Share Market Today | चीनमुळे आशियाई शेअर बाजारांत हाहाकार, पण भारतीय शेअर बाजारात तेजीचे वारे, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक | पुढारी

Share Market Today | चीनमुळे आशियाई शेअर बाजारांत हाहाकार, पण भारतीय शेअर बाजारात तेजीचे वारे, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

Share Market Today : जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली होती. झिरो-कोविड धोरणाविरुद्ध चीनमधील प्रमुख शहरांमध्ये झालेल्या विरोधांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे आशियाई बाजारात हाहाकार उडाला आणि बहुतांश शेअर्स घसरले. दरम्यान, यातून आज भारतीय शेअर बाजाराने सावरत तेजीची वाट धरली. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टीत घसरण दिसून आली होती. त्यानंतर काहीवेळातच दोन्ही निर्देशांक सावरले आणि त्यांच्यात तेजी आली.

दुपारी पावणेदोनच्या सुमारास सेन्सेक्स ३८० अंकांनी वधारून ६२,६७७ वर होता. तर निफ्टीने १८,६११ वर झेप घेतली. सेन्सेक्सचा हा नवा उच्चांक आहे. तर निफ्टीनेही आज सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टी ५० निर्देशांकाने ०.५३ टक्क्यांने वाढून १८,६११ च्या सर्वकालीन उच्चांकावर झेप घेतली आणि १९ ऑक्‍टोबर २०२१ च्या दिवशीचा विक्रम मोडला. भारतीय अर्थव्यवस्थेची सुदृढ स्थिती आणि तेलाच्या किमतीत झालेली सुधारणा हे भारतीय शेअर्स बाजारासाठी मोठे सकारात्मक कारण ठरले. बीपीसीएल, रिलायन्स, हिरो मोटाकॉर्प, अशियन पेंट्स, इंडसइंड बँक यांचे शेअर्स आघाडीवर होते.

हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, अपोलो हॉस्पिटल्स, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक आदींचे शेअर्स आज NSE प्लॅटफॉर्मवर मागे पडलेले दिसले. त्यांचे शेअर्स २.२१ टक्क्यांपर्यंत खाली आले. याउलट हिरो मोटोकॉर्प, बीपीसीएल, बजाज ऑटो, एसबीआय लाइफ आणि टाटा मोटर्स यांचे शेअर्स आघाडीवर होते. (Share Market Today)

आशियाई शेअर बाजारांवर नजर टाकली तर जपानचा निक्केई निर्देशांक ०.७० टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाचा KOSPI १.०८ टक्क्यांनी आणि शांघाय कंपोझिट निर्देशांक १.१५ टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक २.५९ टक्क्यांनी घसरला. तर अमेरिकेतील तीनही प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर स्थिरावले.

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ३६९ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर स्थानिक गुंतवणूकदारांनी २९६ कोटी रुपयांच्या शेअर्स विक्री केली.

हे ही वाचा :

Back to top button