Stock Market Updates | सेन्सेक्सचा नवीन उच्चांक, ६२,२९३ अंकांवर झेप, निफ्टी १८,५०० वर बंद | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्सचा नवीन उच्चांक, ६२,२९३ अंकांवर झेप, निफ्टी १८,५०० वर बंद

Stock Market Updates : गुंतवणूकदारांना जागतिक मध्यवर्ती बँकांकडून व्याजदराबाबत परस्परविरोधी संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आशियाई बाजारात घसरण दिसून आली. तर गुरुवारच्या विक्रमी उसळीनंतर शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टीने सावध सुरुवात केली होती. सुरुवातीला घसरलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीत बाजार बंद होताना सुधारणा झाली. बाजार बंद होण्याआधी सेन्सेक्सने ६२,४०० अंकांवर झेप घेतली होती. सेन्सेक्सचा हा आतापर्यंतचा नवा उच्चांक आहे. सेन्सेक्सने १९ ऑक्टोबर २०२१ रोजी ६२,२४५ चा टप्पा गाठला होता. दरम्यान, सेन्सेक्स आज ६२,२९३ अंकांवर स्थिरावून बंद झाला. तर आज निफ्टीनेही १८,५०० वर व्यवहार केला.

टाटा मोटर्स, एचडीएफसी लाइफ, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिरो मोटोकॉर्प, कोल इंडियाचे शेअर्स टॉप गेनर्समध्ये होते. BSE वर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, एअरटेल, कॅनरा बँक, CEAT, सीजी पॉवर, कुमिन्स इंडिया, इंजिनिअर्स इंडिया, जीई शिप्स, HAL, ICICI बँक, IIFL, IRFC, L&T, PFC, PNB सारख्या स्टॉक्सनी आज त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांक नोंदवला. दरम्यान, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Kirloskar Ferrous Industries) शेअर्स २.३९ टक्क्यांनी घसरून ३१२.४० रुपयांवर पोहोचले. माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स ३.४३ टक्क्यांनी घसरले.

बाजार सकाळी खुला होताच सेन्सेक्सने ६२,३०० वर तर निफ्टीने १८,५०० वर सुरुवात केली होती. त्यानंतर सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. तर निफ्टीही १८,५०० च्या खाली आला होता. त्यानंतर बाजार बंद होताना ही घसरण थांबली.

जागतिक बाजारातील संकेत संमिश्र आहेत. दरम्यान, जपानचा निक्की निर्देशांक ०.३८ टक्क्यांनी घसरल्याने आशियाई शेअर्समध्ये घसरण झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.१८ टक्क्यांनी तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.९२ टक्क्यांनी घसरला. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.४२ टक्क्यांनी वधारला. दरम्यान, अमेरिकेतील तीनही प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर जाऊन स्थिरावले. (Share Market Today)
NSE डेटानुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी एकूण १,२३२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी २३६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नोव्हेंबरच्या पतधोरण बैठकीत व्याजदर वाढीवर नियंत्रण राहणार असल्याचे संकेत दिले. यामुळे काल गुरुवारी (दि.२४) भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार होऊन सेन्सेक्सने विक्रमी पातळी गाठली होती. गुरुवारी सेन्सेक्स ७६२ अंकांनी वाढून ६२,२७२ वर बंद झाला. तर निफ्टी २१६ अंकांनी वाढून १८,४८४ वर बंद झाला होता. कालच्या सत्रात सेन्सेक्सची ९०० अंकांपर्यंत उस‍ळी पहायला मिळाली. तर निफ्टीने ५२ आठवड्यातील उच्चांक नोंदवला होता. बँक निफ्टी निर्देशांकाने नवीन उच्चांक गाठला आणि प्रथमच तो ४३ हजारांवर बंद झाला होता. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button