Stock Market Crash | शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला; गुंतवणूदारांना ३.५ लाख कोटींचा फटका! | पुढारी

Stock Market Crash | शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला; गुंतवणूदारांना ३.५ लाख कोटींचा फटका!

Stock Market Crash : कमकुवत जागतिक संकेतामुळे आज भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री पहायला मिळाली. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ६७० अंकांनी घसरला. तर निफ्टी १८ हजारांच्या खाली आला आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढ कायम ठेवणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यात काही देशांत कोरोनाची भिती निर्माण झाली आहे. यामुळे अमेरिकेसह आशियाई बाजारात घसरण झाली. याचे पडसाद शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातही उमटले.

बँक आणि आयटी शेअर्समुळे मूड खराब

सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली. आजच्या व्यवहारात बँक आणि आयटी शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टीवर बँक आणि आयटी इंडेक्स सुमारे १ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर ऑटो, मेटल आणि रियल्टी इंडेक्सदेखील १ टक्क्यांनी कमकुवत झाला. आजच्या टॉप लुजर्समध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील, विप्रो, इन्फोसिस, मारुती, एसबीआय, टेक महिंद्रा यांचा समावेश होता. तर सन फार्मा, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक हे टॉप गेनर्स राहिले. दरम्यान, आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे ३.५ लाख कोटींचा फटका बसला आहे. गुरुवारी ज्यावेळी बाजार बंद झाला त्यावेळी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) २,८०,५५,५३५.२२ कोटी रुपये एवढे होते. तर आज शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ते २,७६,९०,६८९.४८ कोटी रुपयांवर आले. सेन्सेक्सने गेल्या ४ दिवसांत सुमारे १,६०० अंक गमावले आहेत. तर या महिन्यात २,९०० (४.६ टक्के) अंकांची घसरण पहायला मिळाली आहे.

कोरोनाची पुन्हा भिती

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह अधिक काळपर्यंत व्याजदरवाढ कायम ठेवेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे देशांतर्गत शेअर बाजारातील निर्देशांक आज लाल रंगात उघडले. तसेच कोरोनाची आणखी एक लाट येणार असल्याची भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर फार्मा आणि हेल्थकेअर वगळता सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा जोर दिसून आला.

आशियाई बाजारातही घसरण

अमेरिकेतील डाऊ जोन्स निर्देशांक १.१ टक्क्यांनी घसरला आहे. तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक २.२ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, आशियाई बाजारांवर नजर टाकली तर शुक्रवारी टोकियोचे शेअर्स खाली आले. निक्केई निर्देशांक १.११ टक्के म्हणजेच २९३ अंकांनी घसरला. तर Topix निर्देशांक ०.७५ टक्क्यांनी घसरून १,८९३ वर आला. (Stock Market Crash)

हे ही वाचा :

Back to top button