

Weight Loss Tips
न्यूयॉर्क : वाढलेलं वजन ही आजच्या जीवनशैलीतील सर्वात मोठी डोकेदुखी ठरतेय. मग देश विकसित असो वा विकसनशील लठ्ठपणाची समस्या सर्वत्र फोफावली आहे. अनेकदा वजन कमी करायचे म्हटले की, 'डाएट करा' किंवा 'जेवण कमी करा' असा सल्ला दिला जातो. वजन कमी करणे आणि ते टिकवून ठेवणे हे जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक मानले जाते. आपण अन्नाचा आनंद घेतो म्हणून जास्त खातो, असा एक समज आपल्या मनात पक्का बसला आहे; पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हेच खरं आहे! अलिकडचे संशोधन आणि तज्ज्ञांचे मत असे सूचित करते की, खरी समस्या ही नाहीये की आपण जेवणाचा जास्त आनंद घेतोय, खरी समस्या अशी आहे की, आपण जेवणाचा 'पुरेसा' आनंद घेत नाही.
न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार, मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या न्यूरोसायंटिस्ट डाना स्मॉल यांच्या मते, आपल्या मेंदूमध्ये अन्नाचे संकेत मिळवण्यासाठी दोन वेगळे मार्ग कार्यरत असतात. पहिला मार्ग हा हाय रोड (High Road) असतो. हा मार्ग तोंडाची चव, अन्नाचा सुगंध आणि त्यातून मिळणारा प्रत्यक्ष आनंद यामुळे सक्रिय होतो. तर दुसरा मार्ग हा लो रोड म्हणजे 'डोपामाइन'चा मार्ग आहे. अन्न गिळल्यानंतर आणि पचल्यानंतर तो सक्रिय होतो.
चिप्स किंवा कोल्ड ड्रिंक यांसारखे पदार्थ मेंदूतील 'लो रोड'ला सक्रिय करतात. हे पदार्थ चवीला खूप उत्कृष्ट नसले तरी, त्यातील कॅलरी आणि चरबीचे मिश्रण मेंदूला तीव्र 'डोपामाइन हिट' देते.न्यूरोसायंटिस्ट डाना स्मॉल यांच्या मते, लो रोड सक्रीय असताना आपण अन्नाच्या खऱ्या आनंदासाठी नाही, तर या रासायनिक प्रभावाच्या (Addiction) सवयीमुळे वारंवार खातो.
डाना स्मॉल यांनी रक्ताची चाचणी केली. तेव्हा आपण प्री-डायबिटिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी कंटाळवाणे डाएट करण्याऐवजी 'जास्तीत जास्त आनंदाचा' मार्ग निवडला. त्यांनी ताजी रसभरी आणि हळद, जिरे, लसूण वापरून बनवलेल्या चविष्ट व सकस भाज्यांना प्राधान्य दिले. अन्नाचा पूर्ण आनंद घेतल्यामुळे मेंदू समाधानी राहतो आणि जंक फूडची इच्छा कमी होते, असा त्यांचा अनुभव होता. या प्रयोगातून त्यांनी चक्क २० किलो वजन कमी करून मधुमेहावर मात केली.
पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीचे डॉ. एजेकील इमॅन्युएल म्हणतात, "आरोग्य जपण्याचा अर्थ स्वतःला रोखून धरणे असा होत नाही." जर आयुष्याचा उद्देश फक्त आवडी मारणे हाच असेल, तर तुमची इच्छाशक्ती लवकरच पराभूत होण्याची मानसिकता निर्माण करेल. त्यामुळे निरोगी राहण्याचा नवा मंत्र 'कमी खाणे' हा नसून 'उत्कृष्ट आणि चवीने खाणे' हा आहे."
'माइंडफुल ईटिंग'पद्धतीमध्ये अन्नाचा सुगंध आणि पोत यावर लक्ष देण्यास सांगितले जाते. डॉ. जेन चोजेन 'वन-बाइट-एट-ए-टाइम' ही पद्धत सुचवतात. यामध्ये प्रत्येक घास पूर्णपणे चावून खाणे आणि त्याच्या चवीचा अनुभव घेणे अपेक्षित आहे. कारण, पोट भरल्याचा संकेत मेंदू पर्यंत पोहोचण्यासाठी किमान २० मिनिटे लागतात. सावकाश खाल्ल्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाण्यापूर्वीच थांबता.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण टीव्ही पाहताना किंवा फोन वापरताना जेवतो, तेव्हा आपण 'ऑटोपायलट' मोडवर असतो. यामुळे आपल्याला अन्नाची चव जाणवत नाही. जर वजन आटोक्यात ठेवण्याचे असेल तर टीव्ही किंवा मोबाईल फोन पहात खाणे टाळावे. जेव्हा आपण ऑटोपायलट मोडमध्ये जेवण करतो तेव्हा प्रमाणापेक्षा अधिक खातो. साहजिकतच याचा परिणाम वजन वाढीवर होता. खरी समस्या ही नाहीये की आपण जेवणाचा जास्त आनंद घेतोय, खरी समस्या अशी आहे की, आपण जेवणाचा 'पुरेसा' आनंद घेत नाही. त्यामुळे आहारा टाळण्यापेक्षा आहाराचा आनंद घेवूनही तुम्ही वजन कमी करु शकता हेच तज्ज्ञ सांगतात.