Stock Market Crash | मंदीचा फटका! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारातून उडाले २.७ लाख कोटी | पुढारी

Stock Market Crash | मंदीचा फटका! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारातून उडाले २.७ लाख कोटी

Stock Market Crash : २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच आर्थिक मंदी आणि कोरोना संकटामुळे जगभरातील बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यात अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह कठोर आर्थिक धोरण राबवणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. यामुळे अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक रात्रभर घसरले. तर बुधवारी आशियाई बाजारात संमिश्र वातावरण राहिले. या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजाराने स्थिर सुरुवात केली होती. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी स्थिर पातळीवरुन दुपारी १२ च्या सुमारास खाली घसरला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स ६३४ अंकांनी घसरून ६०,६५९ पर्यंत खाली आला होता. सेन्सेक्सची ही घसरण १.०४ टक्के एवढी होती. तर निफ्टी या वेळेत १८१ अंकांनी घसरून १८,०५१ वर होता. यामुळे गुंतवणूदारांना २.७ लाख कोटींचा फटका बसून बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २८१.९ लाख कोटींपर्यंत खाली आले. त्यानंतर सेन्सेक्स ६३६ अंकांनी घसरून ६०,६५७ वर बंद झाला. तर निफ्टी १८९ अंकांच्या घसरणीसह १८,०४२ वर स्थिरावला. मेटल, रियल्टी, PSU बँक निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्याहून अधिक घसरले.

अमेरिका आणि युरोपमध्ये आर्थिक मंदीची भीती

अमेरिका आणि युरोपमध्ये आर्थिक मंदीची भीती कायम आहे. आर्थिक मंदीच्या भितीने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ६ महिन्यांतील उच्चांकी स्तरावर पोहोचलेत. फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा दरवाढीची शक्यता आणि चीनमधील कोरोना संकट हे शेअर बाजारातील घसरणीला कारणीभूत घटक ठरले.

‘हे’ टॉप होते टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एशियन पेंट्स, मारुती सुझूकी यांनी लाल रंगात व्यवहार केला. तर इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि पॉवर ग्रीड हे टॉप लूजर्स होते. यांचे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले. (Stock Market Crash)

क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंगात

आजच्या व्यवहारात क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंगात राहिले. निफ्टी रियल्टी आणि निफ्टी मेटल सुमारे २ टक्क्यांनी खाली आले. निफ्टी ५० पैकी २९ मध्ये घसरण झाली. त्यात हिंदाल्को इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील यांचा समावेश होता. वैयक्तिक शेअर्सवर नजर टाकली तर तिसऱ्या तिमाहीत सरासरी सकल संचालित उत्पादनात ९ टक्के घट नोंदवल्यानंतर वेदांतचे शेअर्स ३ टक्क्यांनी घेसरले.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा

NSE वर सार्वजनिक केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कालच्या व्यवहारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) कल पुन्हा विक्रीच्या बाजूने होता. त्यांनी शेवटच्या सात दिवसांत ६,६०५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

आशियात संमिश्र वातावरण

चीन कोरोनाच्या लाटेतून सावेरेल या आशेने आशियातील शेअर बाजारात संमिश्र वातावरण राहिले. बुधवारी २०२३ वर्षातील ट्रेडिंग सत्राच्या पहिल्या दिवशी जपानचा निक्केई निर्देशांक जवळपास १० महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर घसरून बंद झाला. निक्केई निर्देशांक बुधवारी १.४५ टक्क्याने घसरून २५,७१६ वर आला. निक्केई १५ मार्चपासूनचा सर्वात कमी पातळीवर येऊन बंद होण्याची ही पहिली वेळ आहे. तर टॉपिक्स १.२५ टक्क्याने घसरून १,८६८.१५ वर आला.

अमेरिकेतील शेअर बाजारही गडगडला

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने गेल्या महिन्यात व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. त्याआधी सलग चारवेळा ७५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. आता ही व्याजदरवाढ जास्त काळ राहू शकते, असे संकेत मिळाल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण दिसून आली.

हे ही वाचा :

Back to top button