New Research : बाळ फक्त आईलाच नव्हे, तर बाबांनाही त्यांच्या गंधावरून ओळखतं! विज्ञानाने अखेर केले सिद्ध

वडील प्रत्यक्ष खोलीत उपस्थित नसले, तरीही बाळं त्यांच्या शरीराचा विशिष्ट गंध अचूक ओळखू शकतात
Father Body Odor baby study
प्रतिकात्‍मक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

Father Body Odor baby study : आईचा गंध असलेला कापड बाळाजवळ ठेवल्यास ते शांत होते, पटकन झोपी जाते, ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक साधी युक्ती आहे. जन्माआधीच गर्भाशयातील विशिष्ट द्रवामुळे बाळ आईचा गंध शोषून घेते. त्यामुळे जन्मानंतरही हा ओळखीचा गंध बाळाला सुरक्षिततेची जाणीव देऊन शांत ठेवण्यास मदत करतो, असे यापूर्वीच्‍या संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. त्यामुळेच गर्भधारणा आणि जन्माच्या वेळी वडिलांपेक्षा बाळाशी आईची जैविक नाते अधिक घट्‍ट मानले जाते. मात्र, प्रसिद्ध 'सायन्स ॲडव्हान्सेस' या नियतकालिकात प्रसिद्ध नवीन अभ्यासाने हा जुना समज बदलला आहे. या संशोधनानुसार, वडील प्रत्यक्ष खोलीत उपस्थित नसले, तरीही बाळं त्यांच्या शरीराचा विशिष्ट गंध अचूक ओळखू शकतात आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात.

नवीन संशोधनात अत्‍यंत रंजक खुलासे समोर

सस्तन प्राण्यांच्या नवजात बालकांमध्ये ऐकणे किंवा पाहणे यापेक्षा गंध घेण्याची क्षमता सर्वात आधी विकसित होते. आईकडून मिळणारे रासायनिक संकेत बाळाच्या सामाजिक आणि बौद्धिक विकासाला आकार देतात. याच गंधामुळे बाळ ओळखीच्या आणि अनोळखी चेहऱ्यांमधील फरक ओळखू शकते. भीती वाटल्यास स्वतःला शांतही करू शकते. मात्र, आईप्रमाणेच बाळ आपल्या बाबांच्या गंधालाही असाच प्रतिसाद देते का? यावर आता संशोधकांनी अभ्यास सुरू केला असून विज्ञानासमोर अत्यंत रंजक आणि नवनवीन खुलासे येत आहेत. या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका यारा शापिरा सांगतात, “आजकाल बालसंगोपनामध्ये वडिलांचा सहभाग कमालीचा वाढताना दिसतोय. मात्र, बाळाच्या सुरुवातीच्या शारीरिक आणि मानसिक विकासातील त्यांच्या या अद्वितीय योगदानाबद्दल अजूनही आपल्याकडे खूप कमी माहिती उपलब्ध आहे.”

कसे झाले संशोधन?

वडिलांच्या गंधाचा बाळाच्या मेंदूवर काय परिणाम होतो? हे शोधण्यासाठी संशोधक यारा शापिरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ४० वडील-बाळांच्या जोड्यांवर विशेष अभ्यास केला. या प्रयोगात सहभागी झालेल्या वडिलांनी सलग दोन रात्री एक टी-शर्ट घातला. नंतर तो एका बंद बरणीत सुरक्षित ठेवण्यात आला. त्यानंतर प्रत्येक बाळाचा तीन वेगवेगळ्या टप्प्यांत संवाद घडवून आणला गेला. पहिला स्वतःच्या वडिलांसोबत, दुसरा अनोळखी पुरुषासोबत (जवळ वडिलांचा टी-शर्ट ठेवून) आणि तिसरा अनोळखी पुरुषासोबत (जवळ एक नवीन, न वापरलेला शर्ट ठेवून).

