

पुणे : पुण्यातील आयुका संस्थेतील शास्त्रज्ञांनी दुर्मीळ मॅजेलॅनिक ब्रिज नामक दोन लघु आकाशगंगांना जोडणाऱ्या एका दुर्मीळ युगल तारका प्रणालीचा शोध लावला आहे. या नव्या निरीक्षणातून २० लाख क्ष-किरणांचाही शोध लावण्यात मोठे यश आले आहे.
खगोलीय क्ष-किरण निरीक्षणांमुळे विश्वातील अत्यंत उष्ण, ऊर्जावान प्रक्रियांचा अभ्यास करता येतो. ज्या सामान्य दृश्यमान प्रकाशात दिसून येत नाहीत. विश्वाचा क्ष-किरण प्रकाशात अधिक सखोल वेध घेणाऱ्या ई-रोशिता या दुर्बिणीच्या नव्या डेटा सेटमुळे जवळपास 20 लाख क्ष-किरण स्रोतांची नोंद झाली आहे. याच डेटाच्या अभ्यासाचे नेतृत्व इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका) पुणे येथील डॉ. तथागत साहा आणि प्रा. चान्द्रेयी मैत्रा यांनी केले.
संशोधनाला लागले ५५६ दिवस
या निरीक्षणांना एकूण 556 दिवस लागले. या नव्या डेटामध्ये 19 लाखांहून अधिक बिंदुसदृश क्ष-किरण स्रोत तसेच आकाशगंगांचे समूह आणि सुपरनोव्हा अवशेषांसारखे सुमारे 64 हजार विस्तारित स्रोत आहेत. क्ष-किरण स्रोतांची ओळख आणि त्यांचे अंतर अधिक अचूकपणे समजून घेण्यासाठी या डेटाला दृश्यमान आणि अवरक्त (इन्फ्रा-रेड) प्रकाशातील इतर सर्वेक्षणांच्या माहितीसोबतही जोडण्यात आले आहे.