तुम्ही रात्री उशिरा जेवता का? होऊ शकतात ‘हे’ घातक परिणाम – Side Effects of Late night eating | पुढारी

तुम्ही रात्री उशिरा जेवता का? होऊ शकतात 'हे' घातक परिणाम - Side Effects of Late night eating

तुम्ही रात्री उशिरा जेवता का? - होऊ शकतात हे घातक परिणाम

पुढारी ऑनलाईन – रात्री उशिरापर्यंत ओटीटीवर एखाद शो पाहायचा आणि त्यानंतर जेवण करायचे किंवा फ्रीजमधून काहीतरी पदार्थ काढून खायचे हा प्रकार अनेकांनी केला असेल. रात्री उशिरापर्यंत विविध कारणांनी वेळ घालवायचा आणि नंतर कधी तरी पोटपूजा करायची हे नेहमीचे झाले आहे; पण तुम्हाला माहिती आहे का, अशा प्रकारे रात्री उशिरा खाणे आरोग्यासाठी फार घातक ठरते. मोबाईल, सोशल मीडिया, उशिरा चालणाऱ्या पार्टी यामुळे अनेकांची लाईफस्टाईल पूर्ण बिघडून गेली आहे. विशेषतः खाण्याच्या चुकीच्या सवयी आरोग्यावर घातक परिणाम करत आहेत. ( Side Effects of Late night eating )

यातून अनेकांना रात्री उशिरा खाण्याची सवय लागल्याचे दिसून येते. दिवसा अवेळी खाण्याने जे दुष्परिणाम होतात, त्यापेक्षा जास्त दुष्परिणाम हे रात्री उशिरा खाण्याचा सवयीमुळे होऊ शकतात. रात्री उशिरा खाण्याची आपल्याला सवय जडू शकते याला ‘Night Eating Syndrome’ असे नावही देण्यात आले आहे.

Side Effects of Late night eating : आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात

१) निद्रानाश – उशिरा खाण्यामुळे झोपही उशिरा लागते. त्यामुळे झोपेच चक्र बिघडून जाते. उशिरा खाण्यामुळे विचित्र स्वप्न येतात, असे २०१५ला एका संशोधनात दिसून आले होते.

२)  अपचन – जर तुम्हाला अपचन आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुमच्या जेवणाच्या वेळा यासाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदार ठरू शकतात. पचनसंस्थेशी संबंधित हे आजार उशिरा जेवणामुळे जास्तच डोकेवर काढू शकतात. उशिरा जेवलेले अन्न नीट पचत नाही, त्यामुळे पोटातील आम्लता वाढते.

३) वजन वाढणे – शरीराचे एक चक्र ठरलेले असते. रात्री उशिराच्या जेवणामुळे शरीराचे हे चक्र पूर्ण बिघडून जाते. त्यामुळे निद्रानाश, हार्मोनमधील बदल आणि वजन वाढणे अशा समस्या निर्माण होतात. रात्री शरीराची चयापचय क्रिया मंदावलेली असते. त्यातून उशिरा जेवणामुळे वजन वाढते.

४) रक्तदाब आणि डायबेटिज – रात्री उशिरा जेवणाची सवय रक्तदाब वाढणे, डायबेटिज, फास्टिंग शुगर वाढणे यासाठीही कारणीभूत ठरते.

५) मानसिक आरोग्य बिघडणे – उशिरा जेवणामुळे मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतात. उशिरा जेवणामुळे झोपेवर परिणाम होत असल्याने त्याचे विपरित परिणाम मानसिक आरोग्यावर होतात.

हेही वाचा

Back to top button