डॉ. महेश बरामदे
केवळ ज्येष्ठातच नाही तर लहान मुलांतही आर्थरायटिस म्हणजेच संधीवाताचा त्रास होऊ शकतो. या आजाराचे कारण काय, त्याचा त्रास कशाप्रकारे होतो, त्याची प्रमुख लक्षणे काय, उपचाराचे मार्ग आणि काळजी कशी घ्यावी याबाबत जाणून घेऊ.
सर्वसाधारणपणे संधीवाताची समस्या ज्येष्ठांत आणि वयस्कर मंडळीत पाहवयास मिळते. मात्र आजघडीला 2 ते 15 आणि 16 वयोगटातील मुलांना आणि किशोरवयीन मुलांना देखील त्याचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. लहानपणी संधीवात होणे ही भारतात तशी अससामान्य बाब मानली जाते, पण जगभरात त्याचे प्रमाण वाढत आहे. याला जुवेनाईल इडियोपॅथिक आर्थरायटिस (जेआयए) किंवा जुवेनाईल र्हुमेटाईड आर्थरायटिस असेही म्हटले जाते. याचा परिणाम हा मुलांच्या हाडांच्या विकासावर होतो. म्हणून लहानपणीच त्याच्यावर उपचार व्हायला हवेत. यासाठी पालकांनी सजग राहणे गरजेचे असून डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे, गाईडलाईन्सचे पालन करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हाडांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शरीरात व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियम प्रमाण संतुलित असणे आवश्यक आहे.
जुवेनाईल इंडियोपॅथिक अर्थरायटिसची समस्या होण्यामागे काही कारणे आहेत. लहान मुलांत रोगप्रतिकारकशक्ती कमी राहिल्यास हा त्रास होण्याची शक्यता नाकारता नाही. इम्युनिटी सिस्टिमच्या कोशिका टिश्यूवर हल्ला करू लागतात तेव्हा संधीवात होतो. यामुळे सांधेजोडांचे नुकसान होते. मुलांतील हाडांचा विकास थांबतो आणि शारीरिक वाढही खुंटते. याचा मुलांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतो.
प्रमुख लक्षणे : मुलांत आर्थरायटिस झाल्यास सांधेजोडात वेदना होतात. सूज,थकवा येणे, भूक कमी लागणे, शरीर आखडणे, ताप येणे, चालताना त्रास होणे, त्वचेवर पुरळ, चट्टे पडणे, लिंफ नोड्समध्ये सूज येणे यासारख्या तक्रारी होऊ लागतात. आजाराचे कारण : लहानपणी होणार्या संधीवाताच्या आजाराचे मुख्य कारण हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु लहान मुलांतील रोगप्रतिकारक शक्ती योग्य रितीने काम करत नसल्यास या आजाराचा सामना करावा लागू शकतो.
एक्स रे, एमआरआय, सीटी स्कॅन, बोन्स स्कॅन, रक्त चाचणी आदीच्या मदतीने आर्थरायटिसचा शोध घेता येतो. निदान झाल्यानंतर उपचारासाठी मुलांना औषधे, फिजिओथेरेपी, पोषणासंबंधीचा सल्ला, नियमित शारीरिक हालचाली, वजनाचे व्यवस्थापन, पुरेसा आराम याबाबत डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. उपचाराचा उद्देश हा वेदना आणि सूज कमी करण्याचा असतो. सांधेजोडातील आणि हाडांची झीज रोखण्यासाठी औषधोपचार केले जातात. चांगल्या परिणामासाठी योग्य उपचाराबरोबरच पालकांनी मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवायला हवे. काळानुसार अचूक उपचार केले तर मुलगा संपूर्णपणे बरा होऊ शकतो. अन्यथा संधीवाताचा आजार बळावू शकतो आणि मुलांच्या शारीरिक विकासावर परिणाम होऊ शकतो. कालातंराने मुलांना 'ऑस्टियोपोरिसीस'चा सामना करावा लागू शकतो. म्हणून संधिवातावरील उपचाराला विलंब लावू नये.
हेही वाचा :