Father Body Odor baby study
New research : दुर्मिळ युगल तारका प्रणालीचा शोध :आयुकाच्या शास्त्रज्ञांना मोठे यश

प्रयोगातून समोर आला महत्त्‍वपूर्ण निष्कर्ष

संशोधकांनी तिन्ही संवादांदरम्यान बाळ आणि प्रौढ व्यक्ती दोघांच्याही मेंदूतील हालचाली एकाच वेळी नोंदवण्यासाठी 'ईईजी कॅप्स'चा वापर केला. या प्रयोगातून दोघांच्या मेंदूतील लय किती प्रमाणात जुळते, हे मोजण्यात आले. याविषयी माहिती देताना संशोधक शापिरा म्हणाल्या, "संवादादरम्यान बाळ आणि प्रौढ व्यक्तीच्या मज्जासंस्थेतील क्रियाकलाप एकाच वेळेत तंतोतंत जुळतात की नाही, हे आम्ही तपासले. हे अगदी दोन नर्तकांनी एकाच तालावर एकत्र नाचण्यासारखे आहे. प्रत्यक्ष संवादादरम्यान, बाळांचे मेंदू अनोळखी पुरुषांपेक्षा त्यांच्या स्वतःच्या वडिलांशी अधिक तीव्रतेने जुळले. हा परिणाम एका विशिष्ट सर्किटमध्ये केंद्रित होता. वडिलांच्या मेंदूचा डावा मध्यवर्ती भाग आणि बाळाच्या मेंदूचा उजवा टेम्पोरल भाग, जो सामाजिक प्रक्रियेसाठी ओळखला जातो."

वडिलांचा गंध ठरतो बाळासाठी संजीवनी!

संशोधकांनी या अभ्यासात बाळाचा मेंदू अनोळखी व्यक्तीशी कसा जुळवून घेतो, हेदेखील अत्यंत बारकाईने तपासले. प्रयोगादरम्यान एक थक्क करणारी गोष्ट समोर आली. अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना जवळ वडिलांच्या गंधाचा टी-शर्ट ठेवण्यात आला, तेव्हा बाळ आणि त्या अनोळखी व्यक्तीच्या मेंदूतील ताळमेळ हुबेहूब खऱ्या वडील-बाळाच्या संवादाच्या पातळीइतकाच दिसून आला. याउलट, जेव्हा वडिलांच्या टी-शर्टऐवजी न वापरलेला नवीन टी-शर्ट ठेवला, तेव्हा बाळाचा अनोळखी व्यक्तीच्या मेंदूशी फारसा समन्वय साधला गेला नाही.

Father Body Odor baby study
Obesity Treatment new research | लठ्ठपणावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांना सापडला नवा मार्ग

विज्ञानाने मांडला एक नवा सिद्धांत

वडिलांचा गंध जवळ असताना बाळे अनोळखी व्यक्तीकडे पाहून अधिक हसली, गोड आवाज काढू लागली आणि कमालीची उत्साही दिसली. यावरून विज्ञानाने एक नवा सिद्धांत मांडला आहे की, आईची उपस्थिती बाळाला शांतता आणि सुरक्षिततेची जाणीव करून देते, तर वडिलांचा गंध बाळाला नवीन गोष्टी शोधण्यास आणि मोकळेपणाने खेळण्यास प्रोत्साहन देतो.

वडिलांचे वर्तनही ठरते महत्त्वपूर्ण

संशोधकांना हेदेखील समजून घ्यायचे होते की, हा परिणाम बाळाच्या संगोपनात वडिलांचा सहभाग किती आहे यावर अवलंबून आहे का? दैनंदिन संगोपनातील वडिलांची भूमिका तपासण्यासाठी त्यांना एक प्रश्नावली भरण्यास सांगण्यात आले. संशोधन टीमला असे आढळले की, ज्या वडिलांचा मुलांसोबत अधिक सहवास असतो, त्यांची बाळे वडिलांच्या गंधाच्या उपस्थितीत अधिक सुसंवादीपणे वागतात. यावरून असे सूचित होते की, मुलाला दैनंदिन जीवनात वडिलांकडून किती संवेदी अनुभव मिळतो, त्यानुसार हा परिणाम वाढतो.

Father Body Odor baby study
Giraffe Research | जिराफ बुद्धिमान, त्‍यांना गणितही कळते!

बाबांच्या गंधात दडलीय सुरक्षेची जादू!

