Diabetes diet : मधुमेह रुग्णांनी वजन कमी कसे करावे? आहाराबाबत घ्या 'ही' काळजी | पुढारी

Diabetes diet : मधुमेह रुग्णांनी वजन कमी कसे करावे? आहाराबाबत घ्या 'ही' काळजी

डॉ. भारत लुणावत

आरोग्य संघटनेच्या एका आकडेवारीनुसार, टाईप टू डायबिटीजचा सामना करणार्‍या 90 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांना लठ्ठपणाची समस्या असते. एवढेच नाही तर दीर्घकाळापर्यंत लठ्ठपणा असेल तर त्यांनादेखील मधुमेहाचा (Diabetes diet) धोका असतो. एकंदरीतच वजन कमी करताना आहार आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण काहीजण यात हलगर्जीपणा दाखवितात. परिणामी आरोग्यविषयक समस्या वाढण्याचा धोका अधिक राहतो. मधुमेहग्रस्तांनी योग्य मार्गाने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला तर रक्तदाब, हृदयविकारासारखे गंभीर आजार आणि अन्य आरोग्यविषयी कुरबुरींचे प्रमाण कमी राहू शकते.

Diabetes diet : वजन कमी कसे करावे?

शरीरात इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्याच्या प्रमुख कारणांपैकी लठ्ठपणा हे एक महत्त्वाचे कारण आहे. टाईप टू डायबिटीस रुग्णांत लठ्ठपणा असल्याने इन्सूलिन तयार होण्यास अडथळे येतात. मधुमेहामुळे निर्माण होणार्‍या आरोग्यविषयी समस्येतून बचाव करायचा असेल तर वजन कमी करणे हाच प्रमुख मार्ग आहे. वजन कमी राहिल्याने मधुमेह रुग्णांचे आरोग्यासंबंधीचे अन्य धोके कमी राहतात; परंतु काही रुग्ण वजन कमी करण्यासाठी कोणत्याही औषधांचे आणि खाद्यपदार्थांचे सेवन करतात. या कृतीमुळे समस्या आणखी वाढू शकते. मधुमेह रुग्णांनी वजन कमी करताना पुढील खबरदारी घेतली पाहिजे.

शारीरिक रूपाने सक्रिय राहा : मधुमेहग्रस्त रुग्णांनी वजन कमी करण्याबरोबरच शारीरिकद़ृष्ट्या सक्रिय राहणे गरजेचे आहे. आहाराबरोबरच शारीरिक सक्रियता आणि व्यायाम योग्य रीतीने केल्यास सहजपणे वजन कमी करू शकतो. वजन कमी करण्यासाठी प्रारंभी एखादे ध्येय निश्चित करा. शारीरिक सक्रियता ठेवण्याबरोबरच दररोज व्यायामाचा कालावधी पाच ते दहा मिनिटे वाढवा. मधुमेह रुग्णांनी एक गोेष्ट लक्षात ठेवावी आणि ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी तासन्तास व्यायामशाळेत घालविण्याची गरज नाही. उलट नियमितरूपाने धावणे आणि अ‍ॅक्टिव्हिटी सुरू ठेवल्यास चांगला फायदा मिळेल.

Diabetes diet : सुरुवातीला खूप वजन कमी करू नये : मधुमेहींनी सुरुवातीलाच खूप वजन कमी करण्याचे ध्येय ठेवू नये. कारण यासाठी अधिक मेहनत करावी लागेल आणि त्यामुळे शरीरात अनेक बदल दिसू शकतात. काही वेळा यामुळे चक्कर येण्यासारख्या घटनाही घडू शकतात. सबब वजन हळूहळू कमी करण्याच्या द़ृष्टीने नियोजन करायला हवे. आहारात फायबरयुक्त पदार्थाचा समावेश : वजन कमी करण्यासाठी मधुमेह रुग्णांनी आहारात फायबरयुक्त पदार्थाचा समावेश करायला हवा. फायबरयुक्त पदार्थ हे पचनासाठी उपयुक्त आहे. पुरेशा प्रमाणात सेवन केल्याने आपल्याला सारखी भूक लागणार नाही आणि वजनही संतुलित राहील.

थोड्या-थोड्या वेळाने संतुलित आहार घ्या ः मधुमेह रुग्णांनी वजन कमी करण्यासाठी एकाचवेळी खूप आहार करू नये. याऐवजी थोड्या थोड्या वेळाने हलक्या पदार्थांचे सेवन करावे. दीर्घकाळापर्यंत उपाशीपोटी राहिल्याने आणि एकाचवेळी खूप आहार घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते किंवा कमी राहू शकते.

हेही वाचलंत का?

Back to top button