

Diabetes research
नवी दिल्ली: मधुमेहावर अत्यंत प्रभावी मानले जाणारे मेटफॉर्मिन हे औषध केवळ यकृतावरच नाही, तर थेट मेंदूवरही परिणाम करते, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. वैज्ञानिकांना मेंदूमध्ये रक्तातील साखर नियंत्रण करणारे एक ‘मास्टर प्रोटीन’ सापडले असून, यामुळे मधुमेहावर भविष्यात अधिक प्रभावी उपचार मिळू शकतात.
नव्या संशोधनानुसार, ही औषधे मेंदूवरही परिणाम करतात, त्यामुळे अल्झायमर सारख्या आजारांमध्येही ती उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय, न्यूरॉन्सचे संरक्षण करून मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करू शकतात.
या अभ्यासाचे लेखक आणि मेडिसिनमधील बालरोग पोषण विभागाचे सहयोगी प्राध्यापक मकोतो फुकुडा यांनी सांगितले की, "आतापर्यंत असे मानले जात होते की मेटफॉर्मिन प्रामुख्याने यकृतातील ग्लुकोजची निर्मिती कमी करून रक्तातील साखर नियंत्रित करते. काही अभ्यासांनुसार ते आतड्यांद्वारे कार्य करते असेही समोर आले होते. मात्र, मेंदू हा संपूर्ण शरीरातील ग्लुकोज मेटाबॉलिज्मचा मुख्य नियंत्रक असल्याने त्यांनी मेंदूवर लक्ष केंद्रित केले. 'सायन्स ॲडव्हान्सेस' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, मेटफॉर्मिन सुरुवातीपासूनच मेंदूवर प्रभाव टाकत आले आहे, जरी यापूर्वी तसे मानले जात नव्हते.
संशोधकांनी मेंदूच्या वेंट्रोमेडियल हायपोथॅलॅमस मधील RAP1 नावाच्या प्रोटीनवर लक्ष केंद्रित केले. हे प्रोटीन भूक नियंत्रित करण्यासाठी आणि ग्लुकोजची पातळी ओळखण्यासाठी महत्त्वाचे असते. अभ्यासात असे दिसून आले की, या भागात RAP1 च्या क्रियाशीलतेवर परिणाम करून मेटफॉर्मिन रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.
संशोधकांनी प्रयोगादरम्यान पाहिले की, जेव्हा मधुमेही उंदरांच्या मेंदूमध्ये थेट मेटफॉर्मिन टोचले गेले, तेव्हा अत्यंत कमी डोसमध्येही रक्तातील साखर वेगाने कमी झाली. याउलट, ज्या उंदरांच्या मेंदूत RAP1 प्रोटीनची कमतरता होती, त्यांच्यावर मेटफॉर्मिनचा कोणताही परिणाम झाला नाही.
फुकुडा यांनी सांगितले की, जेव्हा मेटफॉर्मिन मेंदूत पोहोचते, तेव्हा SF1 न्यूरॉन्स सक्रिय होतात. मात्र, ही सक्रियता केवळ तेव्हाच दिसून आली जेव्हा शरीरात RAP1 प्रोटीन उपस्थित होते. यावरून हे सिद्ध होते की, मेटफॉर्मिनला रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि मेंदूच्या पेशी सक्रिय करण्यासाठी RAP1 प्रोटीनची नितांत गरज असते.