

Health Tips
निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी कोणत्याही ग्लॅमरस बदलाची गरज नसून, आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत साध्या आणि सोप्या सवयीच जादू घडवू शकतात. हार्वर्ड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी दीर्घायुष्यासाठी अशा ४ मूलभूत सवयी सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब केल्यास तुमच्या आरोग्याचा आलेख उंचावू शकतो. त्यांच्या मते, साध्या चार सवयी दिसायला सामान्य असल्या तरी, त्या आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.
वाढत्या वयानुसार शरीर कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेकदा आपण केवळ चालण्यालाच पुरेसा व्यायाम मानतो; परंतु भविष्यात परावलंबीत्व टाळण्यासाठी स्नायूंची ताकद टिकवून ठेवणे आवश्यक आहे. 'वेट ट्रेनिंग' किंवा स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम करणे ही आरोग्यासाठी केलेली एक मोठी गुंतवणूक असल्याचे डॉ. सेठी सांगतात.
आजच्या काळात बाहेरचे जंक फूड किंवा पॅकेज्ड फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे, जे शरीरासाठी घातक ठरते. यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे घरात तयार केलेले ताजे अन्न. जेव्हा आपण घरी जेवण बनवतो, तेव्हा नकळतपणे भेसळयुक्त आणि हानिकारक घटकांपासून दूर राहतो. हाच निरोगी राहण्याचा सर्वात शाश्वत मार्ग आहे.
श्रीमंती आणि प्रसिद्धी मिळवणे महत्त्वाचे असले तरी, विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की दीर्घ आणि सुखी जीवनासाठी तुमचे कौटुंबिक व सामाजिक संबंध अत्यंत मोलाचे असतात. तुमचे खरे मित्र आणि कुटुंब हीच तुमची खरी पुंजी आहे. त्यामुळे प्रियजनांसोबत वेळ घालवणे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरते.
आपल्याकडे काय नाही, याची तक्रार करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची सवय लावा. आयुष्यातील छोट्या-छोट्या सुखांसाठी आभार मानल्याने मानसिक शांतता मिळते. यामुळे केवळ तुमची झोपच सुधारत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक होतो.