डॉ. मनोज शिंगाडे
ऑस्टियोपीनिया हा शहरी जीवनशैलीमुळे जडणारा एक गंभीर आजार आहे. अस्थिरोगतज्ज्ञ तर आता हा 'जीवनशैलीचा आजार' (लाइफस्टाइल डिसीज) आहे असेच म्हणतात.
कॅल्शियम आणि 'ड' जीवनसत्त्व हे हाडांसाठीचे काँक्रिट आहे. वयाच्या तिशीत पोचेपर्यंत हाडांची घनता महत्तम झालेली असते. अर्थात, यासाठी जीवनशैली चांगली असणे गरजेचे असते. जीवनशैलीत बिघाड झाल्यास विशीच्या आसपासच या दोन्ही घटकांची कमतरता निर्माण होते. उठण्या-बसण्याच्या चुकीच्या पद्धती, चुकीच्या बैठकपद्धती, दिनचर्येत व्यायामाचा अभाव, बंद खोलीत व्यतीत होणारा दिवस, वेळ नसल्यामुळे वॉर्मअप न करताच इम्पॅक्ट एक्झरसाइज करणे, फॅशन म्हणून धूम्रपान आणि मद्यपान, कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन, कोला-कॉफी कल्चर, आरोग्यपूर्ण आहाराचा अभाव, तणावग्रस्त दैनंदिनी, हार्मोन्सचे असंतुलन आदी कारणांमुळे कमी वयातच हाडे आणि पेशी कमजोर होतात. त्यामुळेच ऑस्टियोपीनिया म्हणजे हाडांची घनता कमी असण्याचा आजार जडतो.
ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपीनियामध्ये फरक आहे.
ऑस्टियोपोरोसिस आजारात हाडे कमकुवत होतात. हाडांमधील 'बोन मास' कमी होते आणि ती भुसभुशीत, ठिसूळ होतात. या आजारात हाडांच्या वेदनांबरोबरच हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. या आजाराला 'सायलेन्ट डिसीज' म्हणतात कारण तो हळूहळू फैलावत जातो आणि अखेर अशा अवस्थेला पोचतो, जेथे त्यावर उपचार करणे शक्य नसते. ऑस्टियोपीनिया हाडांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. 'बोन मास' कमी होण्याची प्रारंभिक अवस्था म्हणजे ऑस्टियोपीनिया होय. या आजारात हाडांची घनता म्हणजे 'बोन डेन्सिटी' कमी होते. नंतर हा आजार ऑस्टियोपोरोसिसचे रूप धारण करतो.
शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, ड-3 जीवनसत्त्व आणि खनिजे मिळाल्यासच हाडे टणक राहतात. खेळ, फिरायला जाणे, पोहणे, जॉगिंग यामुळे हाडांच्या या आजारावर नियंत्रण मिळविता येते. आहारात दूध, दही, तूप, ताक, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आहारात करावा. 'ड' जीवनसत्त्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम आदींच्या अभावामुळे ऑस्टियोपीनिया होतो. 'ड' जीवनसत्त्व शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. सूर्यप्रकाश आणि दुधातून ड जीवनसत्त्व मिळविता येते. हात, बाहू, चेहरा दिवसातून दोन-तीन वेळा दहा ते पंधरा मिनिटांसाठी सूर्यप्रकाशात राहील, याची काळजी घ्यावी. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे हाडांना मजबूत करणारे घटक होत. तसेच नाजूक उतींना सुरक्षित राखण्यासाठी आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठीही कॅल्शियम उपयोगी पडते. फळे आणि भाज्यांचा जास्तीत जास्त वापर आहारात केल्यास कॅल्शियमची गरज पूर्ण होते. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे संतुलन शरीरात असणे गरजेचे असते.
नियमित व्यायाम आणि योगासने ऑस्टियोपीनियामध्ये लाभदायक ठरतात. वजन उचलताना शरीर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करते. यावेळी हाडांवर ताण येतो. हाडे ठिसूळ झाली असतील किंवा त्यांची घनता कमी झाली असेल, तर ती वजन सहन करू शकत नाहीत. त्यामुळे कार्यक्षम राहण्यासाठी शरीराच्या इतर अवयवांबरोबरच हाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून ऑस्टियोपीनियापासून बचाव करता येतो. पोषक आहार घ्यावा. कॅल्शियम आणि 'ड' जीवनसत्त्व अधिक असलेले पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात असावेत. भाज्या, दूध, डेअरी उत्पादने तसेच मासे खाण्याने हाडे मजबूत होतात. नियमितपणे 1500 मिलीग्रॅम कॅल्शियमचे सेवन करणे हितकारक ठरते. शरीराचे वजन आटोक्यात ठेवणेही आवश्यक आहे. कारण शरीराचा भार हाडांनीच तोलून धरलेला असतो. हाडे शरीराला आधार देण्यासाठी असतात. शरीराचे वजन अवास्तव वाढल्यास हाडांवर प्रमाणापेक्षा अधिक दबाव पडतो आणि ती ठिसूळ असल्यास फ्रॅक्चरही होऊ शकतात.
दररोज किमान एक किलोमीटर चालण्याची सवय लावून घ्यावी. 'बोन मास' वाढविण्यासाठी पायी चालणे फायदेशीर ठरते. शारीरिकद़ृष्ट्या सतत सक्रिय राहणे गरजेचे आहे. योग्य वयात ही सवय लागली नाही, तर शरीर सक्रिय राहत नाही आणि हाडे अधिकाधिक ठिसूळ होऊ लागतात. तरीही वाढत्या वयानुसार हाडांच्या तक्रारी उद्भवल्यास त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. वयाच्या चाळीशीनंतर 'बोन डेन्सिटी टेस्ट' म्हणजेच हाडांच्या घनतेची चाचणी जरूर करवून घ्यावी. या चाचणीला 'डेक्सास्कॅन' असे म्हटले जाते. हाडांमध्ये वेदना होत असतील, तरी ही चाचणी करावी. सामान्य प्रकृतीच्या व्यक्तींना चाचणी करवून घेण्याची गरज नसते. अर्थातच, हाडांची घनता कमी असेल, तर तो आर्थ्रायटिसच असेल, असे म्हणता येत नाही. 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता, मधुमेह, थायरॉइड ग्रंथीचे आजार, गर्भावस्थेत कमी पोषण मिळणे, धूम्रपान, मद्यपान अशी कारणे ऑस्टियोपीनियासाठी जबाबदार ठरतात.
परंतु हाडांशी संबंधित अनेक आजारांचे मूळ आपल्या जीवनशैलीत असते, हे विसरून चालणार नाही. जीवनशैलीत नियमिततेचा अभाव आहे. तसेच ताणतणाव आणि धावपळ वाढली आहे. त्या प्रमाणात शरीराला पोषकद्रव्ये मिळत नाहीत. तसेच जंक फूड, फास्ट फूडमुळेही शरीराला आवश्यक पोषकद्रव्यांचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे वयाच्या तिशीपर्यंत हाडांची घनता योग्य प्रमाणात वाढत नाही. अशा स्थितीत ऑस्टियोपीनिया होण्याची शक्यता वाढते. मोठ्या शहरात अनेकांना ही समस्या भेडसावू लागली आहे. धावपळीतून वेळ काढून शरीराच्या देखभालीसाठी व्यायाम आणि आहाराकडे लक्ष हाच अशा गंभीर आजारांपासून मुक्तीचा मंत्र होय.
हेही वाचा :