Brain Health | मेंदूतील रोगप्रतिकारक पेशी वाढवतात चेतापेशींची निर्मिती

brain-immune-cells-boost-neuron-formation
Brain Health | मेंदूतील रोगप्रतिकारक पेशी वाढवतात चेतापेशींची निर्मितीPudhari File Photo
Published on
Updated on

सॅन फ्रान्सिस्को : मानवी मेंदूच्या गर्भातील विकासाचे एक मोठे रहस्य उलगडण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. एका नवीन अभ्यासानुसार, मेंदूतील रोगप्रतिकारक पेशी या केवळ संरक्षणाचे काम करत नाहीत, तर त्या एका विशिष्ट प्रकारच्या चेतापेशींच्या निर्मितीमध्ये नाट्यमय वाढ घडवून आणतात. हा शोध मानवी मेंदूच्या जडणघडणीवर आणि ऑटिझम, एपिलेप्सीसारख्या विकारांवर नवीन प्रकाश टाकू शकतो.

‘नेचर’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, मेंदूतील ‘मायक्रोग्लिया’ नावाच्या रोगप्रतिकारक पेशी गर्भावस्थेत मेंदूच्या विकासाला दिशा देण्याचे काम करतात. या पेशी ‘इनहिबिटरी इंटरन्यूरॉन्स’ नावाच्या चेतापेशींची संख्या वाढवण्यासाठी चालना देतात. या इंटरन्यूरॉन्सची भूमिका मेंदूच्या कामकाजात संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. हे इंटरन्यूरॉन्स मेंदूतील सिग्नलची देवाण-घेवाण नियंत्रित करतात. ते ‘गाबा’ नावाच्या रसायनाचा वापर करून मेंदूतील अतिउत्तेजना कमी करतात, ज्यामुळे मेंदूचे कार्य स्थिर राहते.

प्रौढ मानवी मेंदूच्या कॉर्टेक्समध्ये जवळपास 25 टक्के ते 50 टक्के भाग या इंटरन्यूरॉन्सचा असतो, जे इतर प्राण्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. संशोधकांच्या मते, ही प्रक्रिया केवळ मानवामध्येच घडत असावी. या इंटरन्यूरॉन्सच्या कार्यात अडथळा आल्यास एपिलेप्सी (अपस्मार), ऑटिझम आणि स्किझोफ्रेनिया यासारखे गंभीर न्यूरोलॉजिकल आणि मानसिक विकार होऊ शकतात. या अभ्यासाचे वैशिष्ट्य म्हणजे, संशोधकांनी पारंपरिक प्राणी मॉडेलऐवजी ‘ऑरगॅनॉईड’ या तंत्रज्ञानाचा वापर केला.

ऑरगॅनॉईड म्हणजे प्रयोगशाळेत मानवी स्टेम सेलपासून तयार केलेली मेंदूसारखी एक लहान त्रिमितीय रचना. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को येथील संशोधक दियानकुन यू यांच्या मते, ‘ही प्रक्रिया केवळ मानवी मेंदूसाठी अद्वितीय असू शकते, त्यामुळे प्राण्यांवरील प्रयोगातून अचूक माहिती मिळवणे शक्य नव्हते.’ यापूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की, गर्भधारणेदरम्यान आईला एखादा संसर्ग झाल्यास तिच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या सक्रियतेमुळे बाळाच्या मेंदूतील इंटरन्यूरॉन्सची संख्या कमी होऊ शकते.

आता या नवीन अभ्यासाने हे स्पष्ट केले आहे की, मेंदूतील ‘मायक्रोग्लिया’ पेशीच या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत. थोडक्यात, हा अभ्यास केवळ मेंदूच्या विकासाची प्रक्रियाच स्पष्ट करत नाही, तर गर्भावस्थेतील आईच्या आरोग्याचा आणि तिच्या रोगप्रतिकारक शक्तीचा बाळाच्या मेंदूच्या जडणघडणीवर किती खोल परिणाम होऊ शकतो, हेदेखील अधोरेखित करतो. या शोधाच्या आधारे भविष्यात मेंदूशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या विकारांवर नवीन उपचार पद्धती विकसित करण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news