

Ultra-Processed Foods May Harm Male Reproductive : अति-प्रक्रिया केलेले पदार्थांच्या (अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स) नियमित सेवनाने हृदयविकार आणि टाइप-2 मधुमेहसह अन्य समस्यांचा धोका वाढतो, हे यापूर्वीच्या संशोधनात स्पष्ट झालेले आहे. मात्र अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे जास्त सेवन केल्यास पुरुषांच्या प्रजननाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच, त्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता घटते, असे एका नवीन संशोधनात समोर आले आहे.
‘सेल मेटाबोलिझम’मध्ये (Cell Metabolism) प्रकाशित झालेल्या या संशोधनावर 'हेल्थलाइन'ने दिलेल्या रिपोर्टनुसार,अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर कोणता परिणाम होतो, या संशोधनासाठी २० ते ३५ वयोगटातील ४३ पुरुषांची निवड करण्यात आली. प्रत्येक सहभागीने तीन आठवडे अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा आहार घेतला, तर तीन आठवडे प्रक्रिया न केलेल्या पदार्थांचा आहार घेतला. या दोन आहारांच्या दरम्यान तीन महिन्यांचा ‘वॉश आउट’ कालावधी ठेवण्यात आला. अर्ध्या सहभागींनी प्रक्रिया न केलेला आहार सुरू केला, तर उर्वरित अर्ध्यांनी अति-प्रक्रिया केलेला आहार सुरू केला. दोन्ही गटांतील अर्ध्या पुरुषांना दररोज ५०० अतिरिक्त कॅलरीज असलेला आहार देण्यात आला.
अनेक रासायनिक प्रक्रिया, कृत्रिम घटक, फ्लेवर्स, रंग, गोडवा वाढवणारे पदार्थ प्रेझर्व्हेटिव्ह्ज यांचा मोठ्या प्रमाणात वापर करून तयार होणार्या अन्नपदार्थांना अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स असे म्हणले जाते. चिप्स, नमकीन, बिस्किटे, साखरयुक्त सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, नूडल्स, पास्ता, सूप पावडर, बर्गर, गोड बेकरी उत्पादने याचा यामध्ये समावेश होतो. हे पदार्थ अधिक काळ टिकतात, त्याचबरोबर चवदार आणि खाण्यास सोपे असल्याने त्याचे लोकप्रियता प्रचंड आहे; पण पौष्टिकतेच्या दृष्टीने अपुरे व आरोग्यास हानीकारक ठरतात.
संशोधकांनी सांगितले की, अति-प्रक्रिया केलेला आहार घेणाऱ्या पुरुषांमध्ये ‘थॅलेट cxMINP’ या प्लास्टिकमधील घटकाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. ‘थॅलेट cxMINP’ हे पुरुषांच्या हार्मोन्समध्ये बिघाड घडवून आणतात. त्याचबरोबर अति-प्रक्रिया केलेला आहार घेणाऱ्या लोकांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन्सची पातळी कमी झाली. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी हे हार्मोन्स अत्यंत महत्त्वाचे असतात. अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये प्लास्टिकसारखे काही घटक असू शकतात. ते शरीरातील हार्मोनल प्रणालीला बाधित करतात.
संशोधकांनी म्हटलं आहे की, अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने आरोग्यावर अनेक वाईट परिणाम दिसून येतात.त्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे आणि शरीराचे वजन वाढणे यांचा समावेश आहे. नवीन संशोधनात सहभागी झालेल्यांनी अति-प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांचे वजन एक किलोपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून आले. त्यांच्या शरीरातील चरबीचे प्रमाणही वाढले. सहभागी लोकांनी अति-प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले, तेव्हा त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता खालावल्याचे आढळले. त्याचबरोबर हृदय व चयापचय (कार्डिओमेटाबोलिक)वर नकारात्मक परिणाम होत असल्याचेही स्पष्ट झाले.
जुलै २०२५ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, अति-प्रक्रिया केलेले पदार्थ लठ्ठपणा, तसेच हृदयविकार, टाइप-२ मधुमेह आणि स्लीप ॲप्नियामध्ये (sleep apnea) वाढ होण्याचे प्रमुख कारण आहेत. ‘हेल्थलाइन’शी बोलताना लॉस एंजेलिस येथील ‘सेंटर फॉर मेल रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड वॅसेक्टोमी रिव्हर्सल’चे संचालक डॉ. फिलिप वर्थमॅन यांनी सांगितले की, तुम्ही दिवसभरात किती खाता यापेक्षा तुम्ही काय खाता हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या प्रकारच्या कॅलरीज घेत आहात, हे महत्त्वाचे आहे. हे नवीन संशोधनामुळे सिद्ध झाले आहे.’
तज्ज्ञांच्या मते, काही जीवनशैलीच्या सवयी पुरुषांच्या प्रजनन आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करू शकतात. धान्य, फळे, भाज्या, असा परिपूर्ण आहार, व्यायाम आणि योग्य वजन राखणे हे एकूण आणि प्रजनन आरोग्यासाठी मदत होते. तसेच पुरुषांनी प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताण व्यवस्थापन, योग्य वजन राखणे आणि तंबाखू व दारूचे सेवन टाळणे आवश्यक आहे.