Protein Intake Longevity : कमी प्रोटीनचे सेवन ठरू शकते निरोगी वृद्धत्वासाठी फायदेशीर! नव्या संशोधनातून काय समोर आले?

प्रथिनांच्या सेवनावर नियंत्रण ठेवल्याने चयापचय सुधारण्‍याबरोबरच सूज/दाह कमी होते आणि पेशींचे नुकसान टाळता येते
Protein Intake Longevity
Protein Intake LongevityAI-generated image
Published on
Updated on

Protein Intake Longevity : आहारातील प्रथिनांचे (Protein) प्रमाण कमी केल्याने आरोग्यदायी वृद्धत्वाला चालना मिळू शकते आणि दीर्घायुष्य लाभू शकते, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. विशेषतः काही विशिष्ट अमिनो अॅसिडचे (Amino Acids) सेवन कमी केल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया सुधारण्यास, दाह कमी करण्यास आणि पेशींना होणारे नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्येकासाठी प्रथिनांचे सेवन कमी करणे योग्य असेलच असे नाही. वय, शारीरिक हालचाली आणि एकूण आरोग्य यानुसार शरीराची प्रथिनांची गरज वेगवेगळी असते.

चयापचय प्रक्रिया सुधारणा

नव्या आढाव्यात ३५० हून अधिक प्रयोगशाळा आणि प्राण्यांवरील अभ्यासांचे विश्लेषण करण्यात आले. Cell Pressमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, प्रथिनांचे सेवन कमी केल्याने चयापचय प्रक्रिया सुधारण्यासोबतच शरीरातील दाह आणि पेशींचे नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र,या संभाव्य फायद्यांचा परिणाम व्यक्तीचे वय, शारीरिक सक्रियता आणि एकूण आरोग्य यांसारख्या घटकांवर अवलंबून असू शकतो.

Protein Intake Longevity
Men's Health News : पुरुषांसाठी महत्त्वाची बातमी! इरेक्टाइल डिसफंक्शन हे हृदयविकार आणि डायबिटीजचे संकेत - रिसर्च

अनेक जण शरीराला आवश्यकतेपेक्षा अधिक प्रथिने घेत असण्याची शक्यता

या आढाव्याचे सहलेखक डडली लॅमिंग यांनी सांगितले की, सक्रिय व्यक्तींमध्ये स्नायूंची वाढ आणि व्यायामानंतर शरीराची प्रतिक्रिया सुधारण्यासाठी प्रथिने महत्त्वाची आहेत. मात्र, बहुतांश लोक तुलनेने कमी शारीरिक हालचाल करतात. त्यामुळे अनेक जण शरीराला आवश्यकतेपेक्षा अधिक प्रथिने घेत असण्याची शक्यता आहे आणि त्याचे आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

कमी प्रथिने खाल्ल्याने आयुष्य वाढू शकते का?

संशोधनात असे असे आढळून आले की, प्रथिनांचे प्रमाण मध्यम स्वरूपात कमी करणे तसेच मेथिओनिन, आयसोल्युसिन आणि व्हॅलीन या विशिष्ट अमिनो अॅसिडचे सेवन कमी करणे यामुळे उंदरांच्या अभ्यासात त्यांचे आयुष्य वाढले.एका अभ्यासात मध्यमवयीन नर उंदरांच्या आहारातील व्हॅलीनचे प्रमाण कमी केल्याने त्यांचे आयुष्य २३ टक्क्यांनी वाढल्याचे आढळले. प्राण्यांवरील अभ्यासानुसार, प्रथिनांचे सेवन कमी केल्याने FGF21 या घटकाची पातळी वाढू शकते. त्यामुळे चयापचय प्रक्रिया सुधारण्यास आणि शरीरातील दाह कमी करण्यास मदत होऊ शकते. उंदरांमध्ये FGF21ची उच्च पातळी अधिक आयुर्मानाशी संबंधित असल्याचे आढळले. मादी उंदरांचे आयुष्य सुमारे ४० टक्के, तर नर उंदरांचे आयुष्य सुमारे ३० टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळले.अल्पकालीन मानवी क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रथिनांचे सेवन कमी केल्याने रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारल्याचे आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, मानवांचे आयुष्य प्रत्यक्षात वाढते, याचा थेट पुरावा अद्याप मिळालेला नाही.

