New Year : नववर्षाचा प्रारंभ उत्साही, आशादायी; शुक्र-शनी युती दीर्घ परिणामकारक तर वक्री मंगळाचा ताप संपणार | पुढारी

New Year : नववर्षाचा प्रारंभ उत्साही, आशादायी; शुक्र-शनी युती दीर्घ परिणामकारक तर वक्री मंगळाचा ताप संपणार

तीन वर्षाच्या प्रारंभी म्हणजे जानेवारी 1 २०२३ मध्ये होणारे ग्रहयोग हे उमेद वाढवणार आहेत. नववर्षाचा प्रारंभ आशादायी आणि उत्साही वातावरणाचा राहणार आहे. व्यापार, उद्योग, व्यवसायांना उभारी देणारे योग आहेत. कला क्षेत्राला अनुकूल वातावरण लाभेल, असे हे योग दर्शवतात. आगामी महिन्याभरातील योगापैकी काही ग्रहयोगाचे परिणाम पुढील दोन-तीन महिन्यांपर्यंत शुभफळे देऊ शकतील.( New Year)

नववर्षाच्या ( New Year ) पूर्वसंध्येला २२ डिसेंबर २०२२ रोजी शुक्र आणि हर्षल या ग्रहांचा त्रिकोण झाला आहे. या योगाने प्रत्येक क्षेत्रात काही चांगल्या घटनांचा अनुभव येऊ शकतो व या योगाचा परिणाम पुढील काही दिवस राहू शकतो. त्यापाठोपाठ २९ डिसेंबरला बुध आणि शुक्र या शुभ आणि मित्रग्रहांची मकर राशीत वर्गोत्तम मकर नवमांशात युती होत आहे. ही युती अनेक सुखदायक आणि आनंददायक घडामोडींना गती देणारी ठरू शकेल. त्यानंतर लगेचच ३१ डिसेंबरला शुक्र-प्लुटो युती होत आहे. ती या घडामोडीत चांगली भर घालू शकते. ४ जानेवारी रोजी गुरू-शुक्र लाभयोग होत आहे. हा योग सार्वजनिक क्षेत्रात, व्यापार व्यवसाय-उद्योगात अनुकूल वातावरण निर्मिती करणारा ठरू शकेल. ५ जानेवारीला रवी हर्षल त्रिकोण होत आहे. तो राजकीय-सामाजिक क्षेत्रात अनुकूल घडामोडींना चालना देऊ शकेल. ७ जानेवारीला रवी बुध युती होत आहे. त्यापाठोपाठ ८ जानेवारीला बुध-हर्षल त्रिकोण होत आहे. विविध क्षेत्रांत या योगाने काही नवे निर्णय होऊ शकतात. ९ जानेवारीला होणारा शुक्र-मंगळ त्रिकोण हा योग कला क्षेत्राला आणि या क्षेत्रातील व्यक्तींना नवा उत्साही अनुभव देणारा ठरेल.

प्रेमीजनांना आनंददायक प्रचिती येऊ शकेल. १८ जानेवारीला रवीची प्लुटोशी युती होत आहे. हा योग राजकीय, सामाजिक क्षेत्र, अवजड उद्योग, संशोधन यांना अनुकूलता दर्शवणारा आहे.

 New Year : शुक्र-शनी युती दीर्घ परिणामकारक

२२ जानेवारीला मकर राशीत तूळ नवमांशी शुक्र आणि शनी या दोन मित्रग्रहांची युती होत आहे. मकर ही शनीची स्वराशी व तूळ नवमांश हा उच्च नवमांश आहे. मकर ही शुक्राची मित्रराशी व तूळ नवमांश हा स्वनवमांशा आहे. अशा अत्यंत अनुकूल नवमांशात होणारी शुक्र- शनी युती दीर्घ परिणामकारक ठरणार आहे. व्यापार-व्यवसायांना चालना मिळण्याचे, विविध क्षेत्रांत विस्तार आणि प्रगती होण्याचे, कौटुंबिक जीवनात वातावरण सौहार्दाचे राहण्याचे योग येतील व याचे परिणाम आगामी काही काळ राहतील. ३० जानेवारीला बुध- हर्षल त्रिकोण बौद्धिक क्षेत्राला, संशोधन क्षेत्राला उपकारक असा ठरू शकेल.

वक्री मंगळाचा ताप संपणार

३० आक्टोबर रोजी मंगळ हा बलाढ्य ग्रह वक्री झाला. वृषभ राशीतील वक्री मंगळामुळे मेष, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मीन या राशींना अनेक अडथळे आणि आकस्मिक अडचणींना तोंड द्यावे लागले असेल. वृषभ, कर्क, सिंह, मकर, कुंभ या राशींनाही अपेक्षाभंगाचा अनुभव आला असेल. स्थावर मालमत्तेचे प्रश्न निर्माण झाले असतील. आता १२ जानेवारीस मंगळ वृषभ राशीत मार्गी होत आहे. त्यामुळे गेल्या दोन-सव्वादोन महिन्यांतील अडचणी, अडथळे आणि अस्वस्थता आता सौम्य होईल.

 New Year : शनीचा कुंभ राशीत प्रवेश

मंगळवार, दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजून १ मिनिटांनी शनीचा कुंभ राशीत प्रवेश होत आहे. धनु राशीची साडेसाती संपुष्टात येत आहे. मीन राशीला साडेसाती सुरू होत आहे, तर मकर राशीची अडीच वर्षे आणि कुंभ राशीची पाच वर्षे साडेसाती शिल्लक आहे. कुंभ ही शनीची मूल त्रिकोण रास असल्याने या साडेसातीची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. शनिवारी शनी – मारुतीचे दर्शन, शनीला तेल वाहणे, रुईच्या पानांची माळ वाहणे असे धार्मिक विधी केल्यास साडेसातीची फळे सौम्य होतात, असे शास्त्र वचन आहे. कुंभ राशीतील शनीचे भ्रमण स्थैर्य देणारे ठरते. औद्योगिक, बँकिंग, विमा अशा क्षेत्रांना हा शनी अनुकूल फळे देतो. कुंभ ही बौद्धिक गुण असलेली राशी असल्याने बौद्धिक आणि संशोधन क्षेत्राला हा शनी अनुकूल राहील. कुंभेतील शनीचे परिणाम दीर्घकाळ राहणारे आहेत.

हेही वाचा

Back to top button