

Pollution Cough vs Infection: आज काल सर्दी, खोकला आणि कफ होणं हे रोजच झालं आहे. कारण दिल्ली, मुंबई आणि पुण्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे, पण अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडतो की, हा खोकला प्रदूषणामुळे आहे की इन्फेक्शनमुळे? दोन्हींची लक्षणे सारखीच वाटतात, त्यामुळे गोंधळ होतो. मात्र थोडं लक्ष दिल्यास फरक ओळखता येतो.
वाढलेला धूर, धूळ, बांधकामातील धूळ किंवा प्रदूषित हवा यामुळे श्वसनमार्गात अडचणी येतात. त्यामुळे खोकला सुरू होतो.
सामान्य लक्षणे
खोकला कोरडा असतो, कफ कमी किंवा नसतो
घशात खवखव, जळजळ किंवा कोरडेपणा जाणवतो
बाहेर गेल्यावर किंवा धूळ-धूर असलेल्या ठिकाणी खोकला वाढतो
घरात किंवा स्वच्छ हवेत गेल्यावर खोकला येत नाही
ताप, अंगदुखी किंवा थकवा सहसा नसतो
हा खोकला संसर्गजन्य नसतो, म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होत नाही.
व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सर्दी, खोकला आणि कफ होतो. हवामान बदल, थंडी, पावसाळा किंवा गर्दीची ठिकाणे यामुळे हा धोका वाढतो.
सामान्य लक्षणे
नाकातून पाणी येणे, शिंक येणे
घसा दुखणे, जेवन करताना घशात त्रास होणे
खोकल्यास कफ येणे (पांढरा, पिवळा किंवा हिरवा)
सौम्य ते मध्यम ताप
अंगदुखी, थकवा, डोकेदुखी
हा खोकला इन्फेक्शनमुळे होऊ शकतो.
कधी कधी छातीत कफ साचल्यामुळे खोकला वाढतो. हा प्रकार बहुतेक वेळा इन्फेक्शननंतर किंवा धूळ किंवा धुराच्या संपर्कानंतर दिसतो.
लक्षणे
खोकल्यावर छातीत कफ कमी झाल्यासारखा वाटतो
सकाळी खोकला जास्त जाणवतो
छातीत जडपणा किंवा कोंडलेपणा जाणवतो
काही वेळा श्वास घेताना घरघर आवज येतो
खोकला सात ते दहा दिवसांपेक्षा जास्त काळ असेल, ताप सतत वाढत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल, तर उशीर न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा दम्याचे रुग्ण असल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
प्रदूषण जास्त असताना मास्क वापरणे फायदेशीर ठरु शकते. पाणी जास्त पिणे महत्त्वाचे आहे. घरात स्वच्छता राखणे आणि हवेशीर वातावरण ठेवणेही गरजेचे आहे. कोणतीही औषधे स्वतःहून न घेता गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे.
थोडक्यात सांगायचे तर, प्रदूषणामुळे होणारा खोकला बहुतेक वेळा कोरडा असतो आणि परिस्थितीनुसार वाढतो, तर संसर्गामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्यास ताप, कफ आणि अंगदुखी यांची साथ असते. हा फरक वेळेवर ओळखल्यास योग्य काळजी घेता येते.