

Healthy lifestyle tips
रोज १० हजार पावले चालणे आणि घरचे साधे जेवण खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. मात्र, असे करूनही अनेकदा शरीरात ऊर्जा जाणवत नाही किंवा वजन कमी होत नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने तंदुरुस्त राहायचे असेल, वजन घटवायचे असेल आणि दिवसभर ताजेतवाने राहायचे असेल, तर केवळ चालण्यापुरते मर्यादित राहून चालणार नाही. यासाठी चयापचय क्रिया उत्तम ठेवणे गरजेचे आहे.
सकाळी वॉक करून आल्यावर नाश्त्यामध्ये पोहा, उपमा किंवा दुपारी भाजी-भाकरी आणि वरण असा पोषक आहार घेत असला, तरी शरीराला प्रामुख्याने कर्बोदकेच मिळतात. दिवसातून केवळ एक वाटी वरण खाल्ल्याने शरीराची गरज भागणार नाही. आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवा, कारण प्रथिने स्नायूंची दुरुस्ती करतात. त्यामुळे आहारात कर्बोदके, फायबर आणि निरोगी चरबीसोबत प्रथिनांचा समतोल राखणे आवश्यक आहे.
दररोज चालणे हृदय आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी त्यामुळे स्नायूंवर हवा तसा प्रभाव पडत नाही. वयाच्या ३० वर्षांनंतर स्नायू बळकट ठेवले नाहीत, तर ते कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्क्वॅट्स, पुशअप्स किंवा रेझिस्टन्स बँडच्या साहाय्याने व्यायाम करा. हे व्यायाम अगदी घरीच सोप्या पद्धतीने करता येतात. मात्र, चालणे बंद न करता या व्यायामांचा दिनचर्येत समावेश करा.
आरोग्यासाठी आहार आणि व्यायामासोबतच गाढ झोप अतिशय महत्त्वाची आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरून केवळ ६ तासांची झोप घेत असाल, तर तंदुरुस्त राहणे कठीण आहे. एका रात्रीची अपुरी झोपही दुसऱ्या दिवशी रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडवू शकते. त्यामुळे चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी दररोज वेळेवर आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सकाळी एक तास वॉक केल्यानंतर दिवसभरात सलग ९ तास बसून राहणे हे ‘सिडेंटरी लाईफस्टाईल’ म्हणजेच आळशी जीवनशैलीमध्येच मोडते. यासाठी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर किमान १० मिनिटे आवर्जून चाला. कामाच्या वेळेत मधूनच उठून स्ट्रेचिंग करणे किंवा थोडे चालणे शरीराला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करते.
निरोगी आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करूनही जर सतत थकवा जाणवत असेल, तर त्यामागे आरोग्याची कोणतीही गुंतागुंत असू शकते. अशा वेळी व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, थायरॉईड आणि इन्सुलिन रेजिस्तानसची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य ती जीवनसत्त्वे घेतल्यास तब्येत सुधारण्यास मदत होते.