Flydubai Pilot Attack: बॅगेत सापडली पॅलेस्टाईनची पत्रकं, ओमानमध्ये होती बंदी; स्मित मछारवर हल्ला करणारा नेमका कोण? नाव आलं समोर

Flydubai Pilot Attack: फ्लाय दुबईचे भारतीय पायलट स्मित मछार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ओमानी को-पायलट हमाम अल-हमामीचे नाव समोर आले आहे.
Flydubai Pilot Attack
Flydubai Pilot AttackPudhari
Published on: 
Updated on: 

Flydubai Pilot Attack: फ्लाय दुबईचे भारतीय पायलट स्मित मछार यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ओमानी को-पायलटचे नाव समोर आले आहे. हमाम अल-हमामी असे या को-पायलटचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्याबाबत तपास यंत्रणांना काही धक्कादायक माहिती मिळाल्याचे वृत्त आहे.

हमाम अल-हमामी याला यापूर्वी एअर ओमानकडून बंदी घालण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वीच त्याने फ्लाय दुबईमध्ये नोकरी स्वीकारली होती. त्याच्या अटकेनंतर त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यामध्ये ‘फ्री पॅलेस्टाईन’ असं लिहिलेली काही पत्रकं आढळल्याचे सांगितले जात आहे.

तपासातील माहितीनुसार, हमामीने यापूर्वीही इस्रायलविरोधी भूमिका व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. तो पॅलेस्टाईनच्या समर्थनात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या विचारसरणीचा आणि या हल्ल्याचा काही संबंध आहे का, याचा तपास आता केला जात आहे.

या घटनेमागे त्याचा नेमका उद्देश काय होता, विमानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न का करण्यात आला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. खुफिया यंत्रणांकडून त्याच्या संभाव्य दहशतवादी हेतूंचाही तपास केला जात असल्याचे वृत्त आहे.

Flydubai Pilot Attack
Captain Smit PM Modi: ‘हनुमान चालीसा म्हणत होतो, पण सगळ्यांना...’; PM मोदींशी बोलत असताना कॅप्टन स्मित यांनी सांगितला थरारक प्रसंग

इस्रायल आणि यूएईचे अधिकारी करणार चौकशी

फ्लाय दुबईच्या विमानातील या घटनेची चौकशी आता अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. इस्रायली अधिकारी हमामीची चौकशी करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. या तपासात संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असणार आहे.

मात्र, या चौकशीत नेमक्या कोणत्या यंत्रणा किंवा अधिकाऱ्यांचा सहभाग असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फ्लाय दुबईच्या FZ 1073 या विमानात घडलेल्या या घटनेनंतर विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही चर्चेत आला आहे. या घटनेदरम्यान विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यानंतर फ्लाय दुबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी गैथ अल गैथ यांनी पायलट आणि केबिन क्रूच्या कामाचे कौतुक केले.

Flydubai Pilot Attack
One Nation One Election Bill | ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकावर चर्चेस सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

गैथ अल गैथ यांनी सांगितले की, विमान सुरक्षितपणे उतरवणारे कॅप्टन आणि इतर पायलट तसेच केबिन क्रूने अत्यंत कठीण परिस्थितीत काम केले. या परिस्थितीत क्रूला मदत करणाऱ्या प्रवाशांचेही त्यांनी आभार मानले.

तसेच, या घटनेनंतर तातडीने मदत केल्याबद्दल सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. प्रवासी आणि क्रू सदस्यांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी मदत केल्याबद्दल यूएईचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचेही त्यांनी आभार मानले.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि हमामीची भूमिका तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news