चेहरा देताे आरोग्याविषयीचे अनेक संकेत | पुढारी

चेहरा देताे आरोग्याविषयीचे अनेक संकेत

डॉ. संजय गायकवाड

शरीराचे आरोग्य बिघडल्याचे संकेत आपल्या अनेक अवयवांवरून मिळत असतात; पण त्याकडे आपले दुर्लक्ष होते. अचानकपणे कोणी माहीतगार व्यक्ती बरेच दिवसांनी भेटली आणि त्याने ‘तुझे डोळे पिवळे का दिसताहेत, ‘त्वचा निस्तेज का झाली आहे’, अशी विचारणा केल्यावर आपल्याला याबाबत जाग येते. वास्तविक माणसाचा चेहरा हा आरोग्याविषयीचे अनेक संकेत देत असतो. त्याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. (What Does Your Face Say About Your Health?)

पिवळी पडलेली त्वचा आणि डोळे : आपल्या चेहर्‍याची त्वचा जर पिवळट दिसत असेल; विशेषतः डोळ्याचा पांढरा भाग पिवळा दिसत असेल, तर आपल्याला कावीळ झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळे पिवळे होणे हे काविळीचे महत्त्वाचे आणि मुख्य लक्षण आहे. यकृताच्या आरोग्याशी ंसंबंधित ही लक्षणे असतात. सिर्‍हॉसिस किंवा हेपेटायटिस या रोगांची ही लक्षणे असू शकतात. आपल्या चेहर्‍याची पिवळट निस्तेज त्वचा आपल्या स्वादुपिंडाशी निगडित काही समस्या असल्याचे द्योतक आहे. डोळे आणि त्वचा पिवळी पडणे ही कावीळ असण्याची लक्षणे आहेत. त्याशिवाय थकवा, डोकेदुखी, ताप, पोट बिघडणे, नॉशिआ, उलट्या, वजन कमी होणे, पोटदुखी, त्वचा खाजणे त्याचबरोबर मूत्र आणि शौचाचा फिकट रंग ही देखील काविळीची लक्षणे आहेत.

फुलपाखरांच्या आकारातील पुरळ : आपल्या चेहर्‍यावरील कोणत्याही प्रकारचे डाग किंवा पुरळ ही शारीरिक अनारोग्याचे लक्षण असते. ही पुरळ चेहर्‍याच्या दोन्ही गालांवर फुलपाखराच्या आकारात आली असेल आणि ती सूर्यप्रकाशाने पोळल्यासारखी दिसत असेल, तर त्वचेच्या क्षयाने आपण ग्रस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या रोगप्रतिकार शक्तीत काही बदल किंवा अक्षमता निर्माण झाल्यावर त्याचा परिणाम त्वचा, सांधे, रक्त, फुफ्फुसे, हृदय, मूत्राशय यांच्यावर होतो. फुलपाखरांच्या आकारात येणारी ही रॅश बरोबरच त्वचाक्षयाची इतरही काही लक्षणे दिसून येतात. थकवा, सांधेदुखी, सूज, स्नायूंचे दुखणे, हलका ताप, लसिका ग्रंथीचा आकार वाढणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, सततची डोकेदुखी आणि शरीरातील अवयवात होणारा अतिरिक्तद्रव साठा ही काही लक्षणेही त्वचाक्षयाची दिसून येतात.

चेहर्‍यावरील अनावश्यक केस : आपली हनुवटी, जबड्याचा भाग, वरच्या ओठावर अनावश्यक केसांची वाढ होणे स्त्रियांसाठी अवघडलेपण निर्माण करणारे असते. याला ‘हिरसुटिझम’ असे म्हणतात. चेहर्‍यावरील केसांची ही अनावश्यक वाढ ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ म्हणजेच ‘पीसीओसीची’ लक्षणे असू शकतात. शरीरातील हार्मोनचे संतुलन बिघडल्यावर ही अनावश्यक वाढ होते.

निस्तेज त्वचा ः आपले आरोग्य चांगले असेल; पण अचानकच आपली त्वचा निस्तेज, फिकट आणि निर्जीव दिसू लागली तर लोहाचे प्रमाण तपासून घ्या. लोहाची कमतरता किंवा अनिमिया याने जगभरातील अनेक लोक ग्रस्त असतात त्यामुळे अनेकांची त्वचा निस्तेज दिसते. शरीरातील लोहाची पातळी कमी झाल्याने शरीर पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही. हिमोग्लोबिन आपल्या शरीरातील रक्ताला लाल रंग प्रदान करत असते. त्यामुळे आपली त्वचा ही टवटवीत दिसत असते. आपल्या ओठांच्या आतल्या बाजूला, हिरड्यांच्या आतील बाजूचा तसेच डोळ्याच्या खालची पापणी इथली लाली कमी झालेली दिसत असेल, तरीही आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्याचे समजावे. त्याशिवाय निस्तेज त्वचा, थकवा ही लोहाच्या कमतरतेची काही सर्वसाधारण लक्षणे आहेत.

रुक्ष त्वचा आणि फाटलेले ओठ ः आपली त्वचा जर रुक्ष झाली असेल आणि ओठाची त्वचा फाटत असेल तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे हे लक्षण आहे. आपल्या त्वचेमध्ये तीस टक्के पाणी असते. त्यामुळे आपले ओठ मऊ, लवचिक असतात. त्यामुळेच शरीराला जेव्हा पाण्याची कमतरता भासते तेव्हा त्वचा कोरडी पडते; तर ओठ कोरडे पडतात आणि फाटतात. त्याशिवाय शरीरात पाणी कमी असेल तर घामही कमी येतो त्यामुळे शरीरातील घाण तसेच त्वचेवर जमा झालेले तेल बाहेर टाकण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे मुरूम, पुटकुळ्या येण्याची शक्यता वाढते किंवा त्वचेचा सोरायसिसही होऊ शकतो. काही वेळा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. पण, ही समस्या सातत्याने भेडसावत असेल, तर आरोग्याचे इतरही काही प्रश्न निर्माण झालेले दिसून येतात. काही वेळा हायपोथायरॉईडिझम किंवा मधुमेह, जीवनसत्त्व ‘बी’ ची कमतरता ही देखील शरीरातील पाणी कमी होण्याची कारणे असू शकतात.

हेही वाचा :

Back to top button