Stock Market Crash | शेअर बाजार पुन्हा धडाम; गुंतवणूकदारांना १.५ लाख कोटींचा फटका, फायनान्शियल स्टॉक्सची खराब कामगिरी | पुढारी

Stock Market Crash | शेअर बाजार पुन्हा धडाम; गुंतवणूकदारांना १.५ लाख कोटींचा फटका, फायनान्शियल स्टॉक्सची खराब कामगिरी

Stock Market Crash : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढीची गती कमी करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे अमेरिकेसह आशियाई बाजारात सकारात्मक वातावरण राहिले. पण भारतीय शेअर्संना दिशा मिळवण्यासाठी आज गुरुवारच्या (दि.५) व्यवहारात संघर्ष करावा लागला. अमेरिका आणि आशियाई शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि.५) तेजीत सुरुवात केली होती. पण त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीची वाटचाल स्थिर पातळीवरून घसरणीपर्यंत झाली. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे ५९७ अंकांनी घसरून ६०,१३१ वर आला. तर निफ्टी १८ हजारांच्या खाली होता. त्यानंतर ही घसरण बाजार बंद होईपर्यंत कायम राहिली. सेन्सेक्स ३०४ अंकांच्या घसरणीसह ६०,३५३ वर बंद झाला. तर निफ्टी ५० अंकांनी घसरून १७,९९२ वर स्थिरावला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे १.५ लाख कोटींचा फटका बसला. बीएसईवरील बाजार भांडवल (एम-कॅप) १.४६ लाख कोटींनी कमी होऊन कालच्या २८१.७५ लाख कोटींच्या तुलनेत २८०.२५ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयटीसी, एल अँड टी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड आणि टाटा मोटर्स या आघाडीच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली. आजच्या सत्रात तब्बल २८ स्टॉक्सनी ५२ आठवड्यांची निचांकी पातळी गाठली.

चीनमधील कोरोना संकट, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरवाढीबाबतच्या बदलत्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत असलेले दिसत आहेत. याचा फटका सलग दुसऱ्या सत्रात बसला. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्याने घसरले होते. यामुळे गुंतवणूकदारांना २.७ लाख कोटींचा फटका बसला होता.

बँक, फायनान्शियल शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

बजाज फायनान्सचे शेअर्स ६.९६ टक्क्यांनी घसरले. तसेच बजाज फिनसर्व्ह ५.३६ टक्क्यांनी घसरले. हे दोन्ही आजच्या व्यवहारातील टॉप लूजसे होते. आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स २.४५ टक्के, पॉवर ग्रीड १.३५ टक्के, टायटन १.७७ टक्के, इन्फोसिस १.५० टक्के, ॲक्सिस बँक १.४५ टक्के, विप्रो १.१७ टक्के, टेक महिंद्राचे शेअर्स १.३० टक्क्यांनी खाली आले होते. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस १.३२ टक्क्यांनी आणि निफ्टी बँक ०.९२ टक्क्यांनी घसरले. तर निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी ग्रीन झोनमध्ये राहिले. (Stock Market Crash)

NSE आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी २,६२०.८९ कोटी शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सुमारे ७७३.५८ कोटी शेअर्सची खरेदी केली.

कोरोना संकट, तेलाच्या किमतीतील घसरण

चीनमधील वाढत्या कोविड-१९ रुग्णसंख्येच्या चिंतेमुळे बुधवारी तेलाच्या किमती घसरल्या होत्या. यामुळे गेल्या दोन सत्रांतील घसरण ९.४ टक्क्यांवर गेली आहे. गुरुवारी तेलाच्या किमतीत सुधारणा झाली होती. पण तरीही कच्च्या तेलाचे भाव अद्याप प्रति बॅरल ७९ डॉलरच्या खाली आहेत.

अमेरिका, आशियातील बाजारात तेजी

अमेरिकेतील शेअर बाजारात २ दिवसांच्या घसरणीला ब्रेक मिळाला. येथील प्रमुख निर्देशांक S&P 500, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल आणि नॅस्डॅक कंपोझिट वधारुन बंद झाले. अमेरिका बाजारातील तेजीचा मागोवा घेत आशियाई बाजार हिरव्या रंगात व्यवहार केला. MSCI चा जपानबाहेरील आशिया पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक जवळपास एक टक्क्याने वाढला. गुरुवारी आशियातील स्टॉक्स वधारले होते. जपानचा निक्केई निर्देशांक ०.४० टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.३८ टक्के आणि चीनचा शांघाय कंपोझिट १ टक्क्याने वाढला.

हे ही वाचा :

Back to top button