

न्यूयॉर्क : मानवी शरीरातील ऊर्जा जाळण्यास मदत करणार्या ‘ब्राऊन फॅट’ या पेशींच्या कार्यामागील एक महत्त्वाचे जैविक रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, शरीरातील ऊर्जा जाळण्याची क्षमता वाढवून लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणे आता शक्य होऊ शकते.
संशोधकांनी SLIT3 नावाचे एक विशेष प्रथिन शोधून काढले आहे. हे प्रथिन दोन भागांत विभागले जाते आणि ब्राऊन फॅटच्या आत रक्तवाहिन्या तसेच मज्जातंतूंचे जाळे तयार करण्यास मदत करते. या रचनेमुळे हे मेदयुक्त ऊतक अन्नातील पोषक घटक वेगाने शोषून घेते आणि त्याचे चरबीत रूपांतर करण्याऐवजी थेट उष्णतेमध्ये रूपांतर करते. शरीरातील बहुतेक चरबी ही ‘व्हाईट फॅट’ स्वरूपात असते, जी अतिरिक्त ऊर्जा साठवून ठेवते आणि लठ्ठपणा वाढवण्यास कारणीभूत ठरते. याउलट, ‘ब्राऊन फॅट’ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि चयापचय आरोग्य राखण्यासाठी काम करते.
जेव्हा शरीराला थंडी वाजते, तेव्हा हे फॅट ग्लुकोज आणि लिपिडस्चा वापर करून उष्णता निर्माण करते. फरनाज शमसी, सहायक प्राध्यापक, एनयूयू कॉलेज ऑफ डेंटिस्ट्री, यांनी सांगितले, ‘थर्मोजेनेसिस (उष्णता निर्मिती) प्रक्रियेदरम्यान, सर्व रासायनिक ऊर्जेचे रूपांतर उष्णतेमध्ये होते, ती पांढर्या चरबीसारखी शरीरात साठवली जात नाही. ब्राऊन फॅट एका ‘मेटाबॉलिक सिंक’सारखे काम करते, जे पोषक घटक ओढून घेते आणि त्यांना साठवण्यापासून रोखते.
आतापर्यंत लठ्ठपणा कमी करण्यासाठी भूक कमी करण्यावर भर दिला जात असे. मात्र, या नवीन शोधामुळे शरीराची ऊर्जा जाळण्याची नैसर्गिक क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करता येईल. ब्राऊन फॅटला मेंदूकडून सिग्नल मिळवण्यासाठी मज्जातंतूंच्या दाट जाळ्याची आणि ऊर्जेसाठी रक्तवाहिन्यांची गरज असते, ज्याच्या निर्मितीत ‘ SLIT3’ प्रथिन मोलाची भूमिका बजावते.