Sleep Study : रात्री झोपेत चरबी कशी घटते आणि स्नायू कसे बनतात? शास्त्रज्ञांनी उघड केले झोपेचे नवीन रहस्य

मेंदू ग्रोथ हार्मोनवर नियंत्रण कसे ठेवतो यासाठी संशोधकांनी मेंदूतील ‘हायपोथॅलॅमस’ भागावर केले लक्ष केंद्रित
Sleep Study Growth Hormone
प्रातिनिधिक छायाचित्र.AI-generated image
Published on: 
Updated on: 

Sleep Study Growth Hormone : झोप म्हणजे केवळ थकवा घालवण्याची वेळ नव्हे, तर संपूर्ण शरीराला पुन्हा ताजेतवाने करणारी एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. मानवी झोपेवर आजवर जगभरात अनेक संशोधनं झाली आहेत; पण आता वैज्ञानिकांना नव्या संशोधनात मोठं यश मिळालं आहे. झोपेच्या वेळी ‘ग्रोथ हार्मोन’च्या स्रावाचे नियमन करणाऱ्या चेतासंस्थेच्या सर्किटची अचूक ओळख पटवण्यात त्यांना यश आलं आहे. या संशोधनामुळे रात्रीची गाढ झोप शरीरातील चरबी कशी घटवते आणि स्नायू कशा पद्धतीने बळकट करते, यावर मोठा प्रकाशझोत पडला आहे. जाणून घेऊया या नवीन संशोधनाविषयी....

नवीन संशोधनात काय सांगते?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील (बर्कले) संशोधकांनी झोपेदरम्यान ‘ग्रोथ हार्मोन’च्या (वाढ संवर्धक संप्रेरक) स्रावावर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूतील चेतासंस्थेच्या यंत्रणेचा शोध लावला आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, झोपेमुळे ग्रोथ हार्मोनची निर्मिती होते; मात्र ही प्रक्रिया केवळ एकेरी नसून, हा हार्मोन आपण केव्हा जागे व्हायचे हे देखील ठरवत असतो, असे या नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ‘सेल’ या वैज्ञानिक नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Sleep Study Growth Hormone
Sleep and Brain Health : शांत झोप आणि मेंदूच्‍या आरोग्‍याचा थेट संबंध? नवा रिसर्च

ग्रोथ हार्मोन अत्यंत महत्त्वपूर्ण

झोपेच्या काळात शरीरात मोठ्या प्रमाणात ग्रोथ हार्मोन स्रवतो, हे यापूर्वीच्या संशोधनातून स्पष्ट झाले होते. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांची उंची वाढवण्यात या हार्मोनची भूमिका मुख्य असतेच; पण प्रौढ वयातही स्नायूंची झीज भरून काढणे, हाडांचे आरोग्य टिकवणे, शरीरातील चरबीचा योग्य वापर करणे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे यासाठी हा हार्मोन अत्यंत गरजेचा असतो. मात्र, झोपेच्या वेगवेगळ्या टप्प्यांत मेंदू या हार्मोनच्या स्रावावर नेमके कसे नियंत्रण ठेवतो आणि चेतापेशींची हालचाल, हार्मोनची पातळी व जागे होण्याची वेळ यांचा परस्परसंबंध कसा असतो, याचे कोडे अद्याप उलगडले नव्हते.

असे झाले संशोधन?

बर्कले विद्यापीठातील चेताविज्ञान (Neuroscience) विभागातील संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक झिनलू डिंग संशोधनाबाबत सांगतात की, यापूर्वी शास्त्रज्ञ केवळ रक्तातील हार्मोनची पातळी मोजून झोप आणि ग्रोथ हार्मोन यांच्यातील संबंध तपासत असत. परंतु, या नव्या संशोधनात संशोधकांनी थेट उंदरांच्या मेंदूतील चेतापेशींच्या हालचालींची नोंद घेतली. या पद्धतीमुळेच भविष्यातील विविध आजारांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणारी मेंदूतील एक विशिष्ट यंत्रणा शोधून काढणे शक्य झाले.

Sleep Study Growth Hormone
Foods For Better Sleep : गाढ झोप हवीय? मग झोपण्यापूर्वी आवर्जून खा हे ८ मॅग्नेशियमयुक्त पदार्थ!

