

Rajgira health benefits
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नसून योग्य आहार अतिशय महत्त्वाचा असतो. आपण दररोज काय खातो, याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. यासाठी महागडे अन्नपदार्थ खाण्याची मुळीच गरज नाही. अभिनेत्री अनुष्का शर्माने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ती गव्हाच्या पिठाची चपाती खात नाही. त्याऐवजी ती राजगिरा पासून तयार केलेली भाकरी खाणे पसंत करते.
राजगिरा हे काही परदेशातून आलेले महागडे अन्न नसून, आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून वापरात असलेले पारंपरिक धान्य आहे. कॅन्सर सर्जन डॉ. वर्तिका विश्वाणी यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे गव्हाऐवजी राजगिऱ्याच्या पिठाचा आहारात समावेश करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.
राजगिऱ्यामध्ये सर्व ९ आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात, ज्यामुळे तो प्रथिनांचा एक परिपूर्ण स्रोत ठरतो. एका कप शिजवलेल्या राजगिऱ्यामध्ये जवळपास ९ ग्रॅम उच्च दर्जाचे प्रोटीन मिळते. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि दररोजच्या प्रथिनांची गरज पूर्ण करताना अडचण येत असेल, तर राजगिऱ्याची भाकरी किंवा पोळी हा एक उत्तम पर्याय आहे.
गव्हाच्या पिठात ग्लूटेन आढळते, तर राजगिऱ्याचे पीठ हे नैसर्गिकरीत्या ग्लूटेन-फ्री असते. ज्यांना ग्लूटेनचा त्रास होतो किंवा डॉक्टरांनी ग्लूटेन-फ्री आहार घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यांच्यासाठी राजगिऱ्याच्या पिठाचा वापर फायदेशीर ठरतो.
राजगिऱ्यामध्ये प्रथिनांशिवाय फायबर, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि फॉस्फरस यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे घटक हाडे, स्नायू, पचनक्रिया आणि शरीरातील ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
राजगिऱ्यामध्ये लायसिन नावाचे आवश्यक अमिनो ॲसिड असते. हे शरीरात प्रथिने आणि कोलेजन तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कोलेजेन हे एक आवश्यक प्रथिन आहे, जे त्वचा, हाडे आणि इतर संयोजी ऊतींना रचना आणि मजबुती देते.
गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही थेट राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी किंवा पोळी बनवू शकता. याशिवाय, हे पीठ नेहमीच्या गव्हाच्या पिठात मिसळूनही वापरता येते. तसेच राजगिऱ्याची खिचडी बनवूनही याचा आहारात सहज समावेश करता येतो.