BrainTumor : वारंवार डोकेदुखी आणि चक्कर येतेय? वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या | पुढारी

BrainTumor : वारंवार डोकेदुखी आणि चक्कर येतेय? वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

ब्रेन ट्यूमर ( BrainTumor )  हा अत्यंत दुर्मीळ आजार आहे. ब्रेन ट्यूमरची लक्षणे सहज ओळखता येत नाहीत. अनेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण वारंवार डोकेदुखी आणि चक्कर येणं, ही ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांपैकी एक आहे. डोकेदुखी सतत जाणवत असल्यास वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेन ट्यूमरचं निदान खूप कठीण असतं. बर्‍याचदा ब्रेन ट्यूमर जीवघेणा ठरू शकतो. या आजाराची लक्षणं संभ्रम निर्माण करणारी असतात. डोक्याच्या आकारात अल्पसा बदल, अति तहान लागणं, वारंवार लघवीला जाणं, सातत्यानं किंवा तीव्र डोकेदुखी, चव आणि वास समजण्यास अडचण येणं, द़ृष्टी अंधूक होणं, चक्कर येणं, थकवा येणं, जुलाब आणि उलट्या होणं ही लहान मुलांमध्ये दिसणारी ब्रेन कॅन्सरची लक्षणं आहेत. तर तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं, झटका येणं, अनुवांशिकता, मळमळ होणं, जुलाब किंवा उलटी होणं, बोलताना अडचण जाणवणं, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या निर्माण होणं, चव आणि वास समजण्यात अडचणी येणं, हातापायाला मुंग्याला येणं ही ब्रेन कॅन्सरची लक्षणं प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येतात.

BrainTumor : वेळीच निदान व उपचार ठरताे फायदेशीर

बर्‍याच डोकेदुखीकडे लोक दुर्लक्ष करतात. परंतु, वारंवार होणारी डोकेदुखी ब्रेन ट्यूमरच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. वाढत्या मेंदूतील गाठीमुळे मेंदूजवळील निरोगी पेशींवर अतिरिक्त दबाव पडतो तेव्हा डोकेदुखी जाणवते. टयूमरमुळे मेंदूला सूज येऊ शकते. याशिवाय पहाटे उठल्यावर डोकेदुखी वाढते. काही लोकांना झोपेच्या वेळी डोकेदुखी होऊ शकते आणि त्यांना मायग्रेनच्या वेदनेसारखे वाटू शकते. डोक्याच्या मागच्या बाजूला असलेल्या ब्रेन ट्यूमरमुळे डोकेदुखी आणि मान दुखते. अशी समस्या असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एमआरआय, सीटीस्कॅन, पीईटी-सीटी स्कॅन आणि ट्यूमरची बायोमार्कर चाचणी करून घ्यावी. वेळीच निदान व उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

ब्रेन ट्युमरवर तात्काळ शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीद्वारे उपचार उपलब्ध आहेत.जर मेंदूची गाठ डोक्याच्या पुढच्या भागात झाली तर डोके दुखणे किंवा सायनसचा त्रास जाणवतो. परंतु काही ब्रेन ट्यूमरमुळे डोकेदुखी होत नाही. त्यामुळे ब्रेन ट्यूमरचं निदान पटकन होत नाही. वेळीच निदान व उपचार न झाल्यानं आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे डोकेदुखी व्यतिरिक्त मळमळणे, उलट्या होणे, झोपेसंबंधीच्या समस्या आणि विसर पडणे, चक्कर येणे, मूड स्विंग्ज, चालताना तसेच बोलताना अडचणी येणे किंवा ऐकू न येणे, द़ृष्टी आणि गंध बदलणे, संतुलन गमावणे, भावनिक अस्थिरता आणि अन्न गिळताना येणार्‍या समस्या जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. आकाश छेडा

हेही वाचा : 

Back to top button