संशोधकांच्या मते, वडिलांच्या शरीराचा गंध हा एका प्रकारे त्यांचीच उपस्थिती दाखवून देतो. हा गंध बाळाच्या मेंदूला एक प्रकारचा आधार आणि सुरक्षेची जाणीव देतो. त्यामुळेच, एखादी अनोळखी व्यक्ती समोर असली तरी वडिलांचा गंध जवळ असल्याने बाळाला भीती वाटत नाही आणि ते सुरक्षित अनुभवते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, प्रत्यक्ष बाबा सोबत असताना बाळाच्या मेंदूत आणि मज्जासंस्थेत ज्या सकारात्मक हालचाली होतात, तशाच हालचाली केवळ बाबांच्या गंधामुळेही निर्माण होऊ शकतात. या अभ्यासाशी थेट संबंध नसलेल्या इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातील संशोधक इवा मिशोर म्हणतात, “बाळाचा शारीरिक-मानसिक विकास असो किंवा मोठेपणीचे संबंध, शरीराच्या गंधाचे महत्त्व आपण नेहमीच दुर्लक्षित केले आहे. लहान बाळे बोलू शकत नसल्याने, त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात या गंधाची भूमिका अत्यंत मोलाची ठरते.”

वडील आणि बाळातील मेंदूचा ताळमेळ 'अल्फा रिदम'वर

संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, वडील आणि बाळ यांच्यातील मेंदूचा ताळमेळ जुळण्याची प्रक्रिया ही आई आणि बाळाच्या प्रक्रियेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या मज्जासंस्थेवर आधारित असते. पूर्वी झालेल्या संशोधनातून असे समोर आले होते की, आई आणि बाळ यांच्यातील मेंदूची लय ही 'थीटा रिदम'वर चालते, जी प्रामुख्याने बाळाच्या भावनिक प्रक्रियेशी संबंधित असते. मात्र, या नवीन अभ्यासात एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. वडील आणि बाळ यांच्यातील मेंदूचा हा ताळमेळ 'अल्फा रिदम'वर अवलंबून असल्याचे आढळले. ही मेंदूची लाट बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाच्या नंतरच्या टप्प्यात परिपक्व होते आणि ती प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेशी संबंधित असते.

नवा प्रयोग बाळाची काळजी घेणाऱ्या पुरुष पालकांची भूमिका स्पष्ट करतो

संशोधक इवा मिशोर यांनी स्पष्ट केले की, हा अभ्यास मुख्यत्वे बाळाची काळजी घेणाऱ्या पुरुष पालकाची भूमिका स्पष्ट करतो, वडिलांच्या संपूर्ण जैविक भूमिकेबद्दल सांगत नाही. "हा अभ्यास म्हणजे पितृत्वाचे संपूर्ण जैविक रहस्य उलगडणे नव्हे, तर बाळाच्या मानसिक-शारीरिक विकासात आणि नाते घट्ट करण्यात आई-बाबा दोघांच्या वेगवेगळ्या भूमिका कशा असतात, यावर प्रकाश टाकणे आहे," असे त्या म्हणाल्या.

Father Body Odor baby study
Loneliness Cells Research | एकटेपणाच्या पेशींचा शोध घेताहेत न्यूरोसायंटिस्ट

नवीन संशोधनाच्या मर्यादा काय?

प्रयोगाच्या प्रमुख लेखिका यारा शापिरा यांनीदेखील या संशोधनाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या मते, वडिलांचा किंवा इतर कोणत्याही काळजीवाहकाचा गंध बाळाचा विकास कसा घडवतो, हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी अजूनही बरंच संशोधन बाकी आहे. "पुढील महत्त्वाची पायरी म्हणजे वडिलांच्या शरीराच्या गंधाची तुलना कुटुंबातील इतर सदस्यांशी किंवा अनोळखी व्यक्तींच्या गंधाशी करणे. यावरूनच हे स्पष्ट होईल की, बाळाचा हा प्रतिसाद फक्त स्वतःच्या बाबांच्याच गंधापुरता मर्यादित आहे, की कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी माणसाच्या गंधाला मिळणारी एक सामान्य प्रतिक्रिया आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news