा विश्वास तूर्त तरी राहिलेला नाही, हे समोर येईल. विश्वास कमावण्यासाठी अदानी समूह काय पावले उचलतो, ते पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. ‘हिंडेनबर्ग’ला उत्तर देऊन पहिले पाऊल अदानींनी उचललेलेच आहे.

खटला दाखल होणारच…

‘हिंडेनबर्ग रिसर्च’विरोधात काय कारवाई करता येईल, त्याबद्दलच्या कायदेशीर शक्यता अदानी समूहाकडून तपासल्या जात आहेत, असे समूहाचे लीगल हेड जलुंधवाला यांनी म्हटले आहे. लगोलग कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, अदानी समूहाने आमच्याविरुद्ध अमेरिकेत खटला दाखल करावा, असे प्रतिआव्हान ‘हिंडेनबर्ग’ने दिले आहे. आता अदानी समूह ‘हिंडेनबर्ग’विरुद्ध अमेरिकेत खटला दाखल करतो की भारतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button