Dementia Risk : सावधान..! तुम्ही राहता त्या परिसरावर ठरतो स्मृतिभ्रंशाचा धोका! नवीन रिसर्च काय सांगतो?

निरोगी वृद्धत्वाला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी घराच्या आसपासचा परिसर अत्यंत महत्त्वाचा घटक
Living near green spaces can reduce dementia risk reveals new study.
Published on: 
Updated on: 

Dementia Study : मागील दोन दशकांतील तंत्रज्ञानाची प्रगती विस्मयकारक आहे. तंत्रज्ञानाच्या या वेगाने सामान्यांना थक्क केले असून रोजच्या जगण्यात मोठे सोयी-सुविधांचे बदल घडून आले आहेत. एका बाजूला जग आधुनिक आणि प्रगत होत असताना, दुसऱ्या बाजूला आरोग्याशी संबंधित नवी आणि गुंतागुंतीची आव्हाने मानवी समाजासमोर उभी ठाकली आहेत. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये 'स्मृतिभ्रंश' (डिमेन्शिया) या मानसिक व मज्जासंस्थेशी संबंधित आजाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. आता नवीन संशोधनात तुम्ही राहत असणारा परिसर आणि 'स्मृतिभ्रंश' याचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तीन हजार जणांचे १६ वर्ष निरीक्षण

स्मृतिभ्रंशावरील नवीन संशोधन 'अल्झायमर्स अँड डिमेंशिया' (Alzheimer's & Dementia) या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. या अभ्यासात सुमारे ३,००० सहभागींचा समावेश होता. संशोधनात सहभागी झालेल्या तीन हजार जणांचे १६ वर्षांपर्यंत निरीक्षण करण्यात आले.

Living near green spaces can reduce dementia risk reveals new study.
Health News: दीर्घायुष्याचा उपाय सापडला! जपानी अभ्यासातून मोठा खुलासा; तुमचीही वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होईल

हिरवळ आणि स्मृतिभ्रंशाचा थेट संबंध

संशोधकांनी सहभागींच्या घराभोवती असलेल्या वनस्पतींचे प्रमाण मोजले. त्यांनी काळाच्या ओघात सहभागींच्या स्मरणशक्तीचे आरोग्य आणि स्मृतिभ्रंश होण्याच्या प्रक्रियेचाही मागोवा घेतला. स्वीडनमधील स्टॉकहोम युनिव्हर्सिटी आणि कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटद्वारे करण्यात आलेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, घराच्या जवळ अधिक हिरवळ (ग्रीन स्पेस) असल्यास स्मृतिभ्रंश होण्याचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. या अभ्यासाच्या संशोधन प्रमुख आणि सह-लेखिका, सिसिलिया स्टेनफोर्स यांनी म्हटले आहे की, "संशोधन हे दर्शवते की, मेंदूचे आरोग्य आणि निरोगी वृद्धत्वाला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी घराच्या आसपासचा परिसर अत्यंत महत्त्वाचा घटक आहे."

Living near green spaces can reduce dementia risk reveals new study.
Health News: दिवसभर एका जागी बसून राहणे आरोग्यासाठी का हानिकारक, हृदयविकार तज्ञ काय सांगतात?

निसर्गाच्या सानिध्यामुळे आरोग्यावर कोणता परिणाम होतो?

संशोधनात आढळले की, हिरवळीच्या जवळ राहिल्याने स्मृतिभ्रंशापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. हा संबंध घराच्या अगदी जवळच्या परिसरात (१०० मीटरच्या आत) सर्वाधिक दिसून आला. घरापासून हिरवळीचे अंतर जसजसे वाढत गेले, तसतसा हा संरक्षणात्मक परिणाम कमी होत गेला. हिरवळ स्मृतिभ्रंश कमी करण्यात परिणाम करू शकते. निसर्गाच्या सानिध्यात राहणे यात तणाव कमी करण्यासारख्या थेट घटकांपासून ते आरोग्यासाठी पूरक असलेल्या सवयींना प्रोत्साहन मिळण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर स्मृतिभ्रंशापासून बचाव करण्यासाठी चांगली झोप, शारीरिक हालचाली, तसेच सामाजिक संवाद आणि जवळीक वाढणे यांसारख्या बाबींचा समावेश होतो. संशोधन प्रमुख स्टेनफोर्स म्हणतात, "नैसर्गिक वातावरण आणि हिरवळ मानसिक पुनरुज्जीवनास मदत करू शकतात, तणाव कमी करू शकतात आणि आरोग्याची व आनंदाची भावना वाढवू शकतात."

शहरी भागात नवीन धोरणांची गरज

हिरवळ अप्रत्यक्षपणेही आरोग्याचे रक्षण करते; ती लोकांना रहदारीचा आवाज, वायू प्रदूषण आणि अति उष्णता यांसारख्या घातक पर्यावरणीय घटकांपासून दूर ठेवते. २०२५ मध्ये, युरोपियन युनियनमध्ये सुमारे ९ दशलक्ष लोक स्मृतिभ्रंशासह जगत होते आणि २०५० पर्यंत हा आकडा १४ दशलक्षाहून अधिक होण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या मते, या संशोधनामुळे आता मेंदूच्या आरोग्याला पूरक ठरेल अशा शाश्वत शहरी नियोजनाची गरज आहे. "शहरे आणि निवासी परिसरांचे नियोजन व विकास करतो, तेव्हा मेंदूच्या आरोग्याचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या घरांच्या आसपास असलेली हरित क्षेत्रे (ग्रीनस्पेस) सार्वजनिक आरोग्य, हवामान अनुकूलन आणि जैवविविधतेसाठी एक सामायिक संसाधन ठरू शकतात,” असा सल्लाही स्टेनफोर्स देतात.

Living near green spaces can reduce dementia risk reveals new study.
Men's Health News : पुरुषांसाठी महत्त्वाची बातमी! इरेक्टाइल डिसफंक्शन हे हृदयविकार आणि डायबिटीजचे संकेत - रिसर्च

पर्यावरणाचा आपल्या मेंदूवर आणि झोपेवर कसा परिणाम होतो?

"आपल्या आजूबाजूचा परिसर आणि आपल्या घरांची रचना याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर तसेच मेंदूच्या आरोग्यावर होत असतो," असे मज्जासंस्था तज्ज्ञांनी यापूर्वीच्या आपल्या संशोधनात स्पष्ट केले आहे. आता नवीन संशोधनही ही बाब अधोरेखित करते. सध्याच्या काळात पर्यावरणाचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो, याविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. हे आरोग्य जपण्यासाठी सध्या असलेल्या निसर्गाचे संवर्धन खूप गरजेचे आहे. यासोबतच, सर्वसामान्य नागरिक असोत वा दिव्यांग व्यक्ती, सर्वांनाच सहज जाता येईल आणि आल्हाददायक वाटेल, अशा हिरवळीच्या जागा (हरित परिसर) तयार करायला हव्या, याचा पुनरुच्चारच नवीन संशोधन करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news