

Smartphone and Eating Disorders: आजच्या काळात स्मार्टफोन हा मुलांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, मुलांना स्मार्टफोन नेमक्या कोणत्या वयात द्यावा, हा पालकांसमोरचा मोठा प्रश्न आहे. एका नव्या अभ्यासानुसार, वयाच्या 12व्या वर्षी स्वतःचा स्मार्टफोन असलेल्या मुलांमध्ये पुढील दोन वर्षांत खाण्याशी संबंधित चुकीच्या सवयी आणि असुरक्षितता निर्माण होण्याचा धोका अधिक आहे, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
हा अभ्यास वैद्यकीय जर्नल JAMA Network Open मध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. जेसन नगाटा आहेत. अमेरिकेतील जवळपास 9 हजार किशोरवयीन मुलांच्या माहितीचा या संशोधनासाठी अभ्यास करण्यात आला.
संशोधकांनी अमेरिकेतील मुलांच्या मेंदूचा विकास आणि आरोग्य यावर सुरू असलेल्या Adolescent Brain Cognitive Development Study मधील माहितीचा वापर केला. या अभ्यासात 12 वर्षांच्या सुमारे 70 टक्के मुलांकडे स्वतःचा स्मार्टफोन असल्याचे आढळले.
यापैकी सुमारे 24 टक्के मुलांनी वयाच्या 14व्या वर्षी खाण्याशी संबंधित किमान एक त्रासदायक लक्षण असल्याचे सांगितले. याउलट, वयाच्या 12व्या वर्षी स्मार्टफोन नसलेल्या मुलांमध्ये हे प्रमाण 16 टक्क्यांपेक्षा कमी होते.
संशोधकांच्या मते, स्मार्टफोनमुळे मुलांना सतत नवीन जग दिसतं. सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर्सचे फोटो, शरीरयष्टीबद्दलच्या पोस्ट आणि सौंदर्याचे ठरावीक मापदंड यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो.
12 ते 14 वर्षांचा काळ मुलांच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. या काळात शरीरात वेगाने बदल होतात. मुलांमध्ये स्वतःच्या शरीराची इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्तीही वाढू शकते.
पूर्वी मुलांची तुलना प्रामुख्याने त्यांच्या मित्रमैत्रिणींशी होत असे. मात्र, स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे ही तुलना आता मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन जगाशी होऊ लागली आहे.
सोशल मीडियावर दिसणारे फोटो अनेकदा फिल्टर केलेले, एडिट केलेले किंवा विशिष्ट पद्धतीने तयार केलेले असतात. त्यामुळे मुलांना आपले शरीर किंवा दिसणे याबाबत असुरक्षितता वाटू शकते. यामुळे आत्मविश्वास कमी होणे आणि शरीराविषयी नाराजी वाढण्याची शक्यता असते.
तसेच, वजन नियंत्रित करण्यासाठी कमी कॅलरी असलेले पदार्थ खाणे किंवा जास्त व्यायाम करणे यासारख्या सवयी लागण्याची शक्यता आहे.
खाण्याच्या सवयींमध्ये मोठे बदल होणे, वजन आणि शरीराच्या आकाराबद्दल सतत विचार करणे, अन्नाचे प्रमाण खूप कमी करणे किंवा वजन कमी करण्यासाठी अतिरेकी व्यायाम करणे यासारख्या सवयींना ‘Disordered Eating’ म्हणजेच खाण्याशी संबंधित चुकीच्या सवयी असे म्हणता येते.
याचा अर्थ प्रत्येक मुलाला ‘Eating Disorder’ म्हणजेच खाण्याचा विकार आहे, असा होत नाही. मात्र, अशा सवयी पुढे गंभीर समस्येचे रूप घेऊ शकतात.
जगभरातील मुले आणि किशोरवयीन मुलांपैकी सुमारे 22 टक्के मुलांमध्ये खाण्याच्या सवयींशी संबंधित अशा समस्यांची लक्षणे दिसतात, असा काही संशोधकांचा अंदाज आहे.
या अभ्यासातून मुलांना स्मार्टफोन नेमक्या कोणत्या वयात द्यावा, याचे निश्चित उत्तर मिळत नाही. संशोधकांनीही याला कोणतेही ‘आदर्श वय’ ठरवलेले नाही.
मात्र, काही तज्ज्ञांच्या मते स्मार्टफोन देण्यास काही काळ उशीर केल्याने मुलांना फायदा होऊ शकतो. विशेषतः सोशल मीडियाचा वापर पालकांच्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे.
मुलाला स्मार्टफोन दिल्यानंतर सुरुवातीपासूनच सर्व अॅप्स आणि वेबसाइट्सचा अनियंत्रित वापर करण्याची मुभा देऊ नये, असे तज्ज्ञ सुचवतात.
मुलाकडे स्मार्टफोन असल्यास पालकांनी काही साधे नियम ठरवणे महत्त्वाचे आहे. कोणती अॅप्स डाउनलोड करता येतील, फोन किती वेळ वापरायचा आणि रात्री फोन कुठे ठेवायचा, याबाबत स्पष्ट नियम असावेत. मुलांनी फोन बेडरूममध्ये न ठेवणे हा देखील एक उपाय असू शकतो. यामुळे रात्री उशिरापर्यंत फोन वापरण्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
त्याचबरोबर मुल ऑनलाइन काय पाहत आहे, कोणत्या प्रकारच्या पोस्ट त्याला आवडतात आणि त्याचा त्याच्या मनावर काय परिणाम होतो, याबद्दल पालकांनी मुलांशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे.
मुलाच्या खाण्याच्या सवयी अचानक बदलत असतील किंवा तो सतत आपल्या शरीराविषयी, वजनाविषयी किंवा दिसण्याविषयी नकारात्मक बोलत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
तज्ज्ञांच्या मते, स्मार्टफोन पूर्णपणे बंद करणे हा एकमेव उपाय नाही. मुलांच्या डिजिटल आयुष्यात पालकांचा सहभाग आणि मोकळा संवाद अधिक महत्त्वाचा आहे.
या अभ्यासातून स्मार्टफोनमुळे थेट खाण्याचा विकार होतो, असे सिद्ध झालेले नाही. मात्र, लहान वयात स्मार्टफोन मिळणे आणि पुढील काळात खाण्याशी संबंधित चुकीच्या सवयी यांच्यात संबंध आढळला आहे. त्यामुळे मुलांना स्मार्टफोन देताना त्यांचे वय, वापराची पद्धत आणि सोशल मीडियाचा होणारा परिणाम यांचा विचार करणे गरजेचे आहे.