Yoga Therapy
Yoga Therapy

Yoga Therapy : मजबूत मणक्यांसाठी योगोपचार

Published on

आपले मणके चांगल्या स्थितीत असतील तर मान, कंबर, पाठ, खांदा, हात यांचे आरोग्य चांगले राहते. मणक्यांचे आरोग्य बिघडले तर वर उल्लेख केलेल्या सर्व अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे मणके मजबूत करण्यासाठी काही आसने दररोज करणे आवश्यक आहे. ( Yoga Therapy ) 

संबंधित बातम्या 

शिरासन

आपले दोन्ही पाय समोरच्या बाजूला सरळ सोडून बसा. आता डावा पाय गुडघ्यातून वळवा. डाव्या पायाचा तळवा उजव्या जांघेला चिकटवून ठेवा. दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन आपले डोके पुढच्या दिशेने हळूहळू खाली आणा. आपल्या दोन्ही हातांचे तळवे उजव्या पायाच्या पंजाला टेकतील आणि कपाळ उजव्या पायाच्या गुडघ्याला स्पर्श करेल अशा स्थितीत या. हीच क्रिया दुसर्‍या पायासाठीही करा. वाकताना जेवढे सहज वाकता येईल तेवढेच वाका. या स्थितीत काही वेळ थांबून पुन्हा पूर्वीच्या स्थितीत या. स्लिप डिस्क आणि स्पाँडिलायटिसच्या रुग्णांनी हे आसन करू नये. कंबर आखडणे आणि कंबर दुखणे यासारख्या तक्रारींवर हे आसन उपयुक्त ठरते. आपले मणके मजबूत बनविण्याचे काम या आसनाद्वारे होते. त्याचबरोबर आपले वाढलेले पोट कमी होण्यासही मदत होते.

सुप्त वज्रासन

दिवसभर खुर्चीत बसून काम कराव्या लागणार्‍या माणसांना कंबर, पाय, गुडघे यांची दुखणी सहन करावी लागतात. काही जाणांना बैठ्या जीवनशैलीमुळे पोटही सुटते. अशा व्यक्तींकरिता सुप्त वज्रासन उपयुक्त ठरते. वज्रासनात बसताना आपण जमिनीवर दोन्ही गुडघे वाकवून बसतो. सुप्त वज्रासनात अशाच पद्धतीने बसावे आणि आपले हात शरीरामागे नेऊन हळूहळू जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करा. या आसनातील अंतिम स्थितीत आपले धड जमिनीवर समांतर होऊन जाते. या स्थितीत काही वेळ थांबून पुन्हा पूर्वीच्या स्थितीत या. यामुळे कमरेचे दुखणे दूर होते.

उष्ट्रासन

मणके मजबूत करण्यासाठी हे आसनही उपयुक्त आहे. याचबरोबर स्लिप डिस्क, स्पाँडिलायटिस आणि वातरोगापासून मुक्तता देण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. यासाठी प्रथम गुडघे टेकून उभे राहा. पंजे आणि गुडघे यांच्यात एक फुटाचे अंतर ठेवा. आता उजवा हात उजव्या पायाच्या टाचेवर ठेवा. डावा हातही डाव्या पायाच्या टाचेवर ठेवा. आता पाठीचा कणा आणि नितंबांना जास्तीत जास्त पुढच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्या शरीराची स्थिती एखाद्या कमानीसारखी होईल. या स्थितीत काही वेळ थांबून पुन्हा मूळ स्थितीत या.

त्रिकोणासन

संपूर्ण शरीराला उपयुक्त ठरेल असे हे आसन आहे. फुफ्फुसे, हृदय, मूत्रपिंड यासारख्या अवयवांनाही हे आसन उपयुक्त ठरते. हे आसन करण्यासाठी प्रथम जमिनीवर ताठ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये तीन ते चार फुटांचे अंतर ठेवा. दोन्ही हात खांद्याच्या उंचीपर्यंत सरळ उचला. आता कमरेच्या वरच्या भागाला उजवीकडे असे खाली आणा की, उजवा हात पायाच्या पंजावर आणि डावा हात डाव्या कानाच्या जवळ वरच्या दिशेने राहील. यावेळी आपली नजर डाव्या हाताच्या पंजावर स्थिर करा. शरीराच्या या स्थितीत गडघ्यात पाय वाकणार नाही, याची काळजी घ्या. जोपर्यंत आरामदायक वाटते आहे, तोपर्यंत या स्थितीत राहा. पुन्हा मूळच्या स्थितीत आल्यावर डाव्या पायाच्या दिशेने हीच क्रिया करा.

भुजंगासन

पाठीच्या कण्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी यासारखे दुसरे सर्वोत्तम आसन नाही. हे आसन करण्यासाठी जमिनीवर पोटावर झोपा. दोन्ही पाय एकमेकांना जुळवा. दोन्ही हात कानाच्या जवळ जमिनीवर ठेवा. आता हातांच्या आधाराने कमरेचा वरचा भाग जमिनीवरून उचलून सापाच्या आकाराचा बनवा. थोड्या वेळाने मूळ स्थितीत परत या. ज्यांना हर्निया आणि कोलायटिस आहे, अशा रुग्णांनी हे आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करावे. ( Yoga Therapy ) 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news