Protein Intake Longevity
Belgaum Health News : जीवनशैलीबरोबर आता जनुकेही ठरवणार आजारांची दिशा

प्रथिने कमी केल्याने निरोगी वृद्धत्वाला कशी मदत होऊ शकते?

या आढाव्यात प्रथिनांची मूलभूत रचना असलेल्या विशिष्ट अमिनो अॅसिडचाही अभ्यास करण्यात आला. मेथिओनिन, आयसोल्युसिन आणि व्हॅलीनचे अधिक सेवन केल्याने शरीरातील वाढीशी संबंधित काही जैविक प्रक्रिया सक्रिय होऊ शकतात, असे संशोधकांना आढळले.या प्रक्रिया दीर्घकाळ अतिसक्रिय राहिल्यास शरीरातील दाह, लठ्ठपणा आणि वृद्धत्वाशी संबंधित इतर आरोग्य समस्या वाढण्याचा धोका असू शकतो.प्रथिनांचे सेवन कमी केल्याने शरीरातील चयापचय प्रक्रियेत काही बदल होऊ शकतात. हे बदल निरोगी वृद्धत्वासाठी उपयुक्त ठरू शकतात.

सर्वांसाठी एकच नियम असू शकत नाही

या निष्कर्षांबाबत आश्चर्य व्यक्त करत वैद्यकीय तज्ज्ञ मीर अली यांनी सांगितले की, सध्या प्रभावी मानल्या जाणाऱ्या अनेक आहारपद्धतींमध्ये कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण कमी करताना प्रथिनांवर भर दिला जातो.अमेरिकेच्या सध्याच्या आहार मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रौढांनी दररोज शरीराच्या प्रत्येक किलो वजनामागे १.२ ते १.६ ग्रॅम प्रथिने घेण्याची शिफारस केली जाते. हे प्रमाण किमान शिफारस असलेल्या ०.८ ग्रॅमपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे प्रथिनांच्या सेवनासाठी सर्वांना लागू होईल असा एकच नियम असू शकत नाही, असे या अभ्यासातून सूचित होते.

आणखी संशोधनाची आवश्यकता

संशोधकांना असेही आढळले की, प्रथिनांचे सेवन कमी केल्याने पेशींमधील ऊर्जा निर्मिती करणाऱ्या मायटोकॉन्ड्रियाचे कार्य सुधारू शकते. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होऊन ऊर्जा निर्मिती वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच, शरीरातील जनुकांच्या तरुण अवस्थेशी संबंधित कार्यपद्धती टिकवून ठेवण्यासही याचा फायदा होऊ शकतो. मात्र, हे निष्कर्ष आशादायक असले तरी त्यातील बहुतांश पुरावे प्राण्यांवरील अभ्यासातून मिळाले आहेत. मानवांमध्ये याचे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता आहे.

प्रत्येकासाठी प्रथिने कमी करणे योग्य नाही

प्रथिनांचे सेवन कमी केल्याचा काही लोकांना फायदा होऊ शकतो. मात्र, काही व्यक्तींसाठी अधिक प्रथिने घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. वृद्ध व्यक्तींना प्रथिनांच्या अधिक सेवनाचा विशेष फायदा होऊ शकतो. त्यांना दररोज शरीराच्या प्रत्येक किलो वजनामागे साधारण १.० ते १.२ ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. स्नायूंची झीज किंवा काही दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना ही गरज १.५ ते २.० ग्रॅम प्रति किलो इतकी असू शकते. याशिवाय गर्भवती महिला, लहान मुले, किशोरवयीन मुले, खेळाडू, आजार किंवा दुखापतीतून सावरणाऱ्या व्यक्ती आदींना तुलनेने अधिक प्रथिनांची आवश्यकता असू शकते. प्रथिनांची गरज वय, शारीरिक हालचाली आणि एकूण आरोग्यानुसार बदलत असल्याने आहारातील प्रथिनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करण्यापूर्वी डॉक्टर किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

logo
Pudhari News
pudhari.news