झोपेच्या काळात मेंदू ग्रोथ हार्मोनवर नियंत्रण कसे ठेवतो?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी मेंदूतील ‘हायपोथॅलॅमस’ या भागावर लक्ष केंद्रित केले. आकाराने लहान असलेला मेंदूचा हा भाग भूक, शरीराचे तापमान, हार्मोनची निर्मिती आणि झोपण्या-जागण्याच्या चक्राचे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. मेंदूच्या या भागातील चेतापेशींचा एक गट ‘GHRH’ नावाचा घटक तयार करतो. हा घटक ग्रोथ हार्मोनच्या स्रावाला चालना देतो. तर दुसरा गट ‘सोमॅटोस्टॅटिन’ या स्रावावर अंकुश ठेवण्याचे काम करतो. या दोन्ही रासायनिक संदेशवाहकांच्या परस्परक्रियेतूनच पिट्यूटरी ग्रंथीद्वारे रक्तात किती प्रमाणात ग्रोथ हार्मोन सोडायचा, याचे अचूक प्रमाण ठरवले जाते.

संशोधकांच्या निदर्शनास काय आले?

  • नॉन-रेम झोप: या टप्प्यात शरीराला सर्वाधिक गाढ आणि विश्रांती देणारी झोप मिळते. त्या काळात शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारा एक अत्यंत महत्त्वाचा हार्मोन ‘सोमॅटोस्टॅटिन’ तयार करणाऱ्या पेशींची हालचाल मंदावते. त्यामुळे हार्मोन रोखण्याचा त्यांचा प्रभाव कमी होतो. त्याच वेळी GHRH शी संबंधित पेशी अधिक सक्रिय होतात आणि ग्रोथ हार्मोन वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.

  • रेम (REM) झोप: झोपेच्या या टप्प्यात आपल्याला प्रामुख्याने स्पष्ट स्वप्ने पडतात, तिथे हे चित्र पुन्हा बदलते. या काळात या दोन्ही संदेशवाहकांची सक्रियता वाढते. या दोघांचे कार्य परस्परविरोधी भासत असले, तरी या टप्प्यातील चेतापेशींच्या अचूक समन्वयामुळे ग्रोथ हार्मोनचा स्राव आणखी वाढतो.

  • झोपेच्या प्रत्येक टप्प्यात एकाच अत्यावश्यक हार्मोनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मेंदू वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतो, हे यातून सिद्ध झाले आहे.

Sleep Study Growth Hormone
Sleep Research study|6 की 8 तास, किती तासांची झोप आहे परफेक्ट? रिसर्च काय सांगतो?

ग्रोथ हार्मोनचा जागे होण्यावर काय परिणाम होतो?

या संशोधनातील सर्वात महत्त्वपूर्ण निष्कर्ष असा की, ग्रोथ हार्मोन हा केवळ झोपेदरम्यान मेंदूने केलेल्या कामाचा परिणाम नाही, तर तो आपल्याला जागे करणाऱ्या मेंदूतील यंत्रणेलाही संकेत पाठवतो. झोपेदरम्यान ग्रोथ हार्मोनची पातळी वाढते, ती मेंदूच्या तळाशी असलेल्या ‘लोकस सेरुलियस’ या भागातील चेतापेशींना सक्रिय करते. सतर्कता, लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता आणि सभोवतालच्या परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी मेंदूला सज्ज ठेवण्यात हा भाग मोलाची भूमिका बजावतो. झोपेमुळे ग्रोथ हार्मोन वाढतो आणि वाढलेला हा हार्मोन मेंदूला आता जागे होण्याची वेळ झाली असल्याचा संदेश देतो. झोप, हार्मोनचा स्राव आणि सतर्कता या तिन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणारे हे एक प्रकारचे चक्रच असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

झोप आणि ग्रोथ हार्मोन अत्यंत नाजूक नियंत्रण प्रणालीचा भाग

या अभ्यासाचे सह-लेखक आणि बर्कले येथील संशोधक डॅनियल सिल्व्हरमन यांच्या मते, झोप आणि ग्रोथ हार्मोन हे एका अत्यंत नाजूक नियंत्रण प्रणालीचा भाग आहेत. अपुऱ्या झोपेमुळे ग्रोथ हार्मोनचे प्रमाण घटू शकते, तर वाढलेली हार्मोनची पातळी मेंदूला जागे होण्यासाठी प्रवृत्त करते. शरीराची वाढ, पेशींची दुरुस्ती आणि निरोगी चयापचय क्रियेसाठी हा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे.

