

बंगळूर : बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे हृदयविकार आणि कर्करोगासारखे आजार हे केवळ ताण, चुकीचे खाणे आणि सवयींपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आता वैद्यकीयतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जनुकीय नमुन्याची लवकर तपासणी केल्यास, योग्य आणि आरोग्यदायी जीवनशैली निवडून वेळेवर आजारांवर नियंत्रण ठेवता येते. विशेष म्हणजे, यासाठी वयाचे कोणतेही बंधन राहिलेले नाही.
गुरुग्राममधील एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर व्यावसायिक प्रजेश (नाव बदललेले) यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा त्यांना जनुकीय तपासणीचा सल्ला देण्यात आला. या तपासणीतून त्यांना दुर्मीळ असलेला टाईप-1 मधुमेह असल्याचे उघड झाले, जो त्यांच्या आजी-आजोबांकडून आलेला होता. ही तपासणी वेळेवर झाल्याने त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात योग्य उपचार सुरू झाले आहेत. वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे डॉ. नितीन कपूर यांनीही असाच एक प्रसंग सांगितला, थायरॉईड कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या एका वर्षाच्या मुलाची जनुकीय तपासणी केली असता, त्यात कर्करोगाच्या पेशी आढळल्या.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकान यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या जनुकीय प्रकारानुसार उपचार करणे हेच भारतीय वैद्यकशास्त्राचे भविष्य आहे. सध्या ‘एकच उपचार सगळ्यांसाठी’ अशी पद्धत आहे; पण आता जनुकीय अहवालाच्या आधारे केंद्रित उपचार करण्याची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते, दक्षिण आशियाई लोकांसाठी, एमवायबीपीसीए 3 जनुकांमुळे, त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता आनुवंशिकरीत्या अधिक असते.