वैद्यकीय विम्याला करा टॉप अप! | पुढारी

वैद्यकीय विम्याला करा टॉप अप!

प्रगत देशाच्या मानाने आपल्या देशात खूपच कमी लोक वैद्यकीय विमा घेतात. कोरोना काळानंतर वैद्यकीय विम्याचे महत्त्व वाढलेले पाहावयास मिळते. वैद्यकीय विमा घेताना विमा प्रतिनिधीकडून माहिती घेतली जाते. अन् 3 लाख, 5 किंवा 10 लाखांपर्यंत विमा रकमेच्या योजना घेतल्या जातात. यामध्ये विस्तृत माहिती घेतली जात नाही. त्यामुळे बर्‍याच वेळेला विम्याचा निर्णय चुकतो. तो कसा ते पाहू.

एक नामांकित उद्योजक, वय वर्षे 58. शुगर, ब्लडप्रेशरसोबत पूर्णवेळ व्यवसायात झोकून देऊन काम करीत होते. एके दिवशी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. इतर आजार असल्याने चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून बायपास करून घेण्यासाठी मुंबई येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले.

हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर सुमारे 22 लाख रुपये बिल झाले. त्यांचा वैद्यकीय विमा फक्त पाच लाखांचा होता. बाकीचे 17 लाख रुपये त्यांना रोख भरावे लागले. पण बिल भरण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये पैसे नव्हते. घरी थोडीफार रोख रक्कम होती. पण त्यांची सर्व गुंतवणूक व्यवसायात होती आणि व्यवसायातून 17 लाख रुपये एकाच वेळी काढता आले नाहीत. पर्यायी, मित्रांकडून पैसे गोळा करून त्यांना हॉस्पिटलचे बिल भरावे लागले. दोन-पाच लाखांचा विमा संरक्षण असलेल्या वैद्यकीय विमा योजना सर्वत्र घेतल्या जातात. अशा कमी रकमेच्या विमा योजना पुरेशा ठरत नाहीत. विमा छोटा अन् खर्च मोठा, अशी परिस्थिती येते.

दुसरे, एक पती-पत्नी चारचाकीने प्रवास करत असताना अचानक समोर आलेल्या वाहनाला धडक बसून अपघात झाला होता. गाडीचा बेल्ट लावला नसल्यामुळे पत्नीच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. मोठ्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. दोन महिने कोम्यात गेल्या होत्या. तीन ऑपरेशन्स झाली. तीन महिन्यांनी त्या घरी आल्या; परंतु तीन महिन्यांचा हॉस्पिटलचा एकूण खर्च 27 लाख रुपये झाला होता. विम्याची तरतूद फक्त चार लाखांची होती. 23 लाख रुपये मित्रमंडळी, पाहुणे आणि दागिने विकून भरावे लागले. येणारी परिस्थिती काही सांगून येत नाही. त्यासाठी आपण परिपूर्ण वैद्यकीय विमा घेऊन पूर्वतयारी केलेली असेल तरच अशा मोठ्या संकटावर सहजपणे आर्थिक मात करू शकतो.

त्यासाठी चांगल्या सल्लागाराकडून रिस्क मॅनेजमेंटप्रमाणे आपल्या कुटुंबाचे वैद्यकीय विम्याचे नियोजन करून घ्यावे. वैद्यकीय विमा संरक्षण विस्तार करून अनपेक्षित संकटावर मात करण्यासाठी टॉप अप पॉलिसी किंवा सुपर टॉप पॉलिसी हा पर्याय चांगला करू शकतो.
सुपर टॉप अप आणि टॉप अप प्लॅनमध्ये आपण मूळ विमा रक्कम संपल्यानंतर जो काही जादा खर्च येतो, त्यासाठी जो क्लेम येईल तो वरील रक्कम या पॉलिसी योजनेअंतर्गत क्लेम केला जातो. जर समजा, तुम्ही पाच लाखांचा वैद्यकीय विमा घेतला आहात आणि तुम्हाला अजून संरक्षण विस्तारितपणे वाढवायचे असेल, तर आणखीन टॉप अप पॉलिसी वीस लाख रुपयांची घेऊ शकता. त्यासाठी वेगवेगळ्या कंपनींची निवड केली तरीसुद्धा चालू शकते. ही योजना एकाच कंपनीकडे घ्यायला पाहिजे, असे बंधन नसते.

टॉप अप पॉलिसी ही एक वेगळी योजना आहे. ज्याचा हप्ता मूळ पॉलिसीच्या तुलनेने कमी असतो. वीस लाख रुपयेचा टॉप प्लॅन घेतला, तर एकूण विमा संरक्षण हे 25 लाख रुपयांचे होते. म्हणजेच 25 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च या दोन्ही योजनेतून तुम्हाला मिळू शकतो.
मात्र नंतर घेतलेल्या 20 लाखांच्या प्लॅनमध्ये पहिले पाच लाख रुपये संपल्यानंतरच तुम्ही क्लेम करू शकता. अशा योजनेत दोन प्रकार योजना पाहावयास मिळतात. एक टॉप आणि दुसरा सुपर टॉप अशा योजना आहेत.

काही टॉप प्लॅनमध्ये प्रत्येक वेळी बेसिक विमा रक्कम एकाच वेळेला संपणे गरजेचे असते. तर सुपर टॉप अप पॉलिसीमध्ये वर्षातून तीन-चार वेळेमध्ये एकूण रक्कम संपल्यानंतर जी काही जादा दावा रक्कम देय होईल, ती सुपर टॉप योजनेमध्ये मिळू शकते. म्हणून टॉप अपपेक्षा सुपर टॉप प्लॅन हा खूपच चांगला आहे. या ठिकाणी मूलभूत पॉलिसी व सुपर टॉप पॉलिसी विमा कंपनी ही एकच असली किंवा वेगवेगळ्या कंपन्या असल्या तरी हा नियम लागू होऊ शकतो. बेसिक विमा रक्कम जितकी कमी, त्यामध्ये टॉप-अप विमा रक्कम वाढवण्यासाठी तुम्हाला जादा हप्ता द्यावा लागतो. जर बेसिक विमा रक्कम मोठी असेल, तर टॉप पॉलिसीचा हप्ता कमी बसतो. सुपर टॉप अप घेण्यासाठी बेसिक पॅालिसी असणे गरजेचेच असते असे नाही. जर आपण ठराविक रकमेचा वैद्यकीय खर्च सोसू शकत असाल किंवा ठराविक रकमेची आपली वैद्यकीय खर्चापोटी तरतूद असेल; तर त्यावरील रकमेचा टॉप अप घेऊ शकता, की जे अतिशय अल्प प्रीमियममध्येसुद्धा होऊ शकते. त्याने अचानक येणारा मोठा वैद्यकीय खर्च भागवता येईल.

सध्या वैद्यकीय क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. मल्टीसिटी हॉस्पिटलसारखे मोठमोठ्या हॉस्पिटलमधील उपचार महागडे होत आहे. अशा ठिकाणी उपचार घेण्यासाठी प्रचंड मोठा खर्च होतो. अनपेक्षित घटनांवर मात करण्यासाठी भक्कमपणे आर्थिक पाठबळ हवे असेल, तर तुमच्याकडे मोठा पैसा साठविण्यापेक्षा अधिक चांगले वैद्यकीय विमा घेतले पाहिजेत.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या काही कंपन्या अशा योजनांमध्ये अतिरिक्त लाभसुद्धा देऊ शकतात. उदा. एअर अ‍ॅम्बुलन्स, ठराविक आजारासाठी कमी वेटिंग पीरियड, ठरावीक काळानंतर बाळंतपणाचा खर्च आणि नुकताच जन्मलेल्या मुलांसाठी होणारा उपचाराचा खर्च, असे अनेक अतिरिक्त लाभ योजनेमधून मिळू शकतात. जो काही मूळ विमा योजनेमध्ये मिळत नाही, तो कुटुंबातील सर्वांसाठी फ्लोटर पॉलिसी घेऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे वैद्यकीय विमा संरक्षण व्याप्ती वाढविण्याठी अशा योजनांची मदत निश्चितपणे होऊ शकते.
प्रत्येक कंपन्यांचा योजनेचा तपशील वेगवेगळा असतो. प्रत्येक कुटुंब प्रमुखाची आर्थिक जबाबदारी वेगवेगळी असते आणि त्यासाठी कोणत्या कंपनीची योजना तुम्हाला लागू होईल याचा ताळमेळ घालून आपल्या गरजेनुसार चांगल्या कंपनीची योजना निवड करणे हे गरजेचे आहे. त्यासाठी एका चांगल्या सल्लागारामार्फत अशा कंपन्यांच्या योजनांचा अभ्यास करून आपल्या आर्थिक जबाबदारीचा विचार करून परिपूर्ण विम्याचे नियोजन करता येईल.

अनिल पाटील,
प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर 

Back to top button