चेतापेशी आणि हार्मोन्स यांच्यात अखंड संवाद

बर्कले येथील शास्त्रज्ञांचे संशोधन स्पष्ट करते की, झोप वरवर कितीही शांत वाटत असली, तरी त्या काळात आपल्या मेंदूत आणि शरीरात अत्यंत सूक्ष्म व शिस्तबद्ध हालचाली सुरू असतात. शरीराची वाढ, झीज भरून काढणे, चयापचय आणि जागे होणे या सर्वांचा समतोल राखण्यासाठी चेतापेशी आणि हार्मोन्स यांच्यात अखंड संवाद सुरू असतो.

रात्रीची गाढ विश्रांतीमध्ये मेंदू करतो अत्यंत महत्त्वाची कामं

आपण जेव्हा गाढ विश्रांती घेत असतो, तेव्हा मेंदू पडद्यामागे अत्यंत महत्त्वाची कामं करत असतो. या प्रक्रियेमुळेच शरीरात स्नायू तयार होतात, हाडं मजबूत होतात, अतिरिक्त चरबी जाळली जाते आणि सकाळी उठल्यावर आपली विचार करण्याची क्षमता अधिक तीक्ष्ण व ताजी तवानी होते, असे या नव्या संशोधनातून समोर आले आहे.

अपुरी झोप आणि लठ्ठपणा, मधुमेह व मेंदूच्या विकारांचा संबंध

या संशोधनाचे निष्कर्ष अपुरी झोप आणि चयापचयाशी संबंधित आजार यांच्यातील संबंधांवर नवा प्रकाश टाकणारे आहेत. ग्रोथ हार्मोन शरीरातील चरबीचा वापर आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. सतत झोपमोड झाल्यास या हार्मोनच्या स्रावाचे संतुलन बिघडते. त्यामुळेच लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. या आजारांमागे इतरही अनेक कारणे असली तरी, अपुरी झोप हे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते.

नवीन संशोधनाचा फायदा काय?

केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे, तर सतर्कता आणि एकाग्रतेशी संबंधित मेंदूच्या भागांवर होणाऱ्या या हार्मोनच्या परिणामाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी शक्यताही संशोधकांनी वर्तवली आहे. स्नायू आणि हाडांच्या मजबुतीसोबतच, सकाळी उठल्यानंतरची व्यक्तीची सतर्कता आणि आकलन क्षमता सुधारण्यातही ग्रोथ हार्मोनची सकारात्मक भूमिका असू शकते, असे झिनलू डिंग यांनी नमूद केले आहे. संशोधकांच्या मते, मेंदूतील या चेतायंत्रणेचा शोध लागल्यामुळे भविष्यात चयापचयाचे विकार तसेच पार्किन्सन्स आणि अल्झायमर यांसारख्या मेंदूच्या आजारांशी निगडित झोपेच्या समस्यांवर नवे उपचार शोधण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Sleep Study Growth Hormone
Lack Of Sleep Heart Health | कमी झोप आणि हार्ट अटॅकचा संबंध आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

प्रत्यक्ष उपचारांसाठी पुढील संशोधनाची गरज

हे प्रयोग सध्या उंदरांवर करण्यात आले असून मानवी शरीरातही हीच यंत्रणा अगदी तंतोतंत तशीच काम करते का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी सावधगिरीही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या माहितीचा उपयोग प्रत्यक्ष उपचारांसाठी करण्यासाठी पुढील संशोधनाची गरज आहे. त्यामुळे झोपण्याची कोणतीही नवीन पद्धत वापरून लगेच वजन कमी करता येईल किंवा स्नायू बनवता येतील, असा दावा या निष्कर्षांतून केलेला नाही; तर या शारीरिक प्रक्रियांचा झोपेशी नेमका कसा संबंध आहे, हे समजून घेण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.