Bisleri पाण्याला आता टाटाची चव, टाटा कंझ्युमर ७ हजार कोटींमध्ये खरेदी करणार! | पुढारी

Bisleri पाण्याला आता टाटाची चव, टाटा कंझ्युमर ७ हजार कोटींमध्ये खरेदी करणार!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाटलीतील पाणी म्हटले की बिसलेरीचे (Bisleri) नाव तोंडात येते. भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर मेकर बिसलेरी आता टाटाची होणार आहे. थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का हे शीतपेय ब्रँड कोका-कोलाला विकल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर रमेश चौहान बिसलेरी इंटरनॅशनलला टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) ला अंदाजे ६ हजार ते ७ हजार कोटी रुपयांना विकणार आहेत. दरम्यान, बिसलेरी आणि टाटा यांच्यात एक करार होणार आहे. या कराराचा एक भाग म्हणून कंपनीचे सध्याचे व्यवस्थापन दोन वर्षे आहे तसेच राहणार असल्याचे वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. रमेश चौहान हे सर्वात लोकप्रिय मिनरल वॉटर ब्रँड बिसलेरीचे चेअरमन आहेत. बिसलेरी ही भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर कंपनी आहे.

८२ वर्षीय चौहान हे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहेत. बिसलेरी व्यवसाय पुढे नेण्यासाठी कोणी उत्तराधिकारी नाही. मुलगी जयंती ह्या व्यवसायात फारश्या उत्सुक नाहीत, असे चौहान यांनी म्हटले आहे. बिसलेरी कंपनी विकणे हा अजूनही माझ्यासाठी एक वेदनादायक निर्णय आहे, अशा भावना चौहान यांनी व्यक्त केल्या आहेत. ”टाटा समूह बिसलेरीचा व्यवसाय आणखी चांगल्या प्रकारे हाताळेल. मला टाटाची मूल्ये आणि सचोटी जपणारी संस्कृती आवडते आणि म्हणूनच इतर इच्छुक खरेदीदारांपेक्षा टाटाला बिसलेरी विकण्यासाठी मी तयारी केली आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टाटाशी दोन वर्षांपासून चर्चा

बिसलेरी खरेदीसाठी रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डॅनोन यासह अनेक दावेदार होते. पण टाटा यांच्याशी दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे आणि काही महिन्यांपूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि टाटा कंझ्युमरचे सीईओ सुनील डिसोझा यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेतला. ते खूप चांगले लोक आहेत, असे रमेश चौहान यांनी म्हटले आहे.

४,५०० वितरक आणि ५ हजार ट्रकचे नेटवर्क

Bisleri हा मूळचा इटालियन ब्रँड होता. ज्याने १९६५ मध्ये मुंबईत व्यवसाय सुरु केला. चौहान १९६९ मध्ये बिसलेरी कंपनी विकत घेतली. कंपनीचे १२२ ऑपरेशनल प्लांट आहेत. त्यापैकी १३ त्यांच्या मालकीचे आहेत. संपूर्ण भारत आणि शेजारील देशांत बिसलेरीचे ४,५०० वितरक आणि ५ हजार ट्रकचे नेटवर्क आहे. बिसलेरी ब्रँडची चालू आर्थिक वर्षातील उलाढाल २,५०० कोटी रुपये असून नफा २२० कोटी रुपये इतका आहे.

हे ही वाचा :

